नाशिक
नाशिक हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जवळपास २००० लहानमोठी मंदिरे येथे पहावयास मिळतात. गोदावरीच्या तीवरावर वसलेल्या या प्राचीन शहरामध्ये दर १२ वर्षांनी एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
देवळाली
नाशिकचे उपनगर असलेले देवळाली हे ठिकाण लष्करी प्रशिक्षण शाळांसाठी प्रसिद्ध आहे.
गंगापूर धरण
देशातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक असलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरात अतिशय सुंदर असे उद्यान आहे. तसेच हे एक पर्यटकांचे आवडते स्थान आहे.
पांडवलेणी
मुंबई-नाशिक महामार्गापासून केवळ ८ कि.मी. अंतरावरील ही लेणी १२० मीटर उंचीच्या टेकडीवर वसली आहेत.
त्र्यंबकेश्वर
देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे स्वाभाविकच महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. तसेच दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ यात्राही भरते.
वणी सप्तश्रृंगी
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील देवीचे हे स्थान भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
काळाराम मंदिर
पंचवटी भागात स्थित असलेले काळाराम मंदिर मध्यवर्ती बस स्थानका पासून 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी नाशिक शहरातून विविध ठिकाणाहून शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. मंदिराच्या बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उंच दगडाची भिंत आहे.
खंडोबा मंदीर
देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर खंडोबा मंदिर वसलेले आहे. भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी’ असे देखील म्हणतात.
कावनई-कपिलधारा तिर्थ
हे तिर्थक्षेत्र इगतपुरी तालुक्यात असून नाशिक शहरापासून 50 कि.मी. अंतरावर स्थित आहे. इगतपुरी पासून कावनाईचे अंतर 12 कि.मी. आहे. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असून सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तिर्थ येथे विविध मंदीरे असून जवळच माता कामाक्षी मंदीर देखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आहे.
कुशावर्त तिर्थ
कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे.
मांगी तुगी मंदिर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढू शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी ‘मांगीगिरी मंदीर’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत ‘तुंगीगिरी मंदीर’ असून भगवान बुद्धांच्या 99 कोरीव मूर्ती येथे आहेत
चांभारलेणे
"चांभारलेणे" हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समुह आहे. नाशिक शहराच्या बाह्य भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदिरे स्थित आहे.
तपोवन
तपोवन म्हणजे ‘तपस्वी लोकांचे वन’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.
कैलास मठ / भक्तीधाम
हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असून यास ‘भक्तीधाम’ असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी विविध देवतांची मंदिरे आहेत. ‘कैलास मठ’ हा जुना आश्रम असून या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हृदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सद्यस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.
मुक्तिधाम
मुक्तीधाम हे नाशिक शहरात नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केले आहे. या मंदिराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर गितेचे 18 अध्याय कोरलेले आहेत.
पंचवटी
नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदिरा जवळ वटवृक्षांचा समुह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.
सितागुंफा
नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासुन 3 कि.मी.अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे. वनवासा दरम्यान माता सिता येथे रहात होत्या असे म्हटले जाते.पहिल्या मुख्य गुंफेत राम, सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती असुन, दुसऱ्या लहान गुंफेत शिवलींग आहे.
रामकुंड
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी,पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.
0 comments:
Post a Comment