साद देती सागर किनारे…


महाराष्ट्राला लाभलेल्या 750 किमीच्या समुद्राने, मोहिनी घालणारे अनेक सागरकिनारे दिले आहेत. कोणत्याही मोसमात ज्यांचे समुद्राशी नाते जुळते त्या दर्यावर्दी पर्यटकांना महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कायम खुणावत असते. राकट देशा असे वर्णन असणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेली ही नाजूक सौंदर्याची किनार पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आकर्षित करीत असते. त्यामुळेच देशविदेशातील पर्यटकांसह महाराष्ट्राची ही सागरी किनारपट्टी कायम गजबजलेली असते.

सिंधुदुर्ग हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न, 121 कि.मी. लांबीचा लाभलेला स्वच्छ सुंदर समुद्र, रमणीय खाड्या, सिंधुदुर्ग व विजयदुर्गसारखे गडकिल्ले, मनोहरी दऱ्याखोऱ्या आणि घाटरस्ते, सागरी जैवविविधता, मंदिरे, देवस्थाने, रानमेवा, प्रसिद्ध देवालये, सावंतवाडीची लाकडी खेळणी, दशावतार व चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, जोडीला चविष्ट खाद्यसंस्कृती, वन्यप्राणी अशा अनेक गोष्टींनी सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारेलल्या ज्या किल्ल्याचे नाव अभिमाने घेतले जाते तो अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला अर्थातच मालवण तालुक्यात आहे. 48 एकर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्याच्या भोवताली पाणी व 52 बुरुज आहेत.

विजयदुर्ग किल्ला

एकेकाळी देवगड हे अत्यंत महत्त्वाचे व सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध होते. बंदराला लागून 120 एकरात पसरलेला देवगडचा किल्ला हा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याचे आवार म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. किल्ल्यावरुन बंदर, अथांग समुद्र, मच्छिमारी बोटी असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.

कुणकेश्र्वर व श्री भराडी देवी

श्री क्षेत्र कुणकेश्र्वर हे देवगड तालुक्यातील यादवकालीन मंदिर समुद्रकिनारी असल्याने याचा परिसर नितांत सुंदर आहे. याशिवाय अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे व मठ या परिसरात आहे.

रुपेरी वाळुचे समुद्रकिनारे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे विस्तीर्ण समुद्रकिनारे होय. मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, तोंडवली वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्र्वर, नवाबाग, मोचेंमांड, सागरतीर्थ, रेडी, शिरोडा तर देवगड तालुक्यातील गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव या सर्व सागर किनाऱ्यांवर सकाळ व संध्याकाळ निरनिराळा अनुभव येतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर काय पाहाल ?

मालवण तालुका : मालवण तालुक्यात सिंधुदुर्ग किल्ला, भराडीदेवी, धामापूर तलाव, देवबाग बॅकवॉटर, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, तोंडवली व तळाशील बीच, तारकर्ली, चिवला बीच, वायंगणी खाडी, रामेश्वर मंदिर.

देवगड तालुका : विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर-वाडा, रामेश्वर मंदिर गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव समुद्रकिनारे व वाडातर.

वेंगुर्ला तालुका : वेंगुर्ल्याची डच वखार, सागर बंगला दीपगृह, रेडीचा गणपती, सागरतीर्थ, मोर्चेमांड, वायंगणी, निवती भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्वर, नवाबाग, मोर्चेमांड, रेडी, शिरोडा.

सावंतवाडी तालुका : राजवाडा, लाकडी खेळणी, मोती तलाव, अंबोली, शिल्पग्राम, सावंतवाडी बाजारपेठ.

कुडाळ तालुका : संत राऊळ महाराज मठ, ठाकर आदिवासी कला आंगण, दत्तमंदिर माणगांव, वालावल खाडी.

दोडामार्ग तालुका : तिलारी प्रकल्प, पावसाळ्यात मांगेली धबधबा.

कणकवली तालुका : गोपुरी आश्रम, भालचंद्र महाराज मठ, सावडाव धबधबा, म्हाडकादेवी मंदिर, कासार्डे.

वैभववाडी तालुका : करुळ घाट, नापणे धबधबा, गगनगड.

कसे पोहोचाल ?

जवळचे विमानतळ : मुंबई
मुंबईपासून 540 किमी अंतरावर जवळचे रेल्वे स्टेशन : सिंधुदुर्ग
याशिवाय कणकवली आणि कुडाळदेखील महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन आहेत.
बससेवा : मुंबई-सिंधुदुर्ग बससेवा उपलब्ध
राहण्याची सोय : पंचतारांकितपासून स्थानिक रहिवाशांच्या घरी अल्प खर्चात व्यवस्था तसेच एमटीडीसी हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध.
स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण संस्था

मालवणमधील देवबाग येथे जागतिक दर्जाचे अद्ययावत साधनसामुग्रीने सज्ज असे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही वयाची व्यक्ती हे सहज करु शकते. मात्र सोबतच्या प्रशिक्षकाच्या सूचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
सावंतवाडीचा राजवाडा व लाकडी खेळणी

सावंतवाडी हे ऐतिहासिकालीन शहर आहे. सावंतवाडीतील राजवाडा, मोती तलाव, गंजिफा आर्ट, वुडवर्क पेंटींग, लॉकरवेअर या कला येथे पाहावयास मिळतात. राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये गंजिफा तयार करण्याचे (रंगवण्याचे) प्रात्यक्षिक, तयार लाकडी खेळणी, ऐतिहासिक पुरातन मूर्ती आहे. तसेच सावंतवाडीची लाकडी खेळणी ही या शहराची सार्वत्रिक ओळख आहे.

अधिक माहितीकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सिंधुदुर्गनगरी (02363-228785) येथे व आपत्कालीन कामासाठी जिल्हा प्रशासन 02362-228847 या क्रमांकावर पर्यटक संपर्क साधू शकतात.

- संध्या गरवारे,
माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
संपर्क : 09422961649


0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India