‘मार्क्विस आर्थर वेलस्ली’ आणि ‘क्विन व्हिक्टोरिया’ – हरवलेले पुतळे
मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग.. या भागात मुंबईत पूर्वी असलेल्या परंतू स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या जागेवरून ‘हलवले’ल्या आणि आता 'हरवले’ल्या दोन पुतळ्यांची माहिती आपण घेऊ..
मागच्या तिसऱ्या भागात आपण हॉर्निमन सर्कल व त्यातील कारंजाच्या (एशियाटीक कडे पुढा करून उभं राहीलं असता) उजव्या बाजूस देवळीत स्थानापन्न असलेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची माहिती घेतली होती.. या लेखाचा विषय असलेला 'मार्क्विस ऑर्थर वेलस्ली' याचा पुतळा हॉर्निमन सर्कल मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याच्या बरोबर समोर, म्हणजेच कारंजाच्या डाव्या बाजूस होता.. ऑर्थर वेलस्ली सन १७९८ साली कोलकाता येथे गव्हर्नर जनरलच्या पदावर होते.. कॉर्नवॉलिसप्रमाणे हे ही जबरी योद्धे होते.. १८०३ साली मराठ्यांबरोबर आसे येथे झालेल्या लढाईत यांनी मराठ्यांवर विजय मिळवला होता व त्यांच्या या विजयाच्या सन्मानार्थ हा पुतळा येथे बसवण्यात आला होता.
हा पुतळा मोठा नमुनेदार होता. एका उंच चंबूतऱ्यावर वेलस्ली बसले होते. बाजूला खाली त्यांची मॅडम बसली आहे आणि दुसऱ्या बाजूस खाली एक देशी नागरिक उभा आहे. वेलस्ली त्या देशी नागरिकाला एक तोडा बक्षीस देत असून त्याची शेजारी खाली बसलेली मॅडम चबुतऱ्यावर असलेल्या “Wisdom, Energy, Integrity” या शब्दांकडे बोट दाखवत आहे. पुतळ्याचा चबुतरा ज्या चौथऱ्यावर बसवलाय, त्या चौथऱ्याच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस सिंहाचा पुतळा आहे. वाघ हे भारताचे प्रतिक तर सिंह इंग्लंडचे.. आसेच्या लढाईत सिंहाने वाघावर म्हणजे ब्रिटीशांनी मराठ्यांवर विजय मिळवला असे हे वाघ-सिंहाचे पुतळे सुचवत आहेत.. हा पुतळाही स्वराज्यात हलवला गेला सध्या या पुतळ्याचा मुक्काम कुठे आहे याचा काहीच ठाव ठिकाणा कळत नाही.. हा ‘हरवलेला’ पुतळा आहे. याचे एक जुने चित्र इंटरनेटवर मिळाले, ते सोबत जोडत आहे.
‘हरवलेला’ दुसरा पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा..!
आपण सीएसटी स्टेशनच्या पश्चिम दिशेने बाहेर पडून डाव्या हाताला दहा-बारा पावलं चाललो की स्टेशनचं भव्य मेन गेट लागतं.. या मेन गेट समोर, समोरच्या कॅपिटल थेटराकडे पाठ करून उभं राहिलं की स्टेशनचा घुमटादार मुख्य मनोरा व त्याखालच्या महिरपीतलं भव्य घड्याळ दिसतं. या घड्याळाखाली एक उभट रिकामा कोनाडा दिसतो त्याकडे आपलं लक्ष गेलंय कधी? या रिकाम्या कोनाड्यात स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा सहा-साडेसहा फुटी उंच पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर इतर पुतळ्याप्रमाणे तो ही इथून ‘हलवला’ गेला परंतु तो सध्या ‘हरवलेला’ आहे. सध्या हा पुतळा नेमका कुठे आहे हे शोधूनही सापडले नाही. सोबत या ठिकाणी असलेल्या राणीच्या पुतळ्याचा जुना फोटो व सध्याचा रिकामा कोनाडा असलेला नविन फोटो देत आहे.
‘व्ही.टी.’ स्टेशनचं नामकरण १९९६ साली ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं झालं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या स्टेशनला दिलंय त्यांचा पूर्णाकृती पुतळा स्टेशनच्या रिकाम्या कोनाड्यात राणीच्या जागी स्थापन केल्यास स्टेशनच्या नामकरणास अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं.
जाता जाता –
हॉर्निमन सर्कलमध्ये समोरासमोर असलेल्या कॉर्नवॉलिस आणि वेलस्ली या दोन पुतळ्यांनी त्याकाळी मोठी धमाल उडवली होती.. कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला स्थानिक हिंदू लोक हळू हळू देव मानायला लागले होते.. त्याची पूजाअर्चा करून त्यांना नवसही बोलू लागले होते.. कॉर्नवॉलिस याच्या पुतळ्यांच्या बाबतीत माडगावकर त्यांच्या १८६२ साली प्रकाशित ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात लिहितात, “या पुतळ्याला कित्येक हमाल, दुसरे गरीब गुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ, विडा, दक्षिणा ठेवून मानणूक करीत. परंतु अलीकडे सरकारने हे खूळ बंद करून टाकिले आहे. आता कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोर पोलीस ठेऊन गर्दी हटवली तर लोक वेलस्लीच्या पुतळ्याला भजायला लागले.. हा कोणीतरी नवा विलायती देव सरकारने आपल्यासाठी पाठवला आहे असा त्या काळच्या लोकांचा समज होऊन इथेही पुन्हा तोच प्रकार घडायला लागला. शेवटी या ठिकाणीही सरकारला पहारेकरी ठेवावे लागले होते असं माडगावकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
-गणेश साळुंखे
९३२१८११०९१
संदर्भ - ‘मुंबईचे वर्णन’, ले.गोविंद माडगावकर, सन १८६२
0 comments:
Post a Comment