साद देती सागर किनारे…


महाराष्ट्राला लाभलेल्या 750 किमीच्या समुद्राने, मोहिनी घालणारे अनेक सागरकिनारे दिले आहेत. कोणत्याही मोसमात ज्यांचे समुद्राशी नाते जुळते त्या दर्यावर्दी पर्यटकांना महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कायम खुणावत असते. राकट देशा असे वर्णन असणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेली ही नाजूक सौंदर्याची किनार पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आकर्षित करीत असते. त्यामुळेच देशविदेशातील पर्यटकांसह महाराष्ट्राची ही सागरी किनारपट्टी कायम गजबजलेली असते.

सिंधुदुर्ग हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न, 121 कि.मी. लांबीचा लाभलेला स्वच्छ सुंदर समुद्र, रमणीय खाड्या, सिंधुदुर्ग व विजयदुर्गसारखे गडकिल्ले, मनोहरी दऱ्याखोऱ्या आणि घाटरस्ते, सागरी जैवविविधता, मंदिरे, देवस्थाने, रानमेवा, प्रसिद्ध देवालये, सावंतवाडीची लाकडी खेळणी, दशावतार व चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, जोडीला चविष्ट खाद्यसंस्कृती, वन्यप्राणी अशा अनेक गोष्टींनी सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारेलल्या ज्या किल्ल्याचे नाव अभिमाने घेतले जाते तो अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला अर्थातच मालवण तालुक्यात आहे. 48 एकर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्याच्या भोवताली पाणी व 52 बुरुज आहेत.

विजयदुर्ग किल्ला

एकेकाळी देवगड हे अत्यंत महत्त्वाचे व सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध होते. बंदराला लागून 120 एकरात पसरलेला देवगडचा किल्ला हा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याचे आवार म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. किल्ल्यावरुन बंदर, अथांग समुद्र, मच्छिमारी बोटी असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.

कुणकेश्र्वर व श्री भराडी देवी

श्री क्षेत्र कुणकेश्र्वर हे देवगड तालुक्यातील यादवकालीन मंदिर समुद्रकिनारी असल्याने याचा परिसर नितांत सुंदर आहे. याशिवाय अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे व मठ या परिसरात आहे.

रुपेरी वाळुचे समुद्रकिनारे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे विस्तीर्ण समुद्रकिनारे होय. मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, तोंडवली वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्र्वर, नवाबाग, मोचेंमांड, सागरतीर्थ, रेडी, शिरोडा तर देवगड तालुक्यातील गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव या सर्व सागर किनाऱ्यांवर सकाळ व संध्याकाळ निरनिराळा अनुभव येतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर काय पाहाल ?

मालवण तालुका : मालवण तालुक्यात सिंधुदुर्ग किल्ला, भराडीदेवी, धामापूर तलाव, देवबाग बॅकवॉटर, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, तोंडवली व तळाशील बीच, तारकर्ली, चिवला बीच, वायंगणी खाडी, रामेश्वर मंदिर.

देवगड तालुका : विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर-वाडा, रामेश्वर मंदिर गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव समुद्रकिनारे व वाडातर.

वेंगुर्ला तालुका : वेंगुर्ल्याची डच वखार, सागर बंगला दीपगृह, रेडीचा गणपती, सागरतीर्थ, मोर्चेमांड, वायंगणी, निवती भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्वर, नवाबाग, मोर्चेमांड, रेडी, शिरोडा.

सावंतवाडी तालुका : राजवाडा, लाकडी खेळणी, मोती तलाव, अंबोली, शिल्पग्राम, सावंतवाडी बाजारपेठ.

कुडाळ तालुका : संत राऊळ महाराज मठ, ठाकर आदिवासी कला आंगण, दत्तमंदिर माणगांव, वालावल खाडी.

दोडामार्ग तालुका : तिलारी प्रकल्प, पावसाळ्यात मांगेली धबधबा.

कणकवली तालुका : गोपुरी आश्रम, भालचंद्र महाराज मठ, सावडाव धबधबा, म्हाडकादेवी मंदिर, कासार्डे.

वैभववाडी तालुका : करुळ घाट, नापणे धबधबा, गगनगड.

कसे पोहोचाल ?

जवळचे विमानतळ : मुंबई
मुंबईपासून 540 किमी अंतरावर जवळचे रेल्वे स्टेशन : सिंधुदुर्ग
याशिवाय कणकवली आणि कुडाळदेखील महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन आहेत.
बससेवा : मुंबई-सिंधुदुर्ग बससेवा उपलब्ध
राहण्याची सोय : पंचतारांकितपासून स्थानिक रहिवाशांच्या घरी अल्प खर्चात व्यवस्था तसेच एमटीडीसी हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध.
स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण संस्था

मालवणमधील देवबाग येथे जागतिक दर्जाचे अद्ययावत साधनसामुग्रीने सज्ज असे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही वयाची व्यक्ती हे सहज करु शकते. मात्र सोबतच्या प्रशिक्षकाच्या सूचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
सावंतवाडीचा राजवाडा व लाकडी खेळणी

सावंतवाडी हे ऐतिहासिकालीन शहर आहे. सावंतवाडीतील राजवाडा, मोती तलाव, गंजिफा आर्ट, वुडवर्क पेंटींग, लॉकरवेअर या कला येथे पाहावयास मिळतात. राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये गंजिफा तयार करण्याचे (रंगवण्याचे) प्रात्यक्षिक, तयार लाकडी खेळणी, ऐतिहासिक पुरातन मूर्ती आहे. तसेच सावंतवाडीची लाकडी खेळणी ही या शहराची सार्वत्रिक ओळख आहे.

अधिक माहितीकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सिंधुदुर्गनगरी (02363-228785) येथे व आपत्कालीन कामासाठी जिल्हा प्रशासन 02362-228847 या क्रमांकावर पर्यटक संपर्क साधू शकतात.

- संध्या गरवारे,
माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
संपर्क : 09422961649


नागपूर जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात परंपरा व आधुनिकता यांचा उत्तम संगम असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. नागपूर येथील संत्र्यांमुळे नारंगी शहर ओळखले जाते. ताडोबा, नागझिरा, नवेगाव आणि पेंच या अभयारण्यामध्ये जाण्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

खिंडसी तलाव
हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात खिंडसी तलावाचा परिसर एखाद्या रत्नासारखा चमकून उठतो. स्थानिक लोकांसाठी तर हे एक अत्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

रामटेक

या शहराचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही येथे काळी काळ थांबले. त्यांच्या या वास्तव्यानेच या शहराचे नाव रामटेक असे पडले. येथील टेकडीवर श्रीराम व लक्ष्मणाची मंदिर आहेत. महाकवी कालिदासाचे स्मारकही येथे आहे. येथेच त्यांनी मेघदूत हे सुप्रसिद्ध संस्कृत महाकाव्य लिहिले असे मानले जाते.

तोतलाडोह धरण
नागपूर जिल्ह्यात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे.

नवेगाव बांध
नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नवेगाव बांध आहे. पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताली अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत असून या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत.

गोरेवाडा तलाव

नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा 2350 फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 1911 मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत.

सेमिनरी हिल

नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. सेंट चार्ल्स सेमिनरी आणि एस. एफ. एस. कॉलेज या टेकडीच्या वर आहे. येथील चालण्याचे मार्ग लाकडाने तयार करण्यात आल्याने सकाळी ताज्या हवेत चालणाऱ्यांना सुखद अनुभव मिळत असतो. सेमिनरी हिलच्या सर्वात वरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येऊ शकते.

फुटाळा तलाव

नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हेदेखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किना-यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.

अंबाझरी तलाव

नागपूरच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. 1958 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ 20 एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.

कस्तूरचंद पार्क 

कस्तूरचंद पार्क हे नागपुरातील सर्वात मोठे बैठकीचे ठिकाण आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हजारावर लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. शहरात जेव्हा मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात तेव्हा हे स्थळ अतिशय लोकप्रिय ठरत असते.

नगरधन किल्ला 

रामटेक तालुक्यात असलेल्या नगरधन या गावात हा किल्ला नागपूरच्या ईशान्येकडे 38 किलोमीटर आणि रामटेकच्या दक्षिणेकडे 9 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नगरधन या जुन्या शहराची स्थापना सूर्यवंशी राजांनी केली आहे. नगरधन किल्ला हा या गावाचे वैशिष्ट्य असून, भोसले राजघराण्याचे राजा रघुजी भोसले यांनी हा किल्ला बांधला असल्याचे समजले जाते . या किल्ल्याच्या आतील भागात चौकोनी आकाराचा राजमहाल आहे. काही इमारतीही आहेत. या किल्ल्याच्या वायव्येकडील मुख्य द्वार अजूनही सुस्थितीत आहे.

सीताबर्डी किल्ला 

नागपुरातील सीताबर्डी किल्ला हा सीताबर्डी येथील 1817 च्या युद्धाचे प्रतीक आहे. नागपूरच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब उर्फ मुधोजी द्वितीय यांनी तिसऱ्या अँग्लो—मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा सुरू करण्यापूर्वी हा किल्ला बांधला होता. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असून, तो आता सीताबर्डी या नावाने ओळखला जातो. हा परिसर नागपूरचे अतिशय महत्त्वाचे असे व्यावसायिक केंद्र आहे. या किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांचे थडगे आणि महात्मा गांधींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तो सेल आहे. सध्या प्रांतीय लष्कराचे कार्यालय या किल्ल्यात आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशीच हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो.

झिरो माईल 

झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचे केंद्रिंबदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे. अंतर मोजण्यासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती.

जपानीज रोझ गार्डन 
नागपूरच्या सिव्हील लाईन भागात हे जपानी रोझ गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्‍यांसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक आहे. पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही येथे घेता येतो. पावसाळ्यात या गार्डनचे सौंदर्य अधिकच फुलत असते. उंच झाडे, हिरवे गवत आणि मनमोहक निसर्गाने ओतप्रोत असलेले हे गार्डन सकाळी आणि सायंकाळी ‘वॉकींग’ करणार्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. या रोझ गार्डनमध्ये लाल आणि पिवळे गुलाब मुख्य आकर्षण आहे. या गार्डनच्या सभोवताल असलेले आणि अतिशय काळजीपूर्वक सुशोभित करण्यात आलेले काही लोखंडी शिल्प पाहिले की, हे खरोखरच जपानी गार्डन असल्याचे संकेत मिळतात.

व्हीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला व्हीसीए ग्राऊंड या नावानेही ओखले जाते. 2008 मध्ये ह गाऊंड उभारण्यात आले. त्याचवर्षी त्याचे उद्घाटन झाले. शहरातील जुन्या व्हीसीए मैदानाची जागा त्याने घेतली. हे मैदान रणजी ट्रॉफी आणि दुलिप करंडक स्पर्धेकरिता विदर्भ आणि सेंट्रल झानच्या संघांकरिता होम ग्राऊंड आहे. नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा येेथे आहे

महाराजबाग आणि झू
शहराच्या मध्यभागी असलेले महाराजबाग आणि झू हे नागपूरचे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय आहे. शहरातील भोसले आणि मराठा राज्यकर्त्यांनी ते बांधले आहे. येथे काही दुर्मिळ जातीचे पक्षी आणि प्राणी आहेत. शहरातील अतिशय मनमोहन स्थळ अशी त्याची ओळख आहे. महाराज बागेत अतिशय दुर्मिळ प्राणी असल्याने योग्य उद्देशासाठी त्याचे बॉटनिकल गार्डनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या महाराजबागेतच प्राणीसंग्रहालयही आहे. शहरातील असे हे एकमेव स्थान असल्याने नागपूरकरांना त्याचा अभिमान आहे.

रमण सायन्स सेंटर

नागपूर शहरात असलेल्या या रमण सायन्स सेंटरला नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिकतज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे. अतिशय उपयुक्त असे हे सायन्स सेंटर असून ते मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आहे. वैज्ञानिक कामकाजांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच उद्योग आणि मानव कल्याणाकरिता वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करण्यासाठी या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनीही येथे भरविण्यात येतात.

मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला)

नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयाला अजब बंगला या नावानेही ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेकडे दीड किलोमीटर अंतरावर सिव्हील लाईन्स भागात ते आहे. 1863 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय शहरातील सर्वात जुने आहे. प्राचिन काळात उपयोगात येणाऱ्या अनेक पुरातत्व वस्तू, शिल्पाकृती येथे संग्रहित आहेत. आर्ट, आर्चिओलॉजी, अॅन्थ्रोपोलॉजी, जिऑलॉजी, उद्योग आणि नैसर्गिक इतिहास अशा सहा गॅल-यामध्ये या सर्व वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत.

नॅरो गेज रेल संग्रहालय
नागपूरच्या कामठी रोडवरील कडबी चौकात असलेले हे नॅरो गेज रेल संग्रहालय भारतातील असे एकमेव संग्रहालय आहे. 4.5 एकर जागेत असलेल्या या संग्रहालयात भारतीय रेल्वेच्या अनेक जुन्या आणि वारसा वस्तूंचे एकप्रकारे प्रदर्शनच भरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोकोमोटीव्ह आणि कॅरिएजचे मॉडल्स, हॅण्ड लॅम्प, जुने टेलिफोन संच आदींचा समावेश आहे.

पेंच सिलारी

हा परिसर प्रामुख्याने पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सातपुडा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्यापर्यंत सुमारे २५७ चो.की.मी. पर्यंत याचे क्षेत्र पसरले आहे. १९७५ मध्ये याला केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तर १९९९ मध्ये या परिसरास व्याघ्र संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला.

बोर वन्यजीव अभयारण्य

बोर धरणामुळे निर्माण झालेल्या या घनदाट अरण्यासामध्ये विविध दुर्मिळ प्रजातींचे जीव आढळतात. बोर धरणसुद्धा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.

सेवाग्राम

शेगाव गावातील आपल्या वास्तव्यादरम्यान महात्मा गांधींनी या आश्रमाची स्थापणा केली. या आश्रमाच्या संकुलामध्ये महत्मा गांधींचे निवासस्थान असलेल्या ‘बा कुटी’ व ‘आदी निवास’ आहेत.

लेक गार्डन 
अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील लेक गार्डनला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. यासाठी सक्कर दऱ्यातील लेक गार्डन सारखे दुसरे स्थळ नाही. आठवड्याची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. या लेक गार्डन मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत.

गांधीसागर तलाव 

नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्‍या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.

1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणाऱ्यांसाठी नौकाविहाराचीही सोय आहे.

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे.

खेकरा नाला तलाव

नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्‍यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय.

संकलन – 
विलास सागवेकर,
उपसंपादक 

औरंगाबाद जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 

अजिंठा व एलोराच्या जगप्रसिद्ध लेण्या तसेच आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांमुळे औरंगाबाद हे एक मध्यवर्ती पर्यटन स्थान झाले आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेली अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि प्रसिद्ध मुघल वास्तू बीबी का मकबरा अगदी जवळ असल्यामुळे नुकतेच ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ म्हणून जाहीर झालेले औरंगाबाद राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. हे महाराष्ट्रातील अतिशय झपाट्याने वाढणारे शहर असून आता ते महत्त्वाचे व्यापारी शहर बनले आहे. मुंबईशी विमान, रेल्वे व रस्त्याने तर राज्यातील इतर सर्वच शहरांशी रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबरोबरच पितळखोरे, दौलताबाद, पैठण आणि शिर्डी या ठिकाणांना देखील औरंगाबादहून जाता येते.

अजिंठा

जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झालेली ही बौद्धकालीन लेणी बुद्ध व बोधसत्त्वाचे विहंगम दर्शन घडवतात. सन १८७९ मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी पुन्हा शोधून काढली. हे ठिकाण औरंगाबादपासून १०७ कि.मी. आणि जळगांवपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. अजिंठा नामक मध्ययुगात वसलेल्या गावापासून अगदी जवळच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या ताब्यात संरक्षित असणारी ३२ लेणी आहेत. १९८३ मध्ये युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. याठिकाणी असणाऱ्या कोरीव गुंफा दोन भागात विभागता येतात. पहिल्या विभागात इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून इ.स. पहिल्या शतकापर्यंत कोरली गेलेली प्राचीन बौद्ध लेणी येतात तर दुसऱ्या विभागात इ.स. पाचव्या शतकातील महायान बौद्ध लेणी येतात. प्राचीन लेण्यांपैकी क्र. ९ आणि १० ही लेणी म्हणजे चैत्यगृहे आहेत, ज्यामध्ये भारतीय इतिहासातील सर्वात प्राचीन कलेचे उपलब्ध नमुने जतन झाले आहेत, तर ८, १२, १३ आणि १५ ही लेणी म्हणजे विहार आहेत. तसेच १९, २६, आणि २९ क्रमांकाच्या गुहा म्हणजे महायान काळातील चैत्यगृहे असून उर्वरित सर्व या काळातील विहार आहेत.

एलोरा (वेरुळ)

हिंदू, जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव असलेली ही लेणी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तेराव्या शतकातील या लेण्यांमधील कैलास मंदिर हे एक महत्त्वाचे व जगातील सर्वात मोठे अखंड शिल्प आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. अजिंठ्यापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ वसलेले आहे, ते म्हणजे वेरूळ. सुमारे १५०० वर्षांचा इतिहास असणारे हे स्थळ तेथील प्राचीन भारतीय कोरीव स्थापत्याच्या सर्वोत्कृष्ट नमुन्यासाठी जगप्रसिद्ध आहे. चरणाद्रीच्या उभ्या डोंगरावर कोरून काढलेल्या ३४ गुहा आपल्याला एकाच ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धार्मिक लेण्यांचे एकत्रित दर्शन घडवितात.

म्हैसमाळ

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुमारे ९१३ मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण गिरीजाभवानी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो.

पैठण

गोदावरी नदीच्या काठी वसलेले पैठण हे शहर जरीकाम केलेल्या पैठणी साड्यांकरिता प्रसिद्ध आहे. तसेच पैठण हे शहर संत एकनाथांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

पितळखोरा लेणी

ही भारतातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी असून ती अंदाजे २३०० वर्षांपूर्वी कोरण्यात आली आहेत. पितळखोऱ्याची लेणी अजिंठा लेण्यांपेक्षाही जवळपास १०० वर्षे आधी कोरली आहेत.

दौलताबादचा किल्ला

दगडामध्ये खोदलेल्या गुहा आणि दालने, एक सुंदर असे मंदिर, मोठा खंदक, संरक्षक तटबंदी, प्रशस्त राजवाडे, उत्तम अशी स्नानगृहे, निवासी संकुले, बाजार, पायऱ्या असलेली विहीर अशा सगळ्या स्थापत्यगुणांनी समृद्ध असलेला हा किल्हा आहे. याचे ऐतिहासिक महत्त्व एवढे आहे की तुघलकाच्या राजवटीमध्ये त्यांनी आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच आजच्या दौलताबादला हलवली.

संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

कोल्हापूर जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची माहिती घेणार आहोत. येथील महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध असून देशभरातून भक्त तिच्या दर्शनाला येतात. कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. शिक्षण व उद्योगाचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

पन्हाळा
इतिहासकालीन लढ्यांमध्ये पन्हाळा किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उंचीवर असल्यामुळे हे गिरीस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्‍या रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.

महालक्ष्मी
महालक्ष्मीची आख्यायिका सर्व पुराणात आढळते. मोठ्या किमंतीच्या दगडापासून, 40 कि.ग्रॅ. वजनाची देवीची मुर्ती बनवली आहे.ह्याच्यामध्ये हिरक नावाचा धातु मिसळला आहे. ज्याच्यापासून मुर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.ह्याची रचना बाहेरच्या बाजुला असलेल्या ‘शिव-लिंग’ सारखी आहे.हे मंदीर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर ऊभारले आहे ज्याच्यामध्ये हिरक आणि वाळु मिसळली आहे.वाघाची मुर्ती बाहेरच्या बाजुला ऊभा आहे.

बाहुबली

जैन धर्मियांच्या दोन विविध पंथांची येथे मंदिरे आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.


राधानगरी
घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथील भगवती नदीवर वीज निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र आहे.

विशाळगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सुटकेमुळे विशाळगड इतिहासात प्रसिद्ध पावला आहे. आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये हा परिसर लोकप्रिय आहे. जवळपास ऊत्तरेला पन्हाळ्यापासुन 60 कि.मी. आणि कोल्हापूर पासुन 18 कि.मी. दक्षिणेला हा किल्ला आहे. घनदात जंगलातुन हा रस्ता जातो. खोल दरीमुळे मार्गापासुन हा किल्ला वेगळा केलेला आहे. हा दिसायला खूप मोठा आहे म्हणुन ह्याला ‘विशाल’ असे नाव देण्यात आले. दरीमुळे ह्या गडा आत जाण्याचा मार्ग देखील कठीण आहे.

दाजीपूर अभयारण्य
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. दाजीपूर एक छोटसं गाव मात्र या दाजीपुरात रम्य, घनदाट झाडी, वृक्ष, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी आढळतात, या अरण्यात निसर्गाच्या कुशीत गेल्याचा अनुभव मिळतो हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. या अरण्यात गवा, हरिण, सांबर, चितळ यांचे कळप दिसतात. तसेच लाल मातीत बिबळया वाघाच्या पायाचे ठसे दिसून येतात. हे अभयारण्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर, राधानगरी तालुक्यामध्ये वसले आहे.हे एक आकर्षित सहलीचे ठिकाण आहे ज्याच्यामध्ये प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे सौंदर्य आहे. ‘गवा’ रेड्यासाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात सांबर, हरण, अस्वल आणि साप आढळतात. जंगल रिसॉर्ट हे एक सुंदर ठिकाण राधानगरी धरणाच्या मागील बाजूस आहे.

न्यु पॅलेस
भवानी मंडप – कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन ईमारत आहे. 1877 – 1884 ह्या कालावधीत ही ईमारत बांधली गेली. काळ्या, सपाट केलेल्या दगडांचा एक ऊत्कृष्ट नमुना बांधला आहे जे सर्व प्रवाशांच मन वेधुन घेते. ह्याला लागुनच एक बाग आहे, त्याला दगडांच्या भींतीचे व तारांचे कुंपन आहे.संपुर्ण ईमारत आठ कोनी आहे आणि त्याच्या मध्ये बुरूज आहे.1877 मध्ये येथे घड्याळ बसवले. थोड्या – थोड्या अंतरावर येथे बुरूज आहेत.प्रत्त्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहीले आहे. येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे. आजचे, श्रीमंत शाहु महाराजांचे निवास्थान आहे.
भुदरगड
कोल्हापूरच्या दक्षिणेस भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला सह्याद्रीच्या मध्यावर उभा आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत.


संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

सांगली जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

औदुंबर

औदुंबर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून श्री दत्तात्रयाचे स्थान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे.

बत्तीस शिराळे

नागपंचमीला भरणाऱ्या उत्सवामुळे बत्तीस शिराळे गाव जगप्रसिद्ध आहे. या दिवशी शेकडो नाग व सापांना पकडून त्यांची पूजा केली जाते. नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी साडले जाते.

नरसोबाची वाडी

कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर वसलेले हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे श्रीदत्तगुरुंच्या पवित्र पादुका आहेत.

चांदोली नॅशनल पार्क

सांगली जिल्ह्यातील चांदोली नॅशनल पार्क हे एकमेव राष्ट्रीय अभयारण्य आहे. सदर स्थळाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने चांदोली राष्ट्रीय पार्क व कोयना वन्यजीवन अभयारण्य मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास व्याघ्र राखीव प्रकल्प म्हणून २१ मे २००७ मध्ये घोषित केलेले आहे. सद्यस्थितीत चांदोली नॅशनल पार्क येथे ९ वाघ व ६६ बिबटे आहेत.

प्रचितगड
संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर जाण्यासाठी सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे.

मिरज दर्गा

मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणार्‍या ज्या अनेक वास्तू आहेत. त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबाचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लीम भक्तांचे हे श्रध्दास्थान आहे.

श्री गणपती मंदिर

सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे ऐतिहासिक आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. गणपती हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून श्रध्दास्थान आहे.

संकलन - विलास सागवेकर, 
उपसंपादक (महान्यूज)

पुणे जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. मराठ्यांची राजधानी असलेले ऐतिहासिक शहर विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मोठ मोठे औद्योगिक कारखाने आणि तंत्रज्ञान संस्था यामुळे पुण्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. अशा या पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती आपण येथे घेणार आहोत.

आळंदी
पुणे शहरापासून २५ कि. मी. अंतरावर आळंदी हे स्थान आहे. देवाची आळंदी या नावानेही हे प्रसिद्ध आहे. श्रीसंत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली. वारकरी संप्रदायामध्ये हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून आळखले जाते. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट खूप सुंदर आहे. वारकरी संप्रदायात पंढरपूर प्रमाणे आळंदी या तीर्थस्थानाचेही मोठे महत्त्व आहे.

देहू
इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले देहू हे लहानसे गाव पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि.मी. अंतरावर आहे. श्रीसंत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असलेले देहू गाव इंद्रायणी नदीच्या काठी वसले आहे. फाल्गुन वद्य पक्षात भरणारी वार्षिक जत्रा हे येथील महत्त्वाचे आकर्षण आहे.

जेजुरी
पुण्यापासून ३० किमी अंतरावर जेजुरीचा खंडोबा हे अतिशय महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरणाऱ्या जत्रेला असंख्य भाविक दूरवरच्या परिसरातून येतात.

कार्ले-भाजे-बेडसे लेणी
चैत्य लेणी प्रकारातील ही भारतातील सर्वात मोठी बौद्ध लेणी असून ती इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात बांधली गेली आहेत. येथील चैत्य सभागृह प्रचंड मोठे असून आजही ते उत्तमरित्या जपले आहे.

खंडाळा
पश्चिम घाटातील मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. उंचीवर वसलेले असल्यामुळे साहजिकच ते निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.

लोणावळा
खंडाळ्यापासून जवळच असलेले लोणावळा हे एक छोटेसे शहर असून हे सुद्धा पर्यटकांमध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कार्ले-भाजे-बेडसे लेण्यांपासून हे स्थान जवळच आहे.

मोरगाव
मोरगाव हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे स्थान आहे. येथील गणपती श्री मोरेश्वर या नावाने ओळखला जातो. ही गणपतीची मूर्ती स्वयंभू असून भक्तांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

पुरंदर
मराठेशाहीतील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी पुरंदरचा किल्ला ओळखला जातो. पश्चिम घाटात वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून १३५० मी. उंचीवर आहे.

रांजणगाव
पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात स्वयंभू महागणपतीचे स्थान असलेले हे तीर्थस्थळ अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या मंदिराची रचना अशी आहे की, उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात.

शिवनेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक टेकड्या व लेणी आहेत. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर गावाजवळ पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे.

सिंहगड
पूर्वी कोंढाणा या नावाने प्रसिद्ध असलेला किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक लढाईमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव सिंहगड असे ठेवले. पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगानमध्ये हा वसलेला आहे. या किल्लावरून राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, पुरंदर तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते.

ओझर
ओझर येथील अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वराचे मंदिर चारही बाजूंनी दगडांनी वेढले आहे. या दगडांवर उभे राहून लेण्याद्रीचा परिसर न्याहाळता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आणि गिरीजात्‍मक गणपती येथून जवळच आहेत.

थेऊर

अष्टविनायकांपैकी स्वयंभू गणपतीचे स्थान म्हणून थेऊर प्रसिद्ध आहे. येथील गणपती श्री चिंतामणी या नावाने ओळखला जातो. या थेऊरला तिन्ही बाजूंनी मूळा-मुठा नदीचा वेढा आहे.

संकलन – विलास सागवेकर,
उपसंपादक, महान्यूज.

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India