अभी तो आई है पंखो में थोडीसी जान
अभी तो असली उडान बाकी है
नापी है सिर्फ मुठ्ठीभर जमी
अभी तो सारा आसमाँ बाकी है.
अभी तो असली उडान बाकी है
नापी है सिर्फ मुठ्ठीभर जमी
अभी तो सारा आसमाँ बाकी है.
आयुष्यात एखादे ध्येय निश्चित करणे ते ध्येय गाठेपर्यंत सतत प्रयत्न करीत राहणे आणि ध्येय पुर्ण झाल्यावर होणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असतो. असाच आनंद राखी रंगवाळ हिचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्याला कारणही तसेच आहे. राखीला तिचे ध्येय प्राप्त झाले. तिला लहानपणापासून एयर होस्टेस व्हायचे होते. तिचे हे स्वप्न पूर्ण झाले.
राखी तिला मिळालेल्या या यशाचे संपूर्ण श्रेय तिच्या आईला देते. कारण तिची आई या सर्व प्रवासात तिच्या सोबत सावली सारखी होती. तिला तीन बहिणी आहेत. राखी ही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याची रहिवासी आहे. या तालुक्यातून पहिली एयर होस्टेस होण्याचा मान तिला मिळाला.
राखीशी भेट दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्यालयात झाली. तिला राजपत्रित अधिकाऱ्यांचा सही शिक्का हवा होता. त्याकरिता ती आली होती. तिच्याशी संवाद साधल्यावर तिचा इथपर्यंतचा प्रवास समजला. तिचे शिक्षण बारावीपर्यंत उदगीर येथे झाले. पुढे राखीने डी.एड केले. जवळपास सहा महिने शिक्षक म्हणून कामही केले. परंतू तिला उंच आकाशात उडायचे होते. त्यामुळे राखीने ही नोकरी सोडली आणि हैद्राबाद येथे एयर होस्टेसचे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
एप्रिल 2014 मध्ये तिला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथे ग्राउंड स्टाफ म्हणून नोकरी मिळाली. येथे तिला राजशिष्टाचाराची कामे सोपविण्यात आली. हैद्राबाद विमानतळावर व्हीआयपी व्यक्तींची ये-जा ही अधिक असते. यामध्ये चित्रपट अभिनेते, राज्यपाल, मंत्री, न्यायाधीश यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींचे स्वागत तिला करावे लागत असे. कधी-कधी इतकी अधिक व्यस्तता असायची की तिला जेवणाची सवड ही मिळत नसे, असे तिच्या बोलण्यावरून जाणवत होते. हे काम तिने सलग 18 महिने केले.
या कामादरम्यानच तिचे हवाई सुंदरी बनण्याचे प्रयत्न सुरू होते. एयर इंडियाच्या उत्तर भारताच्या क्षेत्राकरिता एयर होस्टेसच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. तिने त्यासाठी अर्ज भरला. या पदाकरीता खूप कठीण स्पर्धा असते. केवळ 35 मुला-मुलींचे सिलेक्शन होणार होते. त्याकरिता 4500 अर्ज प्राप्त झाले. त्यामधून केवळ 35 मुली शॉर्ट लिस्ट करण्यात आल्या. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्पात झालेल्या परीक्षा- यामध्ये लेखी, मुलाखती, गट चर्चा यांसह बोलणे, वाचणे, चालणे या सारख्या व्यावहारीक अनुभवाच्याही परीक्षांमधून तावून-सूलाखून निघाल्यावर निवड होणार होती. प्रत्येक चाळणीत ती यशस्वी ठरली. यामध्ये केवळ 17 मुली पास झाल्या त्यापैकी राखी रंगवाळ एक. तिची ही सर्व कहाणी ऐकूण अक्षरश: रोमांच वाटत होते. शेवटी तिला जे गाठायचे होते ते ध्येय तिने गाठले. एयर इंडियामध्ये एयर होस्टेस बनण्याचे स्वप्न पुर्ण झाले. ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत घेतली की ते पूर्ण करता येते याचे राखी हे एक उत्तम उदाहरण आहे. युवा पिढीसाठी ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित. तिच्या या जिद्दीला, तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम.
-अंजू निमसरकर-कांबळे
माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
0 comments:
Post a Comment