हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या कुशीत विसावलेला विस्तीर्ण जलाशय. दृष्टी जाईल तेथपर्यंत फक्त जलाशयाचे पाणी व हिरवळच दिसावी. हिरवळीचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून जणू हे पाणी हिरवेगार दिसावे. अशा कातरवेळी निरव शांततेचा व त्या शांततेत आपलेच साम्राज्य भासवणाऱ्या असंख्य पक्षांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर नवेगावबांधला यायलाच हवे.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेला. वनराईने नटलेला. धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगाची उधळणी केली आहे. नवेगावबांधमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे पक्षी होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी आहे. 1975 साली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून शासनाने घोषित केले. थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकरांपासून ‘अरण्यऋषी’ नावाने प्रख्यात लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लेखनीतून नवेगावचा निसर्ग श्रावणातील सरींप्रमाणे अक्षरश: रिमझीमला आहे.
नवेगावचा परिसर वनस्पतीसृष्टी, वन्यजीवसृष्टी आणि पक्षीसृष्टी यांनी समृद्ध व नटलेला आहे. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन येथे होते. तेव्हा मात्र पक्षीप्रेमींना नवेगावची वाट खुणावल्याशिवाय राहत नाही.
सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम व मोठा बगळा अशा पाणपक्ष्यांसोबत छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली ह्या छोट्या परंतू सुरेख पक्ष्यांची मालिका येथे आढळते. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बुलबुल, सुतारपक्षी, हुदहुद, शिकरा, दयाळ, कोतवाल, सातबहिणी, ससाणा, गरुड, घुबड, घार असे अनेकानेक पक्षी दिसून येतात. एकाकी व मनुष्यांची ये-जा नसल्यामुळे पक्ष्यांसाठी हे ठिकाण खरेच निवांत ठरते. येथे उभारलेल्या पक्षीदर्शक मनोऱ्यामुळे पक्षी प्रेमींना विविध पक्ष्यांना मनसोक्त न्याहाळता येते. पक्षी अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात केवळ नवेगाव येथेच सारस क्रोंच पक्ष्यांची वीण होते. येथील वनस्पतीतही विविधता आहे. त्यात साग, बिजा, धावडा, पळस, कवट, बेल, बोर, मोह, बेहडा, हिरडा, उंबर, जांभूळ यामुळे वनस्पतींची हिरवी झालरच असल्याचा भास होतो.
पर्यटकांची येथे राहण्याची सुविधा व्हावी. याकरीता युथ होस्टेलमध्ये बेडची सुविधा असून लॉगहट, रेस्टहाऊस, हॉलीडेहोम रेस्टहाऊस असून यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांच्या कार्यालयातून आरक्षण करता येते.
पक्षी मित्रांच्या दृष्टीने स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी व वन्यप्राण्यांना बघण्यासाठी मार्च मे महिन्याचा कालावधी योग्य आहे. नवेगावबांध येथील हिरवे डोंगर, आरस्पानी व आरशासारखे सुरेख जलाशय, काळोख्या रात्रीत चांदण्याचे चमचमते पाणी सर्वकाही मन मोहून टाकणारे व मनातला कोलाहल जागे करणारी अनाहूत शांतता. चला तर नवेगावला.
- जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
विविधांगी पक्षी, प्राणी व वनराईने नटलेले नवेगावबांध
Posted by
rajeshkhadke
on Saturday, 19 December 2015
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment