पुणे जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. मराठ्यांची राजधानी असलेले ऐतिहासिक शहर विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मोठ मोठे औद्योगिक कारखाने आणि तंत्रज्ञान संस्था यामुळे पुण्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. अशा या पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती आपण येथे घेणार आहोत.

आळंदी
पुणे शहरापासून २५ कि. मी. अंतरावर आळंदी हे स्थान आहे. देवाची आळंदी या नावानेही हे प्रसिद्ध आहे. श्रीसंत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली. वारकरी संप्रदायामध्ये हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून आळखले जाते. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट खूप सुंदर आहे. वारकरी संप्रदायात पंढरपूर प्रमाणे आळंदी या तीर्थस्थानाचेही मोठे महत्त्व आहे.

देहू
इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले देहू हे लहानसे गाव पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि.मी. अंतरावर आहे. श्रीसंत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असलेले देहू गाव इंद्रायणी नदीच्या काठी वसले आहे. फाल्गुन वद्य पक्षात भरणारी वार्षिक जत्रा हे येथील महत्त्वाचे आकर्षण आहे.

जेजुरी
पुण्यापासून ३० किमी अंतरावर जेजुरीचा खंडोबा हे अतिशय महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरणाऱ्या जत्रेला असंख्य भाविक दूरवरच्या परिसरातून येतात.

कार्ले-भाजे-बेडसे लेणी
चैत्य लेणी प्रकारातील ही भारतातील सर्वात मोठी बौद्ध लेणी असून ती इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात बांधली गेली आहेत. येथील चैत्य सभागृह प्रचंड मोठे असून आजही ते उत्तमरित्या जपले आहे.

खंडाळा
पश्चिम घाटातील मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. उंचीवर वसलेले असल्यामुळे साहजिकच ते निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.

लोणावळा
खंडाळ्यापासून जवळच असलेले लोणावळा हे एक छोटेसे शहर असून हे सुद्धा पर्यटकांमध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कार्ले-भाजे-बेडसे लेण्यांपासून हे स्थान जवळच आहे.

मोरगाव
मोरगाव हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे स्थान आहे. येथील गणपती श्री मोरेश्वर या नावाने ओळखला जातो. ही गणपतीची मूर्ती स्वयंभू असून भक्तांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

पुरंदर
मराठेशाहीतील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी पुरंदरचा किल्ला ओळखला जातो. पश्चिम घाटात वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून १३५० मी. उंचीवर आहे.

रांजणगाव
पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात स्वयंभू महागणपतीचे स्थान असलेले हे तीर्थस्थळ अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या मंदिराची रचना अशी आहे की, उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात.

शिवनेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक टेकड्या व लेणी आहेत. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर गावाजवळ पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे.

सिंहगड
पूर्वी कोंढाणा या नावाने प्रसिद्ध असलेला किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक लढाईमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव सिंहगड असे ठेवले. पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगानमध्ये हा वसलेला आहे. या किल्लावरून राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, पुरंदर तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते.

ओझर
ओझर येथील अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वराचे मंदिर चारही बाजूंनी दगडांनी वेढले आहे. या दगडांवर उभे राहून लेण्याद्रीचा परिसर न्याहाळता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आणि गिरीजात्‍मक गणपती येथून जवळच आहेत.

थेऊर

अष्टविनायकांपैकी स्वयंभू गणपतीचे स्थान म्हणून थेऊर प्रसिद्ध आहे. येथील गणपती श्री चिंतामणी या नावाने ओळखला जातो. या थेऊरला तिन्ही बाजूंनी मूळा-मुठा नदीचा वेढा आहे.

संकलन – विलास सागवेकर,
उपसंपादक, महान्यूज.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India