सांस्कृतिक भारत : मेघालय

मेघालय हे भारतातील उत्तर- पूर्व राज्य असून शिलाँग ही या राज्याची राजधानी आहे. राज्याची स्थापना 2 जानेवारी 1972 रोजी झाली आहे. मेघालयचा संस्कृत अर्थ मेघाच्‍छादित प्रदेश असा होतो. शिलाँगला पूर्वेतले स्कॉटलंड म्हटले जाते. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. पण 21 जानेवारी 1972 ला खासी, गारो आणि जैंटिया टेकड्या मिळून या तीन जिल्ह्यांना स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. आता राज्यात सात जिल्हे आहेत. मेघालयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे 3,211,000 इतकी असून राज्याचे क्षेत्रफळ 22,429 चौरस किमी इतके आहे. राज्याची साक्षरता 75.78 इतकी आहे.

मेघालयाच्या उत्तर आणि पूर्व ‍सीमेला आसाम आणि दक्षिण व पश्चिम सीमेला बांगला देश आहे. मेघालयात मेघांचे निवासस्थान (मेघ अधिक आलय) म्हणून मेघालय नाव. पहाडी प्रदेश. येथे प्रामुख्याने खासी, जैंटिया आणि गारो जमातीची वसाहत आहे. मेघालयाच्या मध्य आणि पूर्व भागात खासी आणि जैंटियाच्या टेकड्या. भव्य पठार, उतरते गवताळ प्रदेश, टेकड्या, नद्या व दऱ्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. पठाराच्या दक्षिणेकडील भागाला खोल दऱ्या, खिंडी आणि सरळ उभ्या दरडी आहेत. पायथ्याशी अरूंद सपाट मैदानाचा पट्टा थेट बांगला देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेला भिडला आहे.

मेघालय हे कृषीप्रधान राज्य आहे. यातील 80 टक्के लोकसंख्या आपल्या उदरनिर्वाहासाठी कृषीवर अवलंबून आहे. शेतीला पोषक हवामानामुळे हे राज्य प्रगतीपथावर आहे. उष्ण कटीबंधीय व समशितोष्ण वातावरणात फळे व भाज्यांच्या उत्पादनाला येथे जास्त वाव असतो. तांदूळ या प्रमुख पिकाखेरीज संत्रे, अननस, केळी, फणस, उष्ण प्रदेशातील फळे, आलूबुखार, पियर, पिसेस इत्यादी फळांचे उत्पादन होते. बटाटे, हळद, आले (अद्रक), काळे मिरे, पोफळी (सुपारी), आखूड धाग्याचा कापूस, ताग, मेष्टा व मोहरी इत्यादी रोख उत्पन्न देणारी पिकेही घेतली जातात. भुईमुग, सोयाबिन, सूर्यफूल यांचे उत्पादनही राज्यात होते.
शिलाँगपासून अकरा किमी अंतरावरील मीठ या खेडेगावात पाच दिवस चालणारा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. खासी का पामब्लॅग असे त्याचे नाव. वार्षिक नोगक्रेम हा प्रसिद्ध सण. यालाच नोकक्रिमचे नृत्य असेही संबोधले जाते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात खासी लोकांचा शदसुकम्यानीसम नावाचा धार्मिक उत्सव शिलाँगला साजरा करतात. जुलैमध्ये जायटियाम इथे जोवाई लोक देहदिएनख्लम नावाचा चैतन्यमय उत्सव साजरा करतात. ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बांगला नावाचा एक उत्सव सलजॉगला (सूर्यदेव) प्रसन्न करण्यासाठी गारो जमातीतील लोक हा सण साजरा करतात.

निसर्गदत्त सृष्टीसौंदर्य मेघालयात पहायला मिळते. मेघालय हे सृष्टीसौंदर्याने नटलेले राज्य आहे. शिलाँग हे राजधानीचे शहर. अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. येथे वर्डस लेक, लेडी हँड्री पार्क, पोलो ग्रांऊड, छोटे प्राणी संग्रहालय, एलिफंटा धबधबा, शिलाँग पीक, गोल्फ कोर्स, गरम पाण्याचे झरे, चेरापुंजी, जोवई, तुरा, नरतियांग या सारखी अनेक रमनीय स्थळे पहायला मिळतात.
इंग्रजी ही मेघालयची राज्य भाषा असली तरी काही स्थानिक भाषा इथे बोलल्या जातात त्यापैकी खासी, पनार आणि गारो या आहेत. मेघालयातील भाषा आणि ती भाषा बोलणारे लोक खालील प्रमाणे :

भाषा आणि ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे – असमिया – मान; बाईटे - मिझो–बाईटे; बोडो – बोडो कचारी, राभा कचारी; गुटोब – गडाबा; खासी – जैंटिया खासी; खासी-भोई; खासी-खिनरियान; खासी-लिगम; कोच – कोच.

बोरो कचारीस, चकमा, दिमासा, कचारी, गारो, हजोंग, हमार, जैनतीया, सेंतेंग, पनार, वार, भोई, लेंगंगम, कोच, कुकी, चांगसन, चों‍गलोइ, डोऊंगेल, गमालहो, गांगटे, गुइटे, हन्नें‍ग, हाऊकीप, हाऊपीट, हाऊलाइ, हेंगना, होन्सुग, खावाथलांग, खोथालंग, खेलमा, खोलहोन, कीपगेन, लहोजेम, लुफेंग, मांगजेल, मिसाओ, रियांग, सायरहेम, सेलनाम, सिंगसन, सीतलहो, सुकटे, थाडो, थांगेजन, उइबुह, वाइफेइ आदी आदिवासी मेघालयात वास्तव्य करतात.

मेघालय हे ख्रिश्चन धर्मिय राज्य समजले जाते. भारतात ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर इथल्या आदिवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. खासी, गारो आणि जैंटिया ह्या आदिवासींची श्रीमंत सांस्कृतिक परंपरा मेघालयाला लाभली आहे. लाकूड, बांबू आणि ऊसांपासून ते वेगवेगळ्या कलाकुसरी करीत असतात. त्यांचे पारंपरिक वाद्य सुद्धा याच वस्तुंपासून बनवलेले असतात. कार्पेट आणि सिल्क काम सुद्धा इथे परंपरेने चालत आलेले आहे. हस्तकला व्यवसाय आणि बाहुल्यांच्या कलाकृती इथे पहायला मिळतात.

मेघालयातली नृत्य हे उघड्या आकाशाखाली केले जातात. जन्मोत्सव, उत्सव, सण, लग्न विधी, प्रेम आदीत अनेक प्रकारचे ड्रम आणि वाद्य बडवले जातात. सरोवर, टेकड्या, धबधबे आदी ठिकाणी ही नृत्य व गाणी सादर केली जातात. या वेळी विविध प्रकारची वाद्य वाजवली जातात. ढोल, दुतारा, गिटार, बासरी, पिंगाणी, कामट्या या प्रकारची वाद्य इथे प्रचलित आहेत.

मेघालयाचे प्रसिद्ध पारंपरिक नृत्य म्हणजे नॉनगक्रेम हे नृत्य. हे नृत्य धार्मिक नृत्य असून देवाला धन्यवाद देण्यासाठी केले जाते. साधारणत: ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हे नृत्य सादर केले जाते.

शाद सुक मायसियम नावाचे नृत्य रंगीबेरंगी कपडे घालून सादर केले जाते. हिवाळ्यात खासी टेकड्यांच्या भागात हे नृत्य प्रचलित आहे. कुवारपणातले हे पारंपरिक नृत्य असते. परंपरेने चालत आलेली वेषभूषा या नृत्याच्या वेळी केली जाते. या वेळी पार्श्वसंगीतासाठी ड्रम्स, पाईप वाजवले जातात. या वाद्याला तंगमुरी असे म्हणतात आणि हे वाद्य इतर वाद्यांची राणी समजली जाते.

बेहदिनखलम नावाचा अजून एक नृत्य प्रकार असून तो वर्षातून एकदा पावसाळ्यात जुलै महिन्याच्या आसपास केला जातो. जैंटिया या जमातीतील हे प्रसिद्ध प्रवासी नृत्य आहे. चांगल्या गोष्टींच्या उन्नतीसाठी हे नृत्य केले जाते. वांगला उत्सव (गारो), डोरसेगटा नृत्य, लाहो नृत्य असेही अजून काही नृत्य मेघालयात प्रचलित आहे.

सोहरा (चेरापुंजी) हे शहर खासी टेकड्यांवर असून जगातील सर्वात जास्त पाऊस इथे होतो. हा पाऊस केवळ पावसाळ्यातच नसतो तर इथे रोज पाऊस असतो. ब्रम्हपुत्रा, कोपीली, मायनटडू, पियाइन, सोमेश्वरी या नद्या मेघालयातून वाहतात तर खासी, गारो, जयतियारांगा हे पर्वत पहायला मिळतात.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ.सुधीर राजाराम देवरे 
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India