राज्य शासनाचे क्रांतीकारी पाऊल

चार स्तरांवर महिला लोकशाही दिन आयोजित करण्याचे शासनाने अलिकडेच घोषित केले आहे. हा महिला लोकशाही दिन आहे तरी काय ? तो कशासाठी आयोजित केला जात आहे. ? कोणत्या महिला आणि कोणत्या तक्रारी या महिला लोकशाही दिनात मांडता येतात, अशा अनेक शंका महिलांच्या मनात उदभवू शकतात. महिला लोकशाही दिनात अर्ज कसा करावा, कुठे करावा, कुणाला अर्ज करता येतो, या संबंधात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे. 

राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला असला तरीही भारतीय समाज व्यवस्था लक्षात घेता महिलांना समाजात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते हे वास्तव आहे. महिलांना त्यांचे हक्क आणि संधी मिळावी, त्याचप्रमाणे पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक व्हावी आणि त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला लोकशाही दिन तालुका, जिल्हा, विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरावर आयोजित करण्याचा निर्णय शासनाने 4 मार्च रोजी घेतला.

महिला लोकशाही दिन राज्यात चार स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याचा चौथा सोमवार, जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, विभागीय आयुक्त स्तर आणि राज्यस्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार महिला लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. अर्थात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस हा महिला लोकशाही दिन असणार आहे. 

महिला लोकशाही दिनासाठी प्रत्येक स्तरावर महिला लोकशाही दिन समितीचे गठन करण्यात आलेले आहे. मंत्रालयीन स्तरावर महिला व बाल विकास मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत. तर राज्यमंत्री, भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ महिला अधिकारी, भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ महिला अधिकारी आणि महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे सदस्य आहेत. राज्य महिला आयोगाचे सचिव या समितीचे सदस्य सचिव आहेत. 

विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत. भारतीय प्रशासन सेवा आणि भारतीय पोलीस सेवेच्या वरिष्ठ महिला अधिकारी या सदस्य तर महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उप आयुक्त सदस्य सचिव आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, हे समितीचे अध्यक्ष असून तालुका स्तरावर तहसिलदार समितीचे अध्यक्ष आहेत. प्रशासकीय महिला अधिकारी व वरिष्ठ पोलीस महिला अधिकारी तसेच गटविकास अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. 

अर्ज स्वीकृतीचे निकष - महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करताना तो विहित नमुन्यात असावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे आणि तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा असे अर्ज स्वीकृतीचे निकष ठेवण्यात आले आहेत. ज्या अर्जदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, सेवा वा आस्थापना विषयक आहे, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नाही आणि अर्ज विहित नमुन्यात नाही असे अर्ज महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. 

महिला लोकशाही दिन केव्हा होणार नाही- ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्या त्या ठिकाणी महिला लोकशाही दिन त्या काळात होणार नाही. विधी मंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावरील महिला लोकशाही दिन होणार नाही. 

कार्यवाही -
 महिला लोकशाही दिनी प्राप्त होणाऱ्या सर्वस्तरावर तक्रार अर्ज स्वीकारल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येतील. संबंधित विभाग प्रमुख सदर तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह महिला लोकशाही दिनाच्या दिवशी हजर राहणार आहेत. सदर अर्ज व त्यावरील अहवाल, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका याबाबींचा विचार करुन महिला लोकशाही दिनी त्या त्या स्तरावरील समिती योग्य निर्णय घेईल.

महिला लोकशाही दिनी प्राप्त निवेदनावर कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणपणे अर्जदाराला एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर मिळावे अशी योजना आहे. 

लोकशाही दिनात विहित नमुन्यातील अर्जाच्या प्रती नागरिकांना विनासहायास व विनामूल्य उपलब्ध व्हाव्यात अशी व्यवस्था करण्यात आली असून तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महिला आयोग यांच्या कार्यालयात विहित नमुन्याच्या प्रती उपलब्ध होवू शकतात. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातही हे अर्ज मिळू शकतील. 

अर्ज कसा करावा ? -
 तालुका महिला दिनासाठी अर्जदाराने आपला अर्ज तहसिलदाराना उद्देशून करावा. त्याचप्रमाणे तहसिलदार कार्यालयात महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आणि वेळेत अर्जदाराने मूळ अर्जासह उपस्थित रहावे. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात केलेल्या अर्जाची आगावू प्रत महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर तहसलिदारांकडे पाठविणे आवश्यक आहे. या बाबींची पूर्तता केली नाही तर महिला लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही. अर्जदाराचे नाव व पूर्ण पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक अर्जावर लिहावा. विनंती/निवेदन/तक्रारीच्या समर्थनार्थ दाखल केलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी महिला लोकशाही दिनात अर्ज करताना अर्जदाराने तालुका महिला लोकशाही दिनात अर्ज केला होता काय, केला असल्यास तो क्रमांक आणि तहसिलदारांकडून मिळालेले उत्तर याचा तपशिल द्यायचा असून जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून अर्ज करावा. येथेही अर्जदाराने मूळ अर्जासह उपस्थित राहणे आवश्यक असून अर्जाची आगाऊ प्रत 15 दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायची आहे. अर्जासोबत तहसिलदारांच्या उत्तराची प्रत जोडणे आवश्यक आहे.

विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनात अर्ज करताना तो आयुक्तांना उद्देशून करावा. तालुका महिला लोकशाही दिन व जिल्हाधिकारी स्तरावरील महिला लोकशाही दिन टोकन क्रमांकाची प्रत, तहसिलदारांच्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्तराची प्रत अर्जासोबत जोडावयाची आहे. मूळ अर्जासह आयुक्तांच्या कार्यालयात महिला लोकशाही दिनाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विहित नमुन्यातील अर्जाची आगाऊ प्रत 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे.

राज्यस्तरावरील मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज महिला व बाल विकास मंत्री यांना उद्देशून करावा. अर्जासोबत तालुका महिला लोकशाही दिनाच्या टोकन क्रमाकांची प्रत जोडावी. या अर्जावर अर्जदाराचे नांव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी /भ्रमणध्वनी क्रमांक, विषय, तालुका स्तरावर अर्ज केला होता काय, असल्यास त्याचा टोकन क्रमांक अर्जावर लिहावा. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे महिला लोकशाही दिनात अर्ज केला असल्यास त्याचा टोकन क्रमांक तसेच संबंधितांनी दिलेल्या उत्तराची प्रत या अर्जासोबत जोडावी.

महिला लोकशाही दिनाचा 4 मार्च रोजी शासन निर्णय विहित नमुना आदी सविस्तर माहिती, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नव्यानेच आयोजित करण्यात येत असलेल्या महिला लोकशाही दिनाचे शासनाने उचलले पाऊल हे पुरोगामी राज्याने महिलांची प्रतिष्ठा, त्यांचे हक्क, संधी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी उचलेले एक आणखी क्रांतीकारी पाऊल आहे हे नक्की. या संधीचा फायदा पिडित महिलांनी घ्यावा.

-आकाश जगधने

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India