वाघोबाच्या गावात... : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प

जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.. श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष... ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही. आपली नजर सतत शोध घेत असते पाणवठ्यावर जाणवणाऱ्या हालचालीचा.. हा कानोसा घेत असतांनाच जर “वाघोबां”चे दर्शन झाले तर अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि तो थरार बरंच काही सांगून जातो...

ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली...

येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले तर अंधारी वन्यजीव अभयारण्याला या अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या अंधारी नदीवरून नाव देण्यात आले.

वाघांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाल्यानंतर भारतात व्याघ्र संरक्षणासाठी प्रयत्न सुरु झाले. वाघांच्या शिकारीवर बंदी आली. पाठोपाठ वाघांच्या कातडीच्या विक्रीवरही बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार होऊन व्याघ्र प्रकल्पाचा विशेष दर्जा निर्माण झाला. त्यात महाराष्ट्रातील मेळघाट जंगलाचा समावेश होता.

कालांतराने ताडोबा आणि अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे.

समृद्ध वनसृष्टी
येथील जंगल हे प्रामुख्याने कोरड्या पानगळीचे आहे. ते दक्षिण उष्णकटिबंधीय पाणझडीचे वन या प्रकारात मोडते. सागवान आणि बांबूच्या झाडांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. याशिवाय अर्जन, धावडा, करई, तेंदू, मोह, कुंभा, पळस, बहावा, रोहीण, कुसूम, बेहडा, आवळा, जांभूळ, आंबा, उक्षी या प्रमुख वृक्ष प्रजातीही येथे पहावयास मिळतात.

हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते. शिशिरातील पानगळ, वसंतातील मोहर असा ऋतूबदल येथेही प्रकर्षाने जाणवतो. पळस, पांगारा, कुंभा वृक्षांची मनोहारी रंगी बेरंगी फुलं मन हरखून टाकतात. आसमंतात मोहाचा सुगंध दरवळत असतो. ग्रीष्माची चाहूल लागताच वाढत्या उष्म्याने बहावा, अर्जन सलई, गुलमोहर सारख्या वृक्षांना बहर येतो. पानगळीने सांगाडे झालेल्या वृक्षांवर नवी कोवळी उमलती डोके वर काढू लागते. आयुष्याच्या रहाटगाड्यातील बालपण, तारूण्य आणि वार्धक्याच्या सगळ्या अनुभूती या वृक्षांनाही न चुकल्यासारख्या वाटतात आणि वास्तवादी आयुष्याचे दर्शन होऊन पाय जमीनीवर राहण्यास मदत होते.
वन्यप्राण्यांचे वैविध्य
वन्य प्राण्यांच्या “सहज” दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे. पट्टेवाला वाघ हे या जंगलाचे वैशिष्ट्य. येथे वानर, रानडुक्कर, चितळ, सांबर, गवे यांचे मोठमोठाले कळप दिसून येतात. जगातील सर्वात मोठा वन्यबैल म्हणून ज्याला संबोधलं जातं असा गवा येथे आहे. शिंगाच्या दोन जोड्या डोक्यावर घेऊन मिरवणारा चौसिंगा येथे आहे. ऊंच उडणारा सारस, सर्वात वेगाने उडणारा बहिरी ससाणा, जगातील सर्वात मोठे शृंगी घुबड, जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा किडा “सन स्पायडर”, जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलस, जगातील सर्वात मोठे जाळे विणणारा “वृक्ष कोळी”ही येथे आहे. याशिवाय भित्रे भेकर, वाळवी-किडे खाण्यात मश्गुल असणारे अस्वल आणि शिकारीच्या प्रयत्नात असलेली रानकुत्रीही आपल्याला भेटतात. अत्यंत रुबाबदार असलेल्या बिबळ्याचे दर्शनही येथे सहजगत्या होते. याशिवाय चांदी अस्वल, रान मुंगूस, तुरेवाला सर्प गरूड, तीसा, मधळ्या गरूड, मगर, घोरपड, रान सरडा, राखी रानकोंबडा, टकाचोर, उदमांजर, रानमांजर, सायळ, ससा, उडणारी खार असे प्राणीही आपल्याला भेटतात.

पक्ष्यांच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे भूतलावरचा स्वर्गच आहे. मोर, तुरेवाला कोतवाल, हळद्या, स्वगीय नर्तक, हरेल, रातवा, नवरंग, नीळकंठ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, मत्स्य गरूड, यासारख्या अनेक पक्षांनी हे जंगल समृद्ध आहे. अनेकदा दुर्मिळ गिधाडांचेही येथे दर्शन होते. याशिवाय अनेक रानपक्षी आणि जलपक्षी यांचे हिवाळ्यातील वास्तव्य आपले लक्ष्य वेधून घेते.

ताडोबा अंधारी प्रकल्प हे खरं तर वाघांचे साम्राज्य असलेली भूमी. येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. त्यामुळे हे जंगल वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास असलेले जंगल समजले जाते. म्हणूनच यावर्षी भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्स इन इंडिया बाबत २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी राखीवला “व्हेरी गुड” तर सह्याद्री व्याघ्र राखीवला “गुड” वर्ग मिळाला आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे निव्वळ वाघांचे जंगल नाही येथे वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही येथे आहेत. जवळपास २० जातींचे मासे, असंख्य जातींचे कीटक आणि विविध प्रजातींच्या वनस्पतींनी हे जंगल संपन्न आहे.
येथे जाण्यापूर्वी...
निसर्ग ही आपल्यासाठी सर्वात मोठी शाळा आहे, तेथे आपण बरच काही शिकू शकतो. या निसर्गाचे अस्तित्व टिकून राहिले तरच आपलेही अस्तित्त्व अबाधित राहणार आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कृतीने या निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेला हा समृद्ध वारसा आपल्या पुढच्या पिढीलाही असाच संपन्न अवस्थेत हाती देता यावा यासाठी प्रत्येकाने जंगलात जाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. असे केल्यास जंगलात नैसर्गिक अवस्थेत हे प्राणी कसे जीवन जगतात, कसे राहातात याचा निखळ आनंद आपण घेऊ शकतो. संयम आणि शिस्त या दोन गोष्टींची शिदोरी बरोबर घेऊन गेल्यास आणि शांतपणे वनविहार केल्यास वन्यप्राणी हमखास दिसून येतात.

निवास व्यवस्था : मोहर्ली आणि कोलारा येथे वन विकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल आहे. आरक्षणासाठी (www.fdcm.nic.in) वर संपर्क करावा. याशिवाय मोहर्ली येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकूलही आहे. आरक्षणासाठी (www.maharashtratourism.gov.in) संपर्क करावा. मोहर्ली आणि कोलारा येथे खाजगी पर्यटक निवासही उपलब्ध आहेत.
प्रवेश : मुख्य प्रवेश मोहर्ली येथून आहे. त्याशिवाय कोलारा, झरी आणि पांगडी येथूनही प्रवेश दिला जातो.

कसे पोहोचाल :विमान - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर १५५ कि.मी
रेल्वे - चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य मार्ग) ४५ कि.मी
रस्ता - चंद्रपूर- ४५ कि.मी, चिमूर- ३२ कि.मी
- डॉ. सुरेखा म. मुळे,
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
संदर्भ (वन विभाग)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India