सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना आणण्यासाठी शासनाने आपले लक्ष काही रोगांवर केंद्रीत केलेले आहे त्यापैकी पाण्यापासून होणारे रोग ,परजीवी पासून होणारे रोग, हवेपासून होणारे रोग.
कीटकांमार्फत पसरणारे चिकुनगुन्या, डेंग्यू ,हिवताप, हत्तीरोग व जे ई या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी शासन विविध उपक्रमांव्दारे प्रयत्नशील आहे.
सन 2004 पासून राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध या नावाचे रूपांतर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम असे करण्यात आले असून कीटकांमार्फत प्रसारीत होणाऱ्या रोगांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही ठिकाणी चिकुनगुन्या ,डेंग्यू आजाराचे संशयित रूग्ण आढळून येत आहेत व त्यामुळे जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. परंतु वेळेत निदान होऊन औषधोपचार घेतल्यास प्राणहानी होत नाही. हत्तीरोगातही रूग्णास हातापायावर व गुप्तांगावर सूज येते व वेळेत निदान व औषधेापचार घेतल्यास हा आजारही नियंत्रणात ठेवता येतो.
स्वातंत्र्य पूर्वकाळात हिवतापाचे 7.5 कोटी रुग्ण होते. त्यापैकी 8 लाख लोकांचा हिवतापाने मृत्यू झाला . यावरून स्वातंत्र्य पूर्वकाळामध्ये हिवतापाने फारच भयानक रूप धारण केलेले होते. 1965 साली मात्र हिवताप बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. यावर्षी फक्त 1 लाख लोकांनाच हिवतापाची लागण झालेली होती . त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे त्या वर्षी एकही हिवतापाने मृत्यू झालेला नव्हता. परंतू 1976 नंतर आजातागायत हिवताप रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येते आहे. 1997 मध्ये 90 कोटी लोकसंख्येपैकी 24 लाख लोकसंख्या ही हिवतापाने पिडीत होती . तर त्यावर्षी 711 हिवताप मृत्यूची नोंद झालेली होती यावरून हिवताप हा किती भयानक रोग आहे याची कल्पना येते.
हिवताप म्हणजे काय ?
हिवताप हा एक थंडी वाजून येणारा ताप आहे त्याची लागण मानवाला अतिसूक्ष्म अशा हिवताप परोपजीवी जंतूमुळे होते. या हिवताप परोपजीवी जंतूचा प्रसार हा डासांमार्फत होतो. परंतू सर्व प्रकारचे डास हे हिवतापाचा प्रसार करू शकत नाहीत . भारतात फक्त 9 प्रकारचे ऍ़नाफेलीस डास हे हिवतापाचा प्रसार करतात, त्यामध्ये ऍ़नाफेलीस डासाची मादी प्रामुख्याने हिवतापाचा प्रसार करते.
हिवतापाची लक्षणे व अवस्था--
थंडी - या अवस्थेमध्ये रुग्णास प्रथम जोरात थंडी वाजते. कापरे भरते व डोके दुखते अशा अवस्थेत रूग्णास रजई वा दुलई पांघरावीशी वाटते. ही अवस्था 15 मिनिटापासून 1 तासापर्यत टिकते.
ताप - या अवस्थेतमध्ये खूप ताप येतो. रुग्णास मळमळल्यासारखे वाटते उलटया होतात व डोके अतिशय दुखते. ही अवस्था 2 तासापासून 6 तासापर्यत टिकते.
घाम - या अवस्थेमध्ये भरपूर घाम येवून ताप उतरतो. रोग्यास गाढ झोप लागते. जाग आल्यानंतर अशक्तपणा जाणवतो. ही अवस्था 2 ते 4 तासापर्यत टिकते.
महाराष्ट्रामध्ये पी. व्हायव्हॅक्स व पी फॅल्सीफेरम हे दोनच प्रकार आढळतात. भारतात 60 ते 65 रूग्ण हे टक्के रुग्ण हे पी. व्हायव्हॅक्स या प्रकाराचे आढळतात. परंतू सध्या मात्र अतिशय धेाकादायक अशा पी.फॅल्सीफेरमचे प्रमाण वाढत आहे.
हिवतापाची लागण कोठून होते--
मानव हे हिवतापाची लागण होण्यासाठीचे सर्वात मोठे नैसर्गिक भांडार आहे. हिवतापाची लागण सर्व वयोगटामध्ये होते. शिवाय बहुतांशी घरामध्ये अयोग्य वायूविजन व अयोग्य प्रकाश योजना यामुळे डासांना निवारा घरामध्येच मिळतो तसेच अनेक लोक कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करतात यामुळेही हिवतापाचा प्रसार होतो.
हिवतापाचे दुष्परिणाम--
हिवतापामध्ये सर्वसाधारणपणे प्रथम ताप येतो त्यानंतर यकृत व प्लीहाला सूज येते. हिवताप परोपजीवी जंतूचे हे तांबड्या रक्तपेशीवर हल्ला केल्यामुळेच रक्तक्षय होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे मानवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. गर्भवती स्त्रियांना व बालकांना हिवतापापासून सर्वात जास्त धोका आढळून आलेला आहे. तसेच हिवताप जंतूच्या सततच्या वास्तव्यामुळे अशक्तपणा येतो व वजनात घट होते. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मेंदूच्या हिवतापामध्ये वाढती डोकेदुखी, ग्लानी, जलद श्वासोच्छावास, बुध्दीभ्रम होवून रुग्ण बेशुध्द होतो. प्रसंगी मुत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. गर्भवती स्त्रियांना हिवतापाची लागण झाल्यास प्रसंगी गर्भपात होण्याची शक्यता असते.
हिवताप प्रतिरोध म्हणजे कार्य ?
हिवतापाला वेळीच प्रतिबंध घातला तरच मानवी जीवन हे सुसह्य होणार आहे. यासाठी हिवतापाला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. यासाठी डासांवर नियंत्रण व हिवताप रोग्यावर उपचार या पध्दती अंमलात आणावयाच्या आहेत.
डासांवर नियंत्रण आणण्यासाठी सभोवतालची डबकी, पाण्याचे साठे इ. मध्ये डासोत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी जैविक उपाय योजनेअंतर्गत त्यामध्ये गप्पी मासे सोडणे या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये मोठे यश मिळालेले आहे. प्रत्येक सेप्टिक टॅकवरील व्हेंटपाईपना कॅप/ जाळी बसविणे, डासांचा नायनाट करणाऱ्या किटकनाशकांचे दुष्परिणाम, त्यांच्या वाढत्या किमती, फवारणीसाठी लोकांनी दिलेला नकार, फवारणीच्या अंमलबजावणीतील त्रुटी व किटकामधील किटकनाशकांच्या विरोधात निर्माण झालेला प्रतिरोध इ. गोष्टीमुळे किटकनाशके वापरण्यावर मर्यादा आढळून आलेल्या आहेत.
हिवताप जंतूचे रुग्णांच्या शरीरातील सततच्या वास्तव्यामुळे हिवतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रुग्णांनी हिवतापासाठीचा समूळ उपचार घेवून सहकार्य करणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment