बचतगट
महिलांसाठी वरदान ठरले आहे, असे म्हटले तर आज वावगे होणार नाहीत. गेल्या
काही वर्षांपुर्वी रूजलेली बचतगटाची चळवळ आज ग्रामीण भागात अगदी घट्ट झाली
आहे. कधी नव्हे तो महिलांच्या हातात पैसा खेळायला लागला आहे. ग्रामीण
अर्थव्यवस्था बचतगटाच्या आर्थिक उलाढालीतून समृध्द होत आहे. यासाठी
शासनस्तरावर जितके प्रयत्न झालेत त्यासाठी महिलांनी स्वत:हून केलेले
प्रयत्न अधिक महत्वाचे ठरले. महिलांनी चळवळ म्हणून बचतगटांना स्विकारले
नसते तर जिल्ह्यात या गटांच्या माध्यमातून आज जे चित्र निर्माण झाले आहे ते
कदापी पाहावयास मिळाले नसते.
बचतगटांच्या या चळवळीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे योगदान अतिशय
महत्वाचे आहे. महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी
माविमने जे प्रयत्न केलेत ते खरोखरीच दखल घेण्यासारखे आहे. गेल्या काही
दिवसात माविमच्यावतीने राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात 2 हजार 896
बचतगट स्थापन झाले आहे. या गटांमध्ये 34 हजार 565 महिलांचे संघटन झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजु महिला असुन यामध्ये
विशेषत: अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत,
कुटुंबप्रमुख महीला, जमीन नसलेल्या मजुरवर्गाचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातील या महिलांना माविमच्या प्रयत्नाने आर्थिककवच प्राप्त झाले
आहे.
जिल्ह्यात माविमच्यावतीने स्थापन झालेल्या महिला बचतगटांनी जवळपास 8 कोटी
रुपयांची बचत केली आहे. महिलांची ही बचत वाखानण्यासारखी आहे. जिल्ह्यातील
गटाच्या या महिलांनी आपसात तब्बल 22 कोटी 88 लाख रुपयांचे कर्ज व्यवहार
केले आहे. जिल्ह्यात बचतगटांचे चाललेले चांगले व्यवहार व नफ्यातील गटांची
कामगिरी पाहता विविध बँकांनी माविमच्या या महिला बचतगटांना तब्बल 20 कोटी
80 लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे या गटांनी त्यापैकी 14
कोटी 46 लाख रुपयांची परतफेडही केली आहे.
बचतगटांच्या महिला सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करतांना दिसतात.
दालमिलसह सामुहिक शेतीची अनेक कामे या गटांनी हाती घेतली आहे. जिल्ह्यात 2
हजार 333 गटांनी बिगर शेतीवर आधारीत व्यवसाय सुरु केले आहे. त्यात भाजीपाला
विक्री, किराणा, स्टेशनरीसारखी दुकाने, म्हैस-शेळी पालनासारखे व्यवसाय
सुरु केले आहे. गेल्यावर्षी 133 महिला गटांनी सामुहिक शेतीचा उपक्रम
राबविला होता.
केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ होणेच पुरेसे नाही तर महिलांसह गावाचेही सक्षमीकरण
झाले पाहीजे. यासाठी माविमच्यावतीने जिल्ह्यात तेजस्विनी महाराष्ट्र
ग्रामीण महिला सक्षमीकरण प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत
स्वयंसहायता महिला बचतगटाच्या माध्यमातुन महिलांचा सर्वांगिण विकास घडवून
आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वयंसहायता महिला बचतगटांनी प्रत्येक तालुक्यात 200 बचतगटांमागे एका
लोकसंस्थेची (सीएमआरसी) उभारणी करुन महिलांचा सर्वांगिण विकास घडवुन
आणण्याचा प्रयत्न या माध्यमातुन सुरु आहे. त्यात साधरणत: लोकसंस्था उभारणे,
लघु पतपुरवठा सेवा, उपजिविका आणि लघुउद्योग, उद्योजकता विकास व महिलांचे
सक्षमीकरण व सामाजिक समानता या चार बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 16 लोकसंस्था उभारण्यात आल्या आहेत.
मंगेश वरकड
0 comments:
Post a Comment