कुमकुमने पुरविला अंगणवाडीला आहार

गोंदिया जिल्हयातील सडकअर्जुनी तालुक्यातील डव्वा या क्षेत्रातील घोटी हे गांव. सन 2000 मध्ये घोटीतील महिलांनी कुमकुम महिला बचतगटाची स्थापना केली. बचतगटात सहभागी होवून गावातील महिलांनी प्रगतिपथ गाठला. पण या प्रगतीपथातील असंख्य अडचणींचाही त्यांनी सामना केला.

ICDS कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार या गटातील महिलांना अंगणवाडीला आहार पुरविण्याचे काम सुरु करायचे होते. पण या महिलांना हा यक्षप्रश्न वाटला. आनंद होण्याऐवजी समस्या वाटली. कारण या महिलांजवळ आर्थिक व्यवस्था नव्हती आणि काम करण्याची ही संधीही सोडायची नव्हती. गटाच्या सचिव गीता ब्राम्हणकर यांनी सुचविले की, गटातील प्रत्येक सदस्यांनी घरातील पाच किलो तांदूळ व दोन किलो दाळ व प्रत्येकी 200 रुपये जमा करायचे. सर्वानुमते ठरविल्यानंतर या महिलांनी अंगणवाडीतील बालकांच्या दोन महिन्यांची गरज भागविली आणि पुढील महिन्यात मिळालेल्या मानधनातून खर्च वगळता या गटाला खूप नफा झाला.

बचतगटात काम करणाऱ्या या महिलांचा आत्मविश्वास दुणावला. अंगणवाडीतील बालकांना पोषक आहार पुरविण्यासोबतच या गटाने स्वत:च्या शेतीमध्ये ऋतूनुसार भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण सुरु केले.

ताज्या भाजीपाल्याची विक्री होवू लागली. हळद, उस, हिरव्या पालेभाज्याच्या विक्रीतून या महिलांचे उत्पन्न हजारो रुपयांनी वाढले. आता या महिलांनी गटाची 40 हजार रुपयांची ठेव बँकेत जमा केली आहे.

अंगणवाडीतील बालकांना पोषक व पूरक आहार पूरविण्याचे समाधान आणि आपल्या शेतीत भाजीपाला पिकाव्यतिरिक्त विविध पीक उत्पादनाचे यशस्वी प्रयोग याचा मेळ साधल्यामुळे या महिलांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावले आहे.बचतगटामुळे उदयोग करण्याचा पक्का निर्धार आता या महिलांनी केला आहे.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India