कोकण म्हटले की काजू, आंबा, फणस आणि नारळ-पोफळीच्या बागा डोळ्यासमोर येतात. यांसह शेतकऱ्याच्यादृष्टीने भात पीक हाच येथील अर्थकारणाचा मुख्य आधार. मात्र कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान नव्या पिढीच्या माध्यमातून आता कोकणात रुजू लागले आहे. कृषी विभागाच्या सक्रीयतेमुळे शेतकरी अधिक लाभ देणाऱ्या पिकांकडे वळू लागला आहे. स्वत: शेतात प्रयोग करून शेतकऱ्यांना नवी दिशा देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील मजगावच्या काशिनाथ बापट यांच्यासारख्या कृषी सहायकांमुळे या प्रक्रीयेला गती मिळाली आहे.
बापट यांच्या वडिलांची परंपरागत 49 गुंठे शेती आहे. या शेतात परंपरेने भातपीक घेतले जाई. मात्र बापट यांनी ठिबक सिंचनाचे काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जळगावी केळीची माहिती घेतली. त्यांनी सुहास सहस्रबुद्धे आणि गजानन गोखले या शेतकऱ्यांनाही केळी लागवडीसाठी प्रवृत्त केले. जळगावहून ट्रक भरून केळीची कलमे आणण्यात आली. घरच्या शेतातील 22 गुंठे क्षेत्रात पाच फुटाच्या अंतराने त्यांनी केळीची लागवड केली. दोन रांगांमधील अंतर सात फुट ठेवले. गतवर्षी एप्रिल महिन्यात लागवड केल्यानंतर वेळेवर आवश्यक असणारी खते आणि ठिबकच्या माध्यमातून सिंचन केले. परिणामी एका वर्षात त्यांच्या शेतीतील उत्पादन सुरू झाले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे आणि तालुका कृषी अधिकारी श्री.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बापट यांनी पाणी आणि खताचे उत्तम नियोजन केले. त्यामुळे घडाला चांगली फळधारणा झाली आहे. त्यांना एका घडाचे 450 ते 500 रुपये प्राप्त होत आहेत. भातशेती केल्यास एका गुंठ्याला साधारण दीड हजार रुपये उत्पन्न मिळते, मात्र केळी लागवडीने प्रती गुंठा पाच हजार रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे बापट यांनी सांगितले. जळगावच्या केळीचा दर्जा चांगला असल्याने केळींना बाजारात मागणी आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हे पीक घेतल्यास निश्चितच लाभदायी ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.
कृषी विभागातील आपली सेवा बजाविताना फावल्या वेळात शेतासाठी वेळ देऊन बापट यांनी केलेला हा नवा प्रयोग यशस्वी झाला आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही तो मार्गदर्शक ठरला आहे. मजगावमधील इतर शेतकरीदेखील केळी लागवडीची माहिती घेण्यासाठी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. केवळ पारंपरिक पद्धतीने न जाता नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची आवड शेतकऱ्याला नेहमीच लाभदायी ठरते, हेच त्यांच्या यशातून स्पष्ट झाले आहे.
- डॉ.किरण मोघे
0 comments:
Post a Comment