वरोरा तालुक्यातील अनेक छोटी गावे व वस्त्यांसाठी ग्राम पंचायतीच्यावतीने पाणी पुरवठा योजना राबविणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून या छोटया गावांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने छोटी गावे व वस्त्यांसाठी सौरऊर्जेवर चालणा-या पाणी पुरवठा योजना सुरु केल्याने नागरिकांना आता 24 तास मुबलक पाणी मिळू लागले आहे. त्यामुळे या योजना छोटया गावांसाठी वरदान ठरल्या आहेत.
वरोरा तालुक्यातील सुमठाणा ग्रामपंचायी अंतर्गत येणा-या केमगांव येथील लोकसंख्या 500 च्या आसपास आहे. या गावात पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करुन लांब अंतरावरुन पाणी आणावे लागत होते. गावाशेजारी एकच विहीर आहे. उन्हाळयाच्या दिवसांत त्याही विहीरीचे पाणी आटते.
त्यामुळे गावक-यांना पाणी समस्येशी संघर्ष करावा लागत होता. कमी लोकसंख्या असल्याने पाणी पट्टी करातून नळयोजनेची देखभाल दुरुस्ती व विजेची देयके अदा करणे कठीण असल्याने प्रशासन पाणी पुरवठा योजना राबवित नव्हते. पाण्यासाठीची पायपीट केव्हा थांबेल, या विवंचनेत केम येथील नागरिक असतांनाच, सन 2013 हे वर्ष गावक-यांसाठी भाग्याचे ठरले. गावात सौरऊर्जेवर चालणारी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून आता ग्रामस्थांना 24 तास मुबलक पाणी मिळत आहे. या योजनेतून शंभर मिटर अंतरापर्यंत पाईप लाईन टाकली जाणार आहे. पाणी पुरवठयानजिक वाया जाणारे पाणी एका हौदात साठवून जनावरांच्या पाणी पिण्याचा प्रश्नही निकाली काढला जाणार आहे. केम या गावासोबतच टेमुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या चिचाळा व मांगली दे ग्राम पंचायतीअंतर्गत येणा-या मांगली नवीन वस्तीतही सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा कार्यान्वित करण्यात आल्याने ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणे सुरु झाले आहे.
ग्राम पंचायतींना छोटया गावात व वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित कालावधी देखभाल व वीज देयके भरणे कठीण जाते. अशा गावात सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना सुरु असल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
0 comments:
Post a Comment