मालवण देवबागचं अनोखं 'त्सुनामी आयलंड'..!!

दोन दिवसांपूर्वी गावाकडे आलोय सिंधुदुर्गात.. सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा..!

काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकर्ली, देवबागला गेलो होतो.. माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील 'त्सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती..

'त्सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे.. या बेटाच्या निर्मितीमागे काही शास्त्रीय कारणं असतील परंतू मला वैज्ञानिकीय शास्त्रीय कारणांमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही.. कोणत्याही गोष्टीमागील कारणाचं अॅनालिसीस केलं की त्यातला रोमॅंटीसीझम संपलाच समजायचं..

हे आयलंड सभोवार पाणी आणि मध्येच जमीन अशा नेहेमीच्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं आहे.. इथं सभोवार पाणी आणि मध्येही पाणीच असा काहीसा प्रकार आहे.. फरक येवढाच की सभोवतालच्या पाण्याचा ड्राफ्ट (खोली) २० फुटांचा असेल तर आयलंडवरच्या पाण्याची खोली ओहोटीच्या वेळेस जेमतेम दोन-तीन फूट तर भरतीच्या वेळेस चार-पाच फूट असते.. म्हणजे ऐन भरतीच्या वेळेस या ठिकाणी गेलो असता समोरून पाहीलं असता माणूस भर समुद्रात (खरंतर ही खाडी आहे) पाण्यात गुडघाभर पाण्यातच उभा आहे असंच दिसतं.. ओहोटीच्या वेळेस मध्यास मात्र थोडी पुळण जमिन, तिही फारतर अर्धा स्क्वेअर किमिची असेल, दिसते.. इथं काही स्टॉल्सही आहेत मात्र ते मताणासारखे बांबूंच्या उंच प्लॅटफॉर्मवर उभारलेले आहेत कारण खाली पाणीच असतं.. इथं संध्याकाळनंतर कोणालाही थांबता येत नाही..

या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावं लागतं.. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत.. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.. स्थानिक लोक या बेटाला 'भाट' असं म्हणायचे. मात्र २००८ साली आलेल्या त्सुनामीमुळे या बेटाच्या रचनेत थोडा बदल झाला आहे.. हे बेट आता थोडं थोडं समुद्रात बुडत चाललंय अशी स्थानिकांची माहिती आहे.. सध्या इथं अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्टस् चालतात.. तारकर्लीला जाणाऱ्यांनी या अनेख्या 'त्सुनामी आयलंड'ला जरूर भेट द्यावी..

- गणेश साळुंखे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India