गेल्या दोन वर्षातील दुष्काळाने जीवापाड जोपासलेले पशुधन जोपासताना जीवाची घालमेल व्हायची. पण शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी सुरु केलेल्या चारा छावणीमुळे माझी 13 जनावरे नुसतीच वाचली नाही तर टुमटुमीत झालीत. चारा छावण्या नसत्या तर ही जनावरे विकण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता. हे बोल आहेत,तिरकवाडीच्या लता राजेंद्र शिंदे यांचे...
दुष्काळाचं यंदाच दुसर वर्ष पहिल वर्ष कसतरी निभावून गेलं. यंदा मात्र पाणी आणि चारा मिळत नसल्याने पोटाच्या पोराप्रमाणे जोपासलेली जनावरांची चारा-पाण्यावाचून होणारी तळमळ मनाला सहन होत नव्हती. शासनानं पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिलं. हाताला रोजगार हमीचं कामही दिलं. पण जनावरांची जोपासना करण्याची खरी गरज ओळखून जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतल्याने भीषण दुष्काळातही जनावरांची उत्तम सोय झाल्याचं समाधान आज आम्हाला दुधेबावी येथील चारा छावणीत अनुभवयाला आले आहे.
फलटण तालुक्यातील दुधेबावी विकास कार्यकारी सेवा सोसायटीने शेतकऱ्यांसाठी जे काही उपक्रम राबविले. त्यामध्ये दुष्काळग्रस्तांचे पशुधन जोपासण्यासाठी शासनाच्या सहकार्यातून चारा छावणी सुरु करण्याचा घेतलेला निर्णय सर्वाथाने महत्वाचा वाटतो. या सोसायटीचे चेअरमन आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव सोनवलकर यांनी दुधेबावी, वडले, तिकरवाडी, भाडळी ब्रु, भाडळी खुद्र, शासकल, झिरपवाडी, सोनवडी आदी गावातील जनावरांची सोय करण्यासाठी विकास सोसायटीच्या माध्यमातून दुधेभावी येथील पॅट्रॉन परिसरात जवळपास 10 एकर जागेवर 11 सप्टेंबर, 2012 पासून चारा छावणी सुरु केली. सुरुवातील या चारा छावणीमध्ये 110 जनावरे होती. आज मात्र 1 हजार 824 जनावरांची संख्या झाली आहे. यामध्ये 1 हजार 621 मोठी जनावरे असून 203 लहान जनावरे आहेत
दुधेबावी येथे शासनाच्या अनुदानातून सुरु केलेल्या या चारा छावणीमध्ये विकास सोसायटीच्या वतीने जनावरांसाठी नेट शेडद्वारे निवारा केला असू सोनवलकर म्हणाले, जनावरांना दर्जेदार हिरवा चारा देण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केला असून हिरवाचारा, पेंड, पाणी उपलब्ध करुन देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. जनावरांना मक्यासारखा दर्जेदार चारा उपलब्ध करुन देण्यासाठी जवळपासच्या सोनवडी, विडणी, गुनवरे, राजाळे, राजुरी आदी परिसरातून दररोज जवळपास 30 टन चारा उपलब्ध केला जात आहे. गिरवी प्रादेशीक नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध करुन देण्यात आले असून आठवड्यातून 4 किलो पशुखाद्याही जनावरांना उपलब्ध करुन दिले जात आहे. जनावरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, लसीकरण याकामासही प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले.
दुधेबावी विकास सोसायटीच्या वतीने सुरु केलेल्या चाराछावणीतून केवळ दुष्काळग्रस्तांच्या जनावरांची उत्तम प्रकारे सोय करण्याचा निर्धार केला नसून छावणी व्यवस्थापनातून दुधेभावी येथे केटी बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम तसेच दडस वस्ती येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रमाअंतर्गत विकास सोसायटीने लोकसहभागातून करुन दुष्काळ निवारणाला सहाय्यभूत होण्याची भूमिका स्वीकारल्याचेही श्री. सोनवलकर यांनी सांगितले. सध्या चारा छावणीत उत्तम प्रकारे चारा दिल्याने जनावरांची प्रकृती चांगली असून दुपत्या गायींचे दूधाच प्रमाणही वाढल्याचे ते म्हणाले.
या छावणीमध्ये तिरकवाडीच्या लता राजेंद्र शिंदे यांनी सुरुवातीपासून आपली 13 जनावरे दाखल केली असून यामध्ये 4 दुपत्या गायींचा समावेश आहे. या छावणीमध्ये जनावरांना पोषक खाद्य वेळेवर मिळाल्याने दुपत्या गायींच्या दूधामध्ये निश्चितपणे वाढ झाल्याचे मतही लता शिंदे यांनी व्यक्त केले. दुष्काळामुळे जनावरांचे आतोनात हाल होत होते आता मात्र चारा छावणीच्या उपक्रमामुळे जनावरांना वेळेवर मका, पेंड आदी गोष्टी मिळाल्याने जनावरे टुमटुमतीत झाली आहेत. शासनाच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
- एस.आर. माने
0 comments:
Post a Comment