पावसाच्या पाण्याचं करून संकलन जयदेववाडी करणार जलपुनर्भरण

मित्रहो,पावसाळा आलाय. . . दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या मनाला गारवा देणारा आणि नवनिर्माणाची ग्वाही घेऊन सुजलाम् सुफलामतेचा संदेश देणारा तुमचा-माझा सगळ्याचा लाडका पाऊस आलाय. तेंव्हा ज्या दुष्काळानं आपल्याला त्रास दिलाय त्या दुष्काळाला आता आपल्या गावात पुन्हा येऊ द्यायचं नाही. गावातलं पाणी गावातच अडवायचं. शेततळी, पाझरतलाव, वनराईबंधारे, सलग समतलचरशिवकालीन पाणी साठवण योजना, ज्या ज्या माध्यमातून आपण पावसाचं पाणी अडवू शकू, मातीत जिरवू शकू त्या त्या सगळ्या माध्यमांचा नेटाने उपयोग करायचा आणि गावात "जलस्वराज्य" आणायचं. . .

175 कुटुंबसंख्या आणि जेमतेम 1336 लोकसंख्या असलेल्या जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव अर्थात जयदेववाडीच्या ग्रामस्थांनी हा संकल्प केला आणि पाहता पाहता गाव कामाला लागले. 175 पैकी जवळपास 35 कुटुंबानी आपल्या घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाचं पाणी संकलित करण्याची सुविधा निर्माण केली. ते विहिर अथवा विंधनविहिरीत सोडलं.

डोंगराच्या कुशीत वसलेली आणि निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघणारी जयदेववाडी ही औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि जळगाव या चार जिल्हयाच्या सीमांनी बंदिस्त झालेली. गावाला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मलकापूर तर सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद.

पर्यावरणपूरक- शाश्वत विकास करतांना गावानं अपारंपरिक उर्जा वापरलाप्राधान्य दिलं. निर्णय झाला आणि सुरवातीलाच 16 कुटुंबांनी सौर उर्जेचा वापर सुरु केला. 5 कुटुंबाने बायोगॅसचा तर 16 कुटुंबांनी निर्धूर चुलीचा वापर सुरु केला.

सुमनबाई उदरभरे या महिला सरपंचाच्या नेतृत्वाखाली गावाची विकासाकडे वाटचाल सुरु असून निकेतन सोळंकेहे ग्रामसेवक म्हणून काम करतांना प्रशासनाला नवी दिशा आणि गती देण्याचं काम करीत आहेत. गाव विकासाची ही सुरुवात आहे. आपल्याला ही विकास दिंडी अतिशय यशस्वीपणे खांद्यावर पुढे न्यायची आहे, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे त्यासाठी उपसाव्या लागणाऱ्या कष्टात देखील त्यांना आनंद मिळतो आहे.

गावात एकूण सहा बचतगट कार्यरत असून त्यातील तीन बचतगट हे दारिद्र्य रेषेखालील लोकांनी एकत्र येऊन स्थापन केले आहेत. उषाताई आंबेकरांच्या अध्यक्षतेखाली गावात महिला सक्षमीकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावात ग्राम आरोग्य, पोषण आणि पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कार्यरत असून ग्रामपंचायतीची इमारत स्वत:च्या मालकीची आहे. गावात अंगणवाडी, भक्तनिवास, दवाखाना आहे.

घर तिथे शौचालय बांधून गावानं 2005-06 मध्ये संपूर्ण गाव निर्मल केलं. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याहस्ते गावाच्या कामाचा सन्मान झाला आणि गाव तालुक्यातलं पहिलं निर्मलग्राम ठरलं. 2007-08 मध्ये गावातील सर्वच्या सर्व म्हणजे 175 कुटुंबाचा विमा उतरवण्यात आला आणि गाव " विमा ग्राम" झालं. गावातील तंटे दूर करून गाव तंटामुक्त करण्याचा निर्धार गावाने केला आणि त्यातही गावाला यश मिळालं 2007-08 मध्ये गावाला "महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम" पुरस्कार मिळाला.

गाव विकासाच्या कामात आणि स्वच्छतेत सातत्य ठेवत ग्रामपंचायतीने 2010-11 मध्ये जिल्हा स्तरावर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. 2013-13 मध्ये ही गावानं हा पुरस्कार मिळवून आपल्या यशाची कमान चढती ठेवली.

गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 2006-07 मध्ये गावानं जलस्वराज्य प्रकल्पात सहभाग घेतला. गावासाठी 70 फुट खोल विहर बांधली. विहिरीजवळ पंपगृह उभारण्यात आला आणि त्यातून पाणी उपसुन ते 45 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेण्यात आलं. तेथून नळाद्वारे लोकांना घरापर्यंत पाणी पोहोंचविण्यात आलं. लोकांची गरज आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आता आणखी 60 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी गावाने बांधलीच पण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनि‍क पाणी पुरवठा विहिर देखील खोदली आहे.

गाव टँकरमुक्त व्हावे यादृष्टीने यावर्षी गावानं विशेष प्रयत्न केले. गावात असलेल्या 10 लाख लिटर क्षमतेच्या पाझर तलावातील सुमारे 1500 ब्रास गाळ काढण्यात आला आणि त्याची ऊंची सुमारे 10 फुटांनी वाढविण्यात आली. गावात 9 वैयक्तिक सिंचन विहिरीचे काम करतांना पाणंद रस्ता दुरुस्तीचे कामही गावानं रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण केलं.

गावानं "पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजने" त देखील सहभाग घेतला. पहिल्या वर्षी 550 आणि दुसऱ्यावर्षी जवळपास 500 अशी मिळून गावानं हजाराहून अधिक झाडं गावात लावली. त्यापैकी 725 झाडं जगवण्यात गावकऱ्यांना यश आलं. गावानं केवळ झाडं लावली असं नाही तर त्याची रजिस्टरमध्ये नेांद घेऊन प्रत्येक झाडला त्याचा क्रमांक असलेला टॅग लावला, वृक्ष ज्या ठिकाणी लावला त्या जागेचा हात नकाशा ही तयार केला.

गावाने योजनेतील पहिल्या दोन वर्षीचे निकष यशस्वीरित्या पूर्ण केल्याने गावाची " पर्यावरण संतुलित समृद्ध गाव ' म्हणून पुरस्कारासाठी निवड झाली आणि विकास कामांसाठी विशेष अनुदानही मिळाले.

गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात 69 टक्के तर यशवंत पंचायतराज अभियानात 64.5 टक्के गुण मिळवले आहेत.

या योजनेने ग्रामपंचायतीच्या कामालाही शिस्त लावली. योजनेमधील करवसुलीच्या निकषाने ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम झाली. आज गावाची करवसुली 100 टक्के आहे.गावात घर तिथे शौचालय असून 16 सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. गावात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे. गावातील पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सवमूर्तींचे विर्सजन करण्याची सोय गावाने केली आहे. गावात 60 पथदिवे असून त्यात24 सोलर दिवे, 36 सी.एफ.एल बल्ब चा समावेश आहे.गावातील आश्रमामध्येही सौर दिव्यांचा वापर केला जातो.

गावाने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनात आघाडी घेतली असून गावातील 100 टक्के कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन होते. गावात जवळपास 12 हजार लिटर सांडपाणी निर्माण होते त्याचेपरसबाग, शोषखड्डे यांच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात आले आहे.

गाव विकास कामांचा केवळ संकल्प करून थांबले नाही तर त्याच्या पुर्ततेच्यादृष्टीने अग्रेसर झाले आहे. जो निर्धार कृतीत उतरतो तो पूर्ण होतो असं म्हणतात. त्यामुळे जयेदववाडीच्या लोकांनी केलेला "जलस्वराज्य" चा संकल्प असो किंवा ग्रामसुधारणेचा तो पुर्ण होणार हे नक्की.
डॉ. सुरेखा म.मुळे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India