मुंबईतील ‘माईलस्टोन्स..’

मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन 'माईलस्टोन्स'ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे.

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्षे वयाचे इतिहासपुरुष अर्थात माईलस्टोन्स असे एकूण तेरा-चौदा माईलस्टोन होते व आजमितीस त्यातील केवळ सहा-सातच शिल्लक असून बाकीचे काळाच्या (की रस्त्याच्या?) उदरात गडप झाले आहेत अशी माहिती बऱ्याच ठिकाणी मिळते.. मी यापैकी काही 'माईलस्टोन'चा माग काढला व त्यांचं प्रत्यक्ष 'दर्शन' घेऊन आलो.. त्या 'माईलस्टोन्स'चे फोटो व लोकेशन आपल्याशी शेअर करतोय..!

हे सर्व माईलस्टोन्स मुळात सहा-सात फूट उंच होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो व ते तसे असावेत असा अंदाज आपण सहज बांधू शकतो कारण रस्त्यांवर मोटारी अवतरण्यापूर्वी सर्व प्रवास बैल वा घोडागाडीतून होत होता व बैलगाडी किंवा घोडागाडीची उंची जास्त असल्यामुळे त्यात बसलेल्या सवारीला किती अंतर झाले किंवा राहिले हे सहज दिसण्यासाठी तेवढी उंची गरजेचीच होती. हे माईलस्टोन्स आयताकृती उभट चौकोनी दगडाचे असून त्यावर रोमन अक्षरं कोरलेली आहेत व टॉप पिरॅमिडच्या आकाराचा आहे हे सोबतच्या फोटोंवरून दिसेल.

या माईलस्टोन्सवरील सर्व अंतरं 'सेंट थॉमस चर्च' पासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' म्हणजे आताच्या फोर्ट मधील हॉर्निमन सर्कलच्या पश्चिम दिशेस आहे, ते..! हुतात्मा चौकातून पूर्व दिशेस 'वीर नरिमन रोड' नांवाचा जो सरळ रस्ता 'अकबर अलीज' वरून हॉर्निमन सर्कलला जातो, तो रस्ता थेट या सेंट थॉमस चर्चलाच पोहोचतो. हे चर्च १६७६ साली बांधायला घेतलं व जवळपास चाळीस वर्षांनी म्हणजे १७१८ मध्ये पूर्ण होऊन प्रार्थनेसाठी खुलं करण्यात आलं अशी माहिती विकीपेडिया देतो.. या चर्चमुळेच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील सुरूवातीच्या स्टेशनचं नांव 'चर्चगेट' ठेवण्यात आलं आहे...

चर्चचा इतिहास थोडक्यात कथन करण्याचं कारण, मुंबईतल्या मैलांच्या दगडावरील अंतर या चर्चपासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' हे '0'- झीरोमाईल - मानलं गेलं होतं.. मी पाहिलेल्या सर्व दगडांवर '....FROM ST. THOMAS'S CHURCH' असा स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो.. चर्च ७१८ मध्ये तयार झालं असं लक्षात घेतलं, तर अंतर दर्शविणारे हे मैलांचे दगड सन १७१८ च्या नंतर बसवले गेले असावेत असा निष्कर्ष काढावा लागेल, म्हणजे त्याचं आजचं वय ३०० वर्ष व आसपास असल्याचं लक्षात येतं..!!

मी बघितलेला पहिला माईलस्टोन चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिमेस, ऑर्थर रोडच्या नाक्यावर आहे.. लालबाग मार्केटकडून जो पुलरस्ता चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिम दिशेस येतो व नंतर डावीकडे वळून भायखळ्याच्या दिशेने जातो, अगदी त्या वळणावरच डावीकडे हा 'माईलस्टोन' उभा आहे. हा 'माईलस्टोन' सेंट थॉमस चर्च' पासूनच 'IV MILES' – चार मैल - अंतर दर्शवितो.. या दगडावर कोरलेली 'IV MILES FROM ST. THOMAS'S CHURCH' ही अक्षरं जमिनीच्या पोटात लुप्त होण्याच्या मार्गावर असली तरी अजूनही स्पष्ट वाचता येतात..

मी पाहिलेला दुसरा माईलस्टोन सायनच्या पूर्वेस 'तामिळ संघम' नावाची प्रसिद्ध संस्था ज्या गल्लीत उभी आहे, त्याच गल्लीत उभा आहे. मुंबईहून सायनच्या दिशेने जाताना, उजव्या बाजूचे 'गांधी मार्केट' गेलं की लगेच पुढे काही अंतरावर 'तामिळ संघम'ची इमारत लागते.. ही इमारत, बाहेरचा मेन रोड व मेन रोडला समांतर, पण आतून जाणाऱ्या गल्लीच्या टोकाशी उभी आहे.. ही आतून जाणारी गल्ली पुन्हा पुढे मेन रोडला मिळते त्या गल्लीत हा माईलस्टोन उभा आहे.. हा असा मेन रोड पासून आत उभा का, या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही.. या दगडावर 'VIII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – आठ मैल - अशी अक्षरं कोरली आहेत.. कोणी स्थानिकाने या दगडास पिवळा रंग दिला आहे तो बहुतेक त्यावरील 'चर्च' या अक्षरांमुळे त्याची भाविक वृत्ती जागृत झाल्यामुळे असावा.. या दगडावरील सर्व डिटेल्स आजही स्वच्छ वाचता येतात.. हा दगड फुटपाथच्या पोटात समाधी घेण्याच्या तयारीत तिरका उभा आहे..!!

तिसरा माईलस्टोन मला भेटला तो दादरच्या पूर्वेस असलेल्या 'चित्रा सिनेमा'च्या अगदी समोरच्या बाजूस असलेल्या गुरूद्वारा इमारतीच्या दक्षिण टोकाच्या फुटपाथवर..! ह्यावर 'VI MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सहा मैल- अशी अक्षरे कोरली आहेत.

मला भेटलेला चौथा माईलस्टोन दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ असलेल्या गोल देवळापासून पोर्तुगीज चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. नेमकं सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी या परिसरातल्या ज्या बस स्टॉप जवळ बॉम्ब स्फोट झाला होता, त्या बस स्टॉपच्या शेजारीच हा दगड दिसेल. हा मैलाचा दगड 'VII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सात मैल - अंतर दर्शवतो.

असे आणखी दोन ते तीन माईलस्टोन्स मुंबईतील काळबादेवी, गोवालिया टँक आणि ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलपाशी असल्याचा उल्लेख नेटवर सापडतो. परंतु मी ते पाहिले नसल्यामुळे त्यांची माहिती इथे दिलेली नाही.

आता शिल्लक असलेले व मी पाहिलेले मैलाचे दगड आता जेमतेम दोन-अडीच फूट जमिनीवर आहेत. हे सर्वच माईलस्टोन्स निर्वासितासारखे असहाय्य होऊन फुटपाथवर दुर्लक्षित आहेत. दादरच्या गोल देवळाजवळच्या माईलस्टोनची अवस्था फारच बिकट आहे. केवळ एक फुटभर शिल्लक असलेल्या या माईलस्टोनवरील केवळ ‘VII’ एवढीच अक्षरे वाचता येतात, बाकी सर्व फुटपाथने गिळून टाकलंय. हे सर्व मैलाचे दगड ‘ग्रेड वन’च्या ‘हेरीटेज’ प्रकारचे असावेत. हा आपला इतिहास आहे, वारसा आहे..! यांची जपणूक करून ते भावी पिढ्यांच्या माहितीसाठी सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. ३०० च्या दरम्यान वय असणाऱ्या या पुराणपुरुषांना वृद्धाश्रमात (म्युझियममध्ये) न हलवता, आहे त्याच जागी त्यांना त्यांच्या मुळच्या स्वरुपात आणून, शेजारी त्यांची थोडक्यात माहिती देणारी पाटी लावल्यास अधिक सोईस्कर होईल.

- गणेश साळुंखे
9321811091

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India