चिकूनगुन्या व डेंग्यू

चिकुनगुन्या व डेंग्यू हे आजार विशिष्ट विषाणूमूळे होतात व एडीस एजिप्टाय नावाच्या डासामार्फत या रोगांचा प्रसार होतो. हा डास दिवसा व एकाचवेळी अनेक लोकांना चावतो. ह्या डासाला पायावर पट्टे असल्याने "टायगर मॉस्किटो" म्हणतात. या डासाची उत्पत्ती स्वच्छ, साठविलेल्या पाण्यात होते. उदा. रांजण, माठ, पाणी, साठविण्याच्या टाक्या, पाण्याचे हौद, कुलरमधील पाणी रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, टायर्स इत्यादी.

चिकूनगुन्या/ डेंग्यूची लक्षणे---

चिकुनगुन्या - 
तीव्र ताप, तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. सर्व वयोगटात हा रोग आढळून येतो. दुषित एडीस एजिप्टाय हा डास चावल्यानंतर निरोगी व्यक्तीला हा रोग होवू शकतो. 

डेंग्यू- 
2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप डोकेदुखी/सांधेदुखी/कंबरदुखी/डोळ्याच्या खोबण्या दुखणे/अंत:त्वचा/नाक-तोंड इत्यादीतून रक्तस्त्राव, अंगावर पुरळ येणे, त्वचा थंड व निस्तेज होणे, रक्तदाब कमी होणे.

चिकुनगुन्या/ डेंग्यू तापाचा प्रसार कसा थांबविता येईल---
डासाचे जीवनचक्र एका आठवड्यात पूर्ण होते त्यामुळे पाण्याचे सर्व साठे दर आठवड्याला एकदा रिकामे करावेत. या साठ्याच्या आतील बाजू व तळ घासून व पुसून कोरडे करुन पुन्हा वापरावेत. घराभोवती फुटके डबे, वापरलेले जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचून राहिल्यास तसेच घरातील पाणी साठविण्याचे रांजण, बॅरेल, हौद, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी नियमितपणे स्वच्छ न केल्यास त्यात डासाची निर्मिती होते. वापरलेल्या वस्तुची विल्हेवाट लावणे तसेच घरातील पाण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ केल्यास डासांच्या निर्मितीवर नियंत्रण येईल. वापराच्या पाणीसाठ्याच्या भांड्यामध्ये/टाक्यामध्ये डास अळी आढळून आल्यास टेमिफॉसचा वापर करावा. घराभोवतालचा परिसर स्वच्छ करुन तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात. पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी.

या रोगावरील तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध आहेत. हा आजार विषाणुजन्य असल्याने खाजगी व्यवसायिकांनी लक्षणे व चिन्हावर आधारित औषधोपचार करावा. स्टेरॉईड औषधाचा वापर करु नये. 

सर्व तापाच्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन स्वत:चा तसेच घरातील व गावातील ताप रुग्णांचे रक्तनमुने तपासून घेण्यासाठी आग्रही भूमिका घेणे तसेच या रुग्णांना नियमित सर्व्हेक्षणामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याकडे रक्तनमुना देण्यास कुठल्याही परिस्थितीत नकार देऊ नये. हिवताप दुषित आढळून आलेल्या व्यक्तीने नियमित व संपूर्ण उचार घेणे आवश्यक आहे.संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय हिवताप जंतूचा पूर्णपणे नायनाट होत नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

जीवशास्त्रीय उपाययोजना - ही एक लोक चळवळ होण्यासाठी---
दिवसेंदिवस किटकनाशकांच्या किंमतीत होणारी वाढ व किटकनाशकांचा पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम याचा अभ्यास केला असता जीवशास्त्रीय उपाययेजनेला पर्याय नसल्याचे दिसून येतेच जीवो: जीवस्य: जीवनम् अर्थात सुरक्षित व बिनखर्चाचा उपाय आहे. याचा जास्तीत जास्त केलेस मानवी जीवनास हिवतापाचा प्रादूर्भाव हा निश्चितच कमी जाणवणार आहे. 

जीवशास्त्रीय उपाययोजनेंर्गत गप्पी माशांचाच श्रेयस्कर कसा ठरतो--- 
गप्पी जातीचे मासे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या उपलब्ध असून त्यांचे जीवनमान 3 ते 4 वर्षाचे आहे. हे मासे आकाराने लहान असतात. ते स्वच्छ अथवा प्रदूषित अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात वाढू शकतात. उदा. घाण पाण्याची डबकी, स्वच्छ पाण्याची तळी, गटारे, पाण्याच्या टाक्या, विहिरी इत्यादी. गप्पी माशांची पूर्ण वाढ होण्यास 90 दिवस लागतात. एक गप्पी मासा 24 तासात डासांच्या 40 ते 50 अळ्या खातो. साधारणपणे 4 ते 6 माशांच्या जोड्या (नर व मादी) 1 चौ.मी. पाण्याच्या पृष्ठभागात सोडणे आवश्यक आहे. गप्पी माशांचा माणसांकडून खाद्य म्हणून उपयोग केला जात नाही.गप्पी मासे अत्यंत कणखर असतात. त्यामुळे हाताळण्यास व वाहतुकीस अत्यंत सुलभ आहेत.

गप्पी मासे विषयक महत्वाच्या बाबी व उपलब्धतेची ठिकाणे---

वेगाने वाहणाऱ्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास मासे वाहून जातात. मोठे मासे असणारी तळी/डबकी यामध्ये मासे सोडल्यास मोठे मासे गप्पी माशांना खातात. गप्पी मासे जिल्ह्यातील मत्स्योत्पादन केंद्रे, जिल्हा हिवताप अधिकारी यांची कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे/उपकेंद्रे/ग्रामीण रुग्णालये येथे उपलब्ध होतील.

हिवताप नियंत्रणासाठी जनतेचा अपेक्षित सहभाग--
प्रत्येक तापाच्या रु ग्णांनी आपले रक्त आरोग्य कर्मचारी, परिचारिका, जि.पृ दवाखाने, प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने, सिव्हिल हॉस्पिटल, व हिवताप चिकित्सालये येथे देवून तपासून घ्यावे. ही सेवा विनामुल्य आहे.

हिवतापाचे जंतू असल्याचे आढळून आल्यास त्वरीत उपचार घ्यावा. रुग्णाच्या घरातील सर्व व्यक्तींनी रक्त तपासून घ्यावे. गावात मोठ्या प्रमाणात तापाची साथ आढळून आल्यास त्वरीत प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.मानवनिर्मित डासोत्पत्ती केंद्राचा नायनाट करावा. त्यासाठी गावातील गटारी सतत वाहती राहतील असे पाहावे. रॉकेल किंवा जळके ऑईल गटारी, नाले व साचलेल्या पाण्यावर फवारल्यास अथवा टाकल्यास डासांची उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल. पाणी साचून राहिलेल्या डबक्यामध्ये, वापरात नसलेल्या विहिरीमध्ये व खाणीमध्ये डास अळी भक्षक गप्पीमासे सोडून अळी नियंत्रण करावे.नागरिकांनी स्वत:च्या घरातील फुटके डबे, टायर्स, रिकाम्या बाटल्या, मडकी इत्यादी टाकाऊ वस्तूंचा नायनाट करुन ती नेहमी कोरडी ठेवावीत. प्रत्येक गावात, शाळेत, अंगणवाडी, स्वयंसेवी संघटना, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी हिवताप विरोधी गोळ्या वाटप केंद्रे प्रस्थापित केलेली आहेत त्याचा प्रत्येकांनी लाभ घ्यावा.नागरिकांनी संध्याकाळच्यावेळी शक्यतो दारे,खिडक्या, बंद करुन ठेवाव्यात तसेच डासांना पिटाळून लावणाऱ्या अगरबत्यांचा वापर करावा. नागरिकांनी उघड्यावर झोपू नये शक्यतो झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. संडासच्या सेप्टिक टॅकवरील व्हेंट पाईपना कॅप/जाळी बसवावी.

जनतेने सहकार्य केल्यास देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील हिवतापाचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India