आकर्षक अजिंठा-वेरूळ लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी या जग प्रसिद्ध लेणी असून ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभास ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीवल फॉर सोशल ॲण्ड कल्चरल रिलेशनशिप 2016 या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबादमध्ये अजिंठा-वेरुळ येथे करण्यात आले होते. 

धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टमार्फत शहरात प्रथमच या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध मैत्रीपूर्ण करून सहकार्याची भावना निर्माण व्हावी, होतकरुंना रोजगार, व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात. बौद्ध राष्ट्रांतील उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवणूक करावी तसेच या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देश ठेऊन या फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या राज्याला बौद्धधर्माची वैभवशाली वारसा स्थळे अंजिठा-वेरुळच्या रुपात लाभलेली असून या पार्श्वभूमी वर देशविदेशातील बौद्धधर्माचे अभ्यासक, उपासक यांच्यासाठी अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बुद्धीस्ट सेंटर’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खाद्य संस्कृती, विविध कला चित्रपट निर्मिती संस्कृती दर्शन दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
अजिंठा-वेरूळ लेण्यांविषयी

अजिंठा लेणी 
अजिंठा-वेरूळची लेणी ही त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे हा होता अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून झाली. कालांतराने तिचे रुपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रुप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्माण केली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वेरूळ लेणी
महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरुळ आहे. वेरुळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती.

बौद्ध लेणी 
वेरुळची बौद्ध लेणी ही येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत. यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेक मजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासेच वाटावे असे कोरलेले आहेत. या स्तुपात बुद्धाची धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी या लेण्यात एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरुळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरुपातील आहे.

विश्वकर्मा लेणी
हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

राजविहार लेणी

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली ही लेणी तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंह प्रतिमा आहेत. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

कैलास मंदिर
वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगता येत नाही परंतु इ.स. १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील मंदिरात पूजाअर्चा होत होती व गाभाऱ्यासमोरील मंडपामध्ये साधुसंत राहत असत.

जैन लेणी
वेरुळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

घृष्णेश्वर मंदिर
वेरुळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

कसे जावे - 
रस्ता मार्गे – औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गाने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या (luxury buses) चालविल्या जातात. (अंतर सुमारे ३९२ कि.मी.). अजिंठा लेणी जळगांव शहराच्या जवळ आहेत, तर वेरुळची औरंगाबाद जवळ.
लोहमार्गे (रेल्वे) - औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद (अजिंठा-वेरूळ) ची सफर घडवते.

लेणी पाहण्याची वेळ -
सोमवार आणि राष्ट्रीय सुट्टयांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांसाठी पाहण्याकरता लेणी उघडी असतात.

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India