बोर : वन्य जीवांची वैभवशाली परंपरा

मध्य भारतातील विविध प्रकारच्या वन्यजीवांचे अधिवास असलेल्या बोर व्याघ प्रकल्पासोबतच सभोवतालच्या बफरझोनमध्ये तसेच जिल्ह्यातील इतर भागातील वनक्षेत्रात वन्यजीवांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. खवल्या मांजरासह दुर्मीळ होत असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण, तसेच वन्यप्राण्यासाठी सुरक्षित अधिवासामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बोर अभयारण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. त्यामुळे वन्यजीव अभ्यासक, निसर्गप्रेमी व पर्यटकही जिल्ह्यातील विविध भागात भेट देत आहेत. मानद वाईल्ड लाईफ वार्डन कौशल मिश्रा यांनी ‘वाईल्ड पिलग्रिमस ऑफ वर्धा’ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करुन शोध प्रबंध तयार केलाआहे. जिल्ह्यातील जैव विविधता, वन्यजीव या संदर्भात मागील तीस वर्षाच्या अभ्यासातून जिल्ह्याचे वन व वन्यजीव वैभवाची माहिती त्यांनी संकलीत केली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघासह विविध वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. परंतू सभोवताली असलेल्या सुमारे शंभर पेक्षा जास्त किलोमिटरच्या परिसरात असलेल्या वन्यजीव संदर्भात माहिती देतांना कौशल मिश्रा म्हणाले, ब्राम्हणवाडा, रीठ, डगा, खैरवाडा, मदना जावठी, शिवणगांव, खेरवाडा चांदनी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. या भागात हमखास वाघ किंवा बिबट यांचे दर्शन होते. बफर झोन मध्ये वन्यप्राण्याची संख्या वाढत असतांना जिल्ह्याच्या इतर वन क्षेत्रातही वन्यजीव संवर्धनाचे काम समाधानकारक आहे.

तडस, रानकुत्रे या प्राण्यांचे अस्तित्व याच परिसरात असले तरी ठिपक्या मांजर सालई पेट, माळेगाव, सावदा आदी भागात दृष्टीस पडतात. या परिसरात ऊसाची शेती वाढत असल्यामुळे येथे त्यांना अधिवास मिळाला आहे. अस्वलाच्या वास्तव्यामध्ये प्रामुख्याने रिधोरा तामसवाडा भागात अधिवास असून हा भाग अस्वलखोरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. अस्वलीचे वास्तव्य सोनेगाव रीठ, सुसुद येथे सुद्धा असल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात वन्यजीवामध्ये सर्वाधिक अस्तित्व व अधिवास असलेल्या प्राण्यांमध्ये निलगाय, सांबर, हरित, रानडुक्कर, वानर, चितळ यांचा समावेश आहे. समुद्रपूर, गिरड, आर्वी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आदी परिसरात वन्यजीवाचे वास्तव्य आहे. रोहना, कावडघरा, जांभूळधरा आदी माळराणावर काळा हरिनचे वास्तव्य आहे. आष्टी पार्डीच्या जंगलात रानगायीचे अस्तित्व आहे.
‘खवल्या मांजर’ दुर्मीळ
चुनखडी व टेकडी असलेल्या भागात वास्तव्य करणाऱ्या ‘खवल्या मांजर’ दुर्मीळ होत आहे. जिल्ह्याचे वैभव असलेले खवल्या मांजराचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. दहेगाव गोंडी, सुसुम याच परिसरात केवळ अधिवास असलेल्या या वन्यजीवाची सुरक्षा आवश्यक असल्याने दुर्मीळ प्राणी म्हणून सर्व वन्यजीव प्रेमींनी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे कौशल मिश्रा यांनी सांगितले.

खवल्या मांजर हा पूर्णपणे रात्रीचर प्राणी असल्यामुळे सहजासहजी या प्राण्याला पाहणे शक्य होत नाही. या प्राण्याबद्दल अधिक अभ्यास केल्यानंतर त्यांचा अधिवास कसा सुरक्षित राहिल. याकडे विशेष लक्ष देतांना घोरपड पकडणाऱ्या शिकाऱ्याकडून या प्राण्यांचे संरक्षण आवश्यक आहे.
- अनिल गडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी,
वर्धा

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India