वाघोबाच्या गावात : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

ऊंच ऊंच पर्वत रांगा, खळाळत वाहणाऱ्या वारणा-कोयना सारख्या नद्या आणि हिरवीगार वनराई यामुळं पश्चिम घाटाचं क्षेत्र हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले हे क्षेत्र आहे. येथे सुंदर अशा विविध फुलांनी नटलेले कास पठार आहे, कोयना- राधानगरी अभयारण्‍य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा परिसर जैवविविधतेच्यादृष्टीने समृद्ध तर आहेच पण पर्यावरणाच्यादृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

जंगलात वाघ असणं हे समृद्ध जंगलाचं प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम ही केले जाते. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते तिथे जंगल हे सर्वदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. जंगल चांगले असल्याचा लाभ माणसास देखील मिळतो, पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच माणसाला आवश्यक असलेला निरोगी श्वासही त्यातूनच मिळतो. 

जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असलेले हे क्षेत्र निम सदा हरित जंगल असून दुर्गम, अति उतार असलेले, डोंगराळ आणि घनदाट स्वरूपाचे हे जंगल आहे. या भागात सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम घाटातील वनस्पती संपदा पाहिली तर थक्क व्हायला होते. जवळपास साडेचार हजार प्रजातीच्या वनस्पती येथे असल्याचा अंदाज आहे. यात स्थानिक, दुर्मिळ वृक्ष प्रजातींचा समावेश आहे. ऑर्किड फुलाच्या २४५ प्रजाती येथे आढळतात. रानतेरडा वनस्पतीच्या ७२ तर कंदी फुलांच्या ४६ प्रजाती आढळतात. कारवी च्या १८ प्रजाती आढळतात. सस्तन प्राणी, स्थानिक आणि स्थालांतरीत होऊन येणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी अशा किती तरी पशु-पक्षी आणि प्राण्यांनी हा प्रदेश संपन्न आहे. वन पर्यटकांना मनसोक्त आनंद देणारे आणि वन्यजीव अभ्यासकांचे औत्सुक्य अजून वाढवणारे हे क्षेत्र गडकिल्ल्यांच्या पर्यटनासाठी ही आकर्षणाचे ठिकाण आहे. 

२०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्या ही येथूनच उगम पावतात. वारणा आणि कोयना नद्यांवर धरणाची निर्मिती करण्यात आली असून कोयनेच्या पाण्यावर महत्वाचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. पश्चिम –दक्षिण महाराष्ट्रातील शेती या पाण्यावर अवलंबून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. येथे वाघांचे अस्तित्त्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. असं असलं तरी ऊंचसखल डोंगर रांगाचा हा प्रदेश असल्याने येथे व्याघ्र दर्शन दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प विदर्भाबाहेरील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. 

चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.कि.मी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.कि.मी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्याची जागतिक पातळीवर नोंद ही आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकलपामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कसे पोहोचाल :
विमान: पुणे २१० कि.मी
रेल्वे: मिरज जंक्शन ११० कि.मी. कोल्हापूर ८० कि.मी, कराड ६० कि.मी
रस्ता: कोयना नगर: कोल्हापूर- १३० कि.मी. कराड- ५६ कि.मी, सातारा ९० कि.मी
बामणोली/तापोळा: सातारा- ४० कि.मी, सातारा- महाबळेश्वर-तापोळा- ९० कि.मी
चांदोली: मुंबई ३८० कि.मी, कोल्हापूर ८० कि.मी, कराड- ६० कि.मी

-डॉ. सुरेखा मधुकरराव मुळे
संदर्भ : वन विभाग

वाघोबाच्या गावात... : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प

जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.. श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष... ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही. आपली नजर सतत शोध घेत असते पाणवठ्यावर जाणवणाऱ्या हालचालीचा.. हा कानोसा घेत असतांनाच जर “वाघोबां”चे दर्शन झाले तर अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि तो थरार बरंच काही सांगून जातो...

ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली...

येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले तर अंधारी वन्यजीव अभयारण्याला या अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या अंधारी नदीवरून नाव देण्यात आले.

वाघांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाल्यानंतर भारतात व्याघ्र संरक्षणासाठी प्रयत्न सुरु झाले. वाघांच्या शिकारीवर बंदी आली. पाठोपाठ वाघांच्या कातडीच्या विक्रीवरही बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार होऊन व्याघ्र प्रकल्पाचा विशेष दर्जा निर्माण झाला. त्यात महाराष्ट्रातील मेळघाट जंगलाचा समावेश होता.

कालांतराने ताडोबा आणि अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे.

समृद्ध वनसृष्टी
येथील जंगल हे प्रामुख्याने कोरड्या पानगळीचे आहे. ते दक्षिण उष्णकटिबंधीय पाणझडीचे वन या प्रकारात मोडते. सागवान आणि बांबूच्या झाडांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. याशिवाय अर्जन, धावडा, करई, तेंदू, मोह, कुंभा, पळस, बहावा, रोहीण, कुसूम, बेहडा, आवळा, जांभूळ, आंबा, उक्षी या प्रमुख वृक्ष प्रजातीही येथे पहावयास मिळतात.

हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते. शिशिरातील पानगळ, वसंतातील मोहर असा ऋतूबदल येथेही प्रकर्षाने जाणवतो. पळस, पांगारा, कुंभा वृक्षांची मनोहारी रंगी बेरंगी फुलं मन हरखून टाकतात. आसमंतात मोहाचा सुगंध दरवळत असतो. ग्रीष्माची चाहूल लागताच वाढत्या उष्म्याने बहावा, अर्जन सलई, गुलमोहर सारख्या वृक्षांना बहर येतो. पानगळीने सांगाडे झालेल्या वृक्षांवर नवी कोवळी उमलती डोके वर काढू लागते. आयुष्याच्या रहाटगाड्यातील बालपण, तारूण्य आणि वार्धक्याच्या सगळ्या अनुभूती या वृक्षांनाही न चुकल्यासारख्या वाटतात आणि वास्तवादी आयुष्याचे दर्शन होऊन पाय जमीनीवर राहण्यास मदत होते.
वन्यप्राण्यांचे वैविध्य
वन्य प्राण्यांच्या “सहज” दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे. पट्टेवाला वाघ हे या जंगलाचे वैशिष्ट्य. येथे वानर, रानडुक्कर, चितळ, सांबर, गवे यांचे मोठमोठाले कळप दिसून येतात. जगातील सर्वात मोठा वन्यबैल म्हणून ज्याला संबोधलं जातं असा गवा येथे आहे. शिंगाच्या दोन जोड्या डोक्यावर घेऊन मिरवणारा चौसिंगा येथे आहे. ऊंच उडणारा सारस, सर्वात वेगाने उडणारा बहिरी ससाणा, जगातील सर्वात मोठे शृंगी घुबड, जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा किडा “सन स्पायडर”, जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलस, जगातील सर्वात मोठे जाळे विणणारा “वृक्ष कोळी”ही येथे आहे. याशिवाय भित्रे भेकर, वाळवी-किडे खाण्यात मश्गुल असणारे अस्वल आणि शिकारीच्या प्रयत्नात असलेली रानकुत्रीही आपल्याला भेटतात. अत्यंत रुबाबदार असलेल्या बिबळ्याचे दर्शनही येथे सहजगत्या होते. याशिवाय चांदी अस्वल, रान मुंगूस, तुरेवाला सर्प गरूड, तीसा, मधळ्या गरूड, मगर, घोरपड, रान सरडा, राखी रानकोंबडा, टकाचोर, उदमांजर, रानमांजर, सायळ, ससा, उडणारी खार असे प्राणीही आपल्याला भेटतात.

पक्ष्यांच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे भूतलावरचा स्वर्गच आहे. मोर, तुरेवाला कोतवाल, हळद्या, स्वगीय नर्तक, हरेल, रातवा, नवरंग, नीळकंठ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, मत्स्य गरूड, यासारख्या अनेक पक्षांनी हे जंगल समृद्ध आहे. अनेकदा दुर्मिळ गिधाडांचेही येथे दर्शन होते. याशिवाय अनेक रानपक्षी आणि जलपक्षी यांचे हिवाळ्यातील वास्तव्य आपले लक्ष्य वेधून घेते.

ताडोबा अंधारी प्रकल्प हे खरं तर वाघांचे साम्राज्य असलेली भूमी. येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. त्यामुळे हे जंगल वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास असलेले जंगल समजले जाते. म्हणूनच यावर्षी भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्स इन इंडिया बाबत २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी राखीवला “व्हेरी गुड” तर सह्याद्री व्याघ्र राखीवला “गुड” वर्ग मिळाला आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे निव्वळ वाघांचे जंगल नाही येथे वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही येथे आहेत. जवळपास २० जातींचे मासे, असंख्य जातींचे कीटक आणि विविध प्रजातींच्या वनस्पतींनी हे जंगल संपन्न आहे.
येथे जाण्यापूर्वी...
निसर्ग ही आपल्यासाठी सर्वात मोठी शाळा आहे, तेथे आपण बरच काही शिकू शकतो. या निसर्गाचे अस्तित्व टिकून राहिले तरच आपलेही अस्तित्त्व अबाधित राहणार आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कृतीने या निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेला हा समृद्ध वारसा आपल्या पुढच्या पिढीलाही असाच संपन्न अवस्थेत हाती देता यावा यासाठी प्रत्येकाने जंगलात जाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. असे केल्यास जंगलात नैसर्गिक अवस्थेत हे प्राणी कसे जीवन जगतात, कसे राहातात याचा निखळ आनंद आपण घेऊ शकतो. संयम आणि शिस्त या दोन गोष्टींची शिदोरी बरोबर घेऊन गेल्यास आणि शांतपणे वनविहार केल्यास वन्यप्राणी हमखास दिसून येतात.

निवास व्यवस्था : मोहर्ली आणि कोलारा येथे वन विकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल आहे. आरक्षणासाठी (www.fdcm.nic.in) वर संपर्क करावा. याशिवाय मोहर्ली येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकूलही आहे. आरक्षणासाठी (www.maharashtratourism.gov.in) संपर्क करावा. मोहर्ली आणि कोलारा येथे खाजगी पर्यटक निवासही उपलब्ध आहेत.
प्रवेश : मुख्य प्रवेश मोहर्ली येथून आहे. त्याशिवाय कोलारा, झरी आणि पांगडी येथूनही प्रवेश दिला जातो.

कसे पोहोचाल :विमान - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर १५५ कि.मी
रेल्वे - चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य मार्ग) ४५ कि.मी
रस्ता - चंद्रपूर- ४५ कि.मी, चिमूर- ३२ कि.मी
- डॉ. सुरेखा म. मुळे,
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
संदर्भ (वन विभाग)

वाघोबाच्या गावात... नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. हे राखीव क्षेत्र जैवविवधतेने संपन्न असून कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. येथील भौगोलिक रचना चढउताराची असून झेंडा पहाड हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ७०२ मी. ऊंचीवर आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याचा पूर्वेकडील ग्रीन ओॲसिस आहे. जैवविविधता संवर्धनासाठी अतिशय पोषक असे वातावरण असल्याने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरत आहे. हे ठिकाण निसर्गातील जिवंत संग्रहालय असून येथील निसर्गदृष्ये मोहून टाकणारी आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना २०१३ मध्ये निर्गमित करण्यात आली.

यात जवळपास २०० पक्षांची नोंद आहे.. शिवाय ढाण्या वाघासमवेत बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्पगरूड, मत्स्यगरूड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग कोतवाल अशा अनेक प्राणी आणि पक्षांचा निवास येथे आहे. या अभयारण्याच्या जवळच कोसमतोंडी, चोरखमारा, अंधारबन, नागदेव पहाडी सारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी “पिटेझरी आणि चोखमारा” असे दोन गेट आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणं शांतपणे गवत खातांना दिसतात. पावलागणिक दिसणारी हरणं आणि त्यांच्या आजुबाजूला हुंदडणारी माकडे हे दृष्य पाहण्यासारखं असतं. अभयारण्यात गवताळ कुरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यासारखे शेकडो तृणभक्षी येथे आढळतात.

नागझिरा हे महाराष्ट्रातील जुनं आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य. येथील घनदाट वनराईत कमालीचे वैविध्य आहे.. यामध्ये साग, ऐन, बांबू, आवळा, बिब्बा, सप्तपर्णी, बीजा, साजा, तिवस, धावडा हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसूम, अशी ऊंचच ऊंच वाढणारी आणि घनदाट पांगोरा असलेली झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती झाडाला लगटून मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. जंगलाच्या मध्यावर एक विस्तीर्ण जलाशय आहे.

संपूर्णत: नैसर्गिक वातावरणात भटकंती करण्याचा आनंद देणारं हे वन आहे. रात्रीच्यावेळी झाडांच्या फांद्यांमधून जमीनीवर अलगद झिरपणारा चंद्रप्रकाश आणि पाण्यातली चांदण्यांची शिपंडण पाहणं, त्याचा आनंद घेणं अवर्णनीय.

समृद्ध वनसृष्टीचे दर्शन या अभयारण्यात घडते. जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य उष्म पानगळीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. ताडोबानंतर नागझिरात वाघांचे दर्शन होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा इकडे वळाला आहे. येथे आढळतो महाराष्ट्राचा राज्यपक्षी “हरियाल”. याशिवाय हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तुरेवाला सर्पगरूड, मत्स्यगरूड, व्हाईट आईड बझार्डही येथे आहे. या अभयारण्यात मलबार हॉर्न बिल, हिरवा सुतार, चेस्टनट नावाची फुलपाखरं आणि निरनिराळ्या प्रकारचे कोळीही आढळतात... उन्हाळ्याचे दिवस आणि संध्याकाळची वेळ म्हणजे वन्य प्राणी बघण्याची अतिशय उत्तम स्थिती.

जंगलावर आधारित तेंदूपत्ता गोळा करणे हा येथला महत्त्वाचा व्यवसाय आहे. तेंदू वृक्ष ४० फुट ऊंचीपर्यंत वाढतो. पण तेंदू पानांकरिता त्याची जमीनीलगतच छाटणी करण्यात येते. एप्रिल आणि मे महिन्यात या झाडांना चांगली पालवी फुटते. जास्त जुनं ही नाही आणि कोवळीही नाही अशी पानं तोडली जातात. दहा पंधरा दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर या पानांची रवानगी गोदामात होते आणि मग आवश्यकतेनुसार पानं जराशी ओली करून ती‍ वापरली जातात.

पानगळीमुळे सागासारखे सगळे वृक्ष अंग झटकून पुन्हा फुलण्यासाठी मोकळे झालेले असतात. त्यामुळे दूरवरचा वेध घेणारी नजर आपल्याला अनेकदा खुप चांगले दृष्य टिपण्याचीही संधी देते. नागझिरा अभयारण्यात अंधारबन, बंदरचुवा, काटेथुवा अशा विचित्र नावाच्या बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत. सर्वसामान्य पर्यटकाना त्या सहसा माहित नसतात त्यामुळे तिथे जातांना स्थानिक माहितगाराची मदत घ्यावी लागते. हे याच परिसरातील गोंड आदिवासी आहेत.

अभयारण्य म्हणजे घाई घाईने बघायची गोष्ट नाही. कुठल्याही जंगलभ्रमंतीत आवश्यक असते ती शिस्त आणि संयम इथेही आवश्यक आहे. रानवाटांवरून फिरणं हा केवळ छंदाचा भाग नाही तर तो अनुभव आहे... जो जगायला शिकवतो, आपल्या अनुभवाची शिदोरी अधिक संपन्न करतो. चिकाटी, चौकसदृष्टी ठेऊन मिळेल ते पाहण्याचा आणि येईल तो अनुभव स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास नागझिरा हा आनंदाचा ठेवाच ठरतो.

दक्षिण उष्ण कटिबंधिय शुष्क पर्णगळीच्या वनात मोडणाऱ्या निसर्गरम्य नागझिऱ्यात सरपटणारे प्राणीही अनेक आहेत. अजगर, नाग, धामण, पट्टेरी मण्यार, घोरपड याठिकाणी दिसून येतात. ऑक्टोबरची हिरवळ मनाला जशी मोहून टाकणारी असते तशीच मे महिन्याची पानगळही आपल्याला बरच काही सांगून जाते.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन्यजीवांचे दर्शन या अभयारण्यात होते. डिसेंबर ते जून हा या अभयारण्यात फिरण्यास जाण्यास उत्तम कालावधी असून या अभयारण्याशेजारीच पॅनोरमा पॉईंट आहे शिवाय कपड्यादेव मचाण आणि बंदरचूहा मचाण आहे, जिथून वन्यजीव प्राण्यांचे दर्शन आणि निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहता येते. नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी पिटेझरी आणि चोखमारा असे दोन गेट आहेत. साकोली गावापासून अंदाजे २२ कि.मी अंतरावर नागझिरा अभयारण्य आहे तर दुसरीकडे ३० कि.मी अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. जंगलसफारीसाठी खाजगी वाहनांबरोबरच वन विभागाच्या मिनी बसेस आणि इतर वाहने उपलब्ध आहेत. गोंदिया व साकोली येथे वन विभागाचे विश्रामगृह आहेच शिवाय नागपूर, गोंदिया शहरात खाजगी निवास व्यवस्थाही आहे.
कसे पोहोचाल :

विमान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर १२० कि.मी.
रेल्वे : भंडारा रोड - ३५ कि.मी., गोंदिया - ५० कि.मी., सौंदड - २० कि.मी., तिरोरा - २० कि.मी.
रस्तेमार्ग - नागपूर ते नागझिरा १२२ कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग ६ वरील साकोली गाव २२ कि.मी.
- डॉ.सुरेखा म. मुळे,
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
संदर्भ : वन विभाग

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना

कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, मृद व जलसंधारण कामासाठी सन 2014-15 मध्ये राबविलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कोरडवाहू शेती अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास, कृषी यांत्रिकीकरण अभियान, मृदा आरोग्य अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम (VIIDP), जलयुक्त शिवार अभियान, पीक विमा खरीप हंगाम 2014-15 आदी ठळक योजनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षभरातील योजना निहाय कृषी विभागाच्या कार्याची माहिती पुढीलप्रमाणे…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके)

सन 2014-15 मध्ये तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले. सदर अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मुलद्रव्ये व्यवस्थापन, तसेच औजारे पुरवठा या घटकाचा अंतर्भाव होता. सन 2014-15 एकूण 13 कोटी 12 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

सन 2015-16 करीता सदर अभियानाअंतर्गत एकूण रु. 14 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर असून सद्यस्थितीत आंतरपिक पद्धतीवर आधारित सोयाबीन + तूर पिकाचे व कपाशी + मुगाचे सहा प्रकल्प राबविण्यात आले. रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 71 प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
कोरडवाहू शेती अभियान

शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सन 2013-14 पासून राबविण्यात येत असून एकूण 13 तालुक्यातील 13 गावांमध्ये तीन वर्षे हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी औजारे, शेतमालासाठी वाहन, दालमिल, पॅक हाऊस, शेडनेट हाऊस, पाईप/डिझेल पंपसेट, ठिबक व तुषार संच, प्लास्टिक क्रेट्स, हरितगृह इत्यादी लाभाचे घटक अनुदानावर पुरवठा करण्यात येत आहेत. तसेच सिमेंट नालाबांध व शेततळे यासारख्या घटकांच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

सन 2013-14 मध्ये 1 कोटी 39 लक्ष रुपये व सन 2014-15 मध्ये तीन कोटी 53 लक्ष रुपये असा एकूण चार कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी या अभियानांतर्गत खर्च करण्यात आलेला आहे. तसेच सन 2015-16 करीता जिल्ह्याचा तीन कोटी 22 लक्ष रुपये अनुदान निधीचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आलेला आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन 2014-15 मध्ये जिल्ह्यात 3 प्रकल्प राबविण्यात आले असून 1 कोटी 9 लक्ष 54 हजार रुपये निधी खर्च झाला. या निधीमधून पशुधन खरेदी, पाणी उपसा साधने, पाईप, भूसुधारणा, पॅकहाऊस, हरितगृह हे घटक राबविण्यात आले आहे. सन 2015-16 करीता जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आलेली असून रु. 1 कोटी 39 लक्ष निधीचा वार्षिक कृती आराखडा तयार असून 34 लक्ष रुपयाचा पहिला हप्ता प्राप्त आहे.
मृदा आरोग्य अभियान

नैसर्गिक साधन सामग्रीचे व्यवस्थापनासाठी मृद परिक्षण व सर्वेक्षणाचे आधारे योग्य खताच्या संतुलित वापरासाठी मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. दर तीन वर्षात एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन 2015-16 मध्ये एकूण 398 गावांमध्ये 17 हजार 747 मृद नमुने काढण्यात आले असून विश्लेषणासाठी मृद नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

या अभियानांतर्गत सन 2015-16 करीता जिल्ह्याला एकूण सहा कोटी 11 लक्ष 35 हजार रुपयाचा कार्यक्रम मंजुर होता. यातून केळी लागवड, पॅक हाऊस, शेड नेट, पॉली हाऊस, 20 अश्वशक्तीच्या आतील ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, सामुहिक शेततळे, संत्रा पुनरुज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजना

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत अमरावती जिल्ह्यास नऊ कोटी 67 लक्ष रुपयाचा कार्यक्रम मंजूर होता. ऑक्टोबरअखेर सात कोटी 39 लक्ष रुपये प्राप्त असून त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
सूक्ष्म सिंचन कार्यक्रम (VIIDP)

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन 2012-13 पासून राबविण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यास 75 टक्के व इतर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ठिबक व तुषार संच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सर्व सूक्ष्म सिंचन प्रस्ताव ऑनलाईन असून शेतकऱ्यांच्या खात्यावर RTGS प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

सन 2013-14 मध्ये 12,085 लाभार्थींना 11,392 हे. क्षेत्रावर ठिंबक/तुषार सिंचन संचासाठी रु. 2561.63 लाख अनुदान अदा करण्यात आले. सन 2014-15 मध्ये 740 लाभार्थ्यांना 666 हेक्टर क्षेत्रासाठी रु. 158.83 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियान
अमरावती जिल्ह्यात एकूण 253 गावे निवडण्यात आली असून त्यापैकी आजअखेरपर्यंत 248 गावांमध्ये एकूण 4,358 कामे पूर्ण झाली आहेत. 253 कामे प्रगतीपथावर आहेत. झालेल्या कामातून 20122 टी.एम.सी. इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यातून 22879 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
पीक विमा योजना

खरीप हंगाम सन 2014-15 मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 1,16,130 शेतकऱ्यांना रु. 83 कोटी 92 लक्ष विमा नुकसान भरपाई मंजूर झाली. तसेच हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2014-15 अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 37,886 शेतकऱ्यांना रक्कम रु. 15 कोटी 24 लक्ष रुपयांचा विम्याचा लाभ मिळालेला आहे.

सन 2015-16 मध्ये हवामानावर आधारित पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 39,740 शेतकऱ्यांनी 53,228 हेक्टरचा विमा काढून रु.552.30 लाखाचा शेतकरी भरणा केलेला आहे. तसेच हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत जिल्ह्यातील 6076 शेतकऱ्यांनी 7190.12 हेक्टरचा विमा काढुन रु.237.27 लाखाचा शेतकरी भरणा केलेला आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यात 1,43,563 शेतकऱ्यांसाठी 1,34,835 हेक्टरचा विमा काढून रु.666.33 लाखाचा भरणा शेतकऱ्यांनी केलेला आहे.
-सुरेश काचावार,
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती.

वाघोबाच्या गावात.... मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. या पर्वत रांगांना गाविलगड पर्वत रांग असंही संबोधलं जातं. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या पाच नद्या वाहतात. त्या पुढे तापी नदीला जाऊन मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत. विविध प्राणी, जैव संपदा आणि वनांनी समृद्ध असा प्रदेश आहे.

हिरवाईची चादर पांघरलेला आणि हिरवाईचाच गालीचा अंथरलेला हा प्रदेश दूरवर पसरलेल्या ऊंच ऊंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्यांनी श्वास रोखून धरायला लावतो. ऊंचावरून कोसळणारे धबधबे, विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला मोहून टाकतात. पावसाळ्यात तर ढग हातावर उतरल्यासारखे वाटतात. गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८० चौ.कि.मी), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (७८८.७५० चौ.कि.मी), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (१२.३५० चौ.कि.मी), वान वन्यजीव अभयारण्य (२११.००६ चौ.कि.मी) आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (१२७.११० चौ.कि.मी) असे क्षेत्र मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्त्वात आला आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहात असून इतर समाजाचेही लोक राहातात. 

येथे पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरूड, पारवे, बुलबूल असे पक्षी देखील आहेत. या अभयारण्यात सागाची झाडं विपूल प्रमाणात आहेत. वाघ आणि आदिवासी लोक इथं एकत्र नांदतांना पहावयास मिळतात. मेळघाट जंगलाला कौतुकाने किपलिंग प्रदेश असे संबोधण्यात येते. सातपुडा-मैकलचा हा प्रदेश खोल दऱ्या आणि ऊंच पर्वत रांगांनी बनलेला आहे. पक्ष्यांचे संगीत आणि वाघांच्या डरकाळ्यांनी येथील पर्वतरांगा जिवंत आहेत. 

भारतात घोषीत करण्यात आलेल्या ९ व्याघ्रप्रकल्पांपैकी एक असणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प फेब्रुवारी १९७४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. कोरकू आदिवासींची संस्कृती असणाऱ्या लोकांच्या वस्त्या आणि वाघ यांची ही भूमी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट, वान, आंबाबरवा आणि नरनाळा या अभयारण्याचा समावेश झाला असून अमरावती जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र या व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येते. तर राखीव क्षेत्राचा भाग हा अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांमध्ये येतो.

कसे पोहोचाल :
विमान : नागपूरहून २४० कि.मी
रेल्वे : बडनेरा जंक्शनहून ११० कि.मी
रस्ता : बससेवा - परतवाडा ते धारणी व बऱ्हाणपूर

डॉ.सुरेखा म. मुळे, 
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) 

(संदर्भ - वन विभाग)
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India