काळा घोडा
दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापित, पुतळ्यांत 'काळा घोडा' पुतळ्याचा अव्वल नंबर लागेल. अव्वल याचसाठी की पूर्वी इथं असलेल्या या पुतळ्याविषयी बऱ्याच मुंबैकरांना ऐकून का होईना पण माहिती आहे.
सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारात असलेल्या चौक व परिसराला 'काळा घोडा' म्हणतात.. हा परिसर मुंबईचा 'आर्ट अॅण्ड कल्चर डिस्ट्रीक्ट' म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातील 'समोवार' रेस्टॉरन्ट (आता बंद), गॅलरीच्या समोरचं ऱ्हिदम हाऊस (हे ही आता बंद), इथून हाकेच्या अंतरावर असलेली नॅशनल आर्ट गॅलरी, भव्य म्युझियम आणि कला, संस्कृती, चित्रपट, नाटक आणि साहित्य यांवरील उत्तमोत्तम कार्यक्रम सातत्याने आयोजित करणारी ख्यातनाम जर्मन संस्था 'मॅक्समुल्लर भवन' अशासारख्या मातब्बर कलाकेंद्रांनी वेढलेला हा सारा परिसर..! हा सर्व परिसर जरी 'मुंबई'च्या कला क्षेत्रातील घडामोडीचा आयना म्हटला जात असला तरी तो प्रतिनिधित्व करतो ते मुख्यत: दक्षिण मुंबईतल्या 'एलीट क्लास'चं..! ही मुंबई ‘My Mumbai’ वाल्यांची..’ ‘माय मुंबई’ वाले त्या तिथे, मेट्रो पलीकडे आणि उपनगरांत..! मेट्रो सिनेमा पलिकडील सामान्य मुंबईकरांचा तसा या संस्थांशी वा या परिसराशी (अस्तंगत झालेलं ऱ्हिदम हाऊस वगळता) नोकरी व्यतिरिक्त फारसा संबंध येत नाही. नाही म्हणायला गेल्या काही वर्षापासून इथे भरत असलेला 'काळा घोडा फेस्टीवल' आता उपनगरातही चांगलाच परकोलेट होऊ लागलाय.. 'एलीट क्लास' आता उपनगरातही विस्तारायला लागलाय असा त्याचा अर्थ काढता येईल.
असो. जहांगीरच्या अगदी दारात, डेव्हिड ससून लायब्ररीच्या समोर सध्या जो पार्कींग लॉट आहे, तिथे हा 'काळा घोडा' त्याच्यावरील स्वारासकट १८७९ च्या मध्यावर उभा राहिला, तो सन १९६५ सालापर्यंत तिथेच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळुहळू ब्रिटीशांच्या सर्व पुतळ्यांची रवानगी गोडावूनमध्ये केली गेली त्यात हा पुतळाही होता.
१८७५ साली इंग्लंडच्या राजाने (तेव्हाच्या भारताच्याही), किंग एडवर्ड सातवा (प्रिन्स ऑफ वेल्स) यांने, मुंबईस भेट दिली व त्याच्या स्मरणार्थ त्याचा हा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. हा पुतळा सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या मुंबईतील श्रीमंत व परोपकारी ज्यू व्यापाऱ्यांने त्या वेळच्या मुंबई शहराला आणि शहरवासियांना भेट दिला होता. खरं तर हा पुतळा सातव्या एडवर्डचा, पण तो त्याच्यामुळे कधीच ओळखला गेला नाही. पुतळा सुरुवातीपासून ओळखला जातो तो त्याच्या घोड्यामुळे !
घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड संपूर्ण लष्करी, फिल्ड मार्शलच्या, गणवेशात असून राजा व त्याच्या बुटापासून केसांपर्यतचे काळ्या दगडात कोरलेले सर्व बारकावे मुद्दाम बघण्यासारखे आहेत. अत्यंत प्रमाणबद्ध असलेल्या आणि काळ्या पत्थरात घडवलेल्या या संपूर्ण शिल्पात घोड्याचं सौष्ठव इतक्या अचूकपणे पकडलय की तो अगदी जिवंत असून कधीही चालायला लागेल असा क्षणभर भास होतो आणि कदाचित म्हणून सातव्या एडवर्डपेक्षाही घोडाच लोकांच्या लक्षात राहिला असावा. कदाचित असंही असेल, की आपल्यावर राज्य करणाऱ्या राजाचं नाव कस घ्यायचं आणि म्हणून त्याचा उल्लेख काळा घोडा असा तेव्हाचे लोक करत असतील. इथं मला माझ्या आजीची आठवण येते. माझी लालबागची आजी आजोबांचा उल्लेख ‘हापिस आलं’, ‘हापिस गेलं’ अशी करायची, तसं असेल किंवा एवढं मोठ कठीण नाव घेण जमतही नसेल त्या काळच्या लोकांना..! ते काही असलं तरी या जोडीतला लोकांच्या लक्षात राहिला तो घोडाच..!
देश विदेशात “बॉम्बे”ची मोस्ट हॅपनिंग प्लेस म्हणून ‘काळा घोडा’ - तो तिथे नसला तरी - अजुनही मशहूर आहे.. नाव कायम असलं तरी घोडा त्याच्यावरील स्वारासकट त्याच्या या जागेवरून गायब आहे. अनेकांना वरील कथा माहितही असेल परंतु नवीन पिढीला ‘काळा घोडा’ म्हणजे नक्की काय हे माहित नसण्याचीच शक्यता आहे..
तर असा हा 'काळा घोडा' सध्या भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात (राणीच्या बागेत) उभा आहे.. उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे तिकीट काढून आपण आत गेलो की डाव्या हाताला अगदी समोरच आपला सुप्रसिद्ध ‘काळा घोडा’ त्याच्या पाठीवर सातव्या एडवर्डला घेऊन दिमाखात उभा आहे.. इतकी वर्ष उलटून गेली तरी त्याचा आणि त्याच्यावरील राजबिंड्या स्वाराचा रूबाब जराही कमी झालेला नाही.. हे संपूर्ण शिल्पच देखण आहे.. आता या इतक्या अप्रतिम शिल्पाला इथे का म्हणून उभं केलं असावं, असा बावळट प्रश्न मला पडला होता. नंतर मनात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश साम्राज्यवाद्यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हलवताना त्याचं ‘सरकारी वर्गीकरण’ केल गेलं असाव.. जे फक्त माणसांचेच पुतळे होते ते अन्य ठिकाणी गेले. हा पुतळा मात्र ‘प्राण्या’ सकट होता आणि म्हणून कदाचित याची रवानगी 'प्राणी' संग्रहालयात करावी असं एखाद्या देसी बाबूच्या मनात आलं असणं शक्य आहे आणि परिणामी घोडा स्वारासकट इथे आला असावा..
जाता जाता –
‘काळा घोडा’ हे सुरेख शिल्प सर अल्बर्ट डेव्हिड ससून यांनी सन १८७९ साली रु. १,२५,०००/-खर्चून बनवून घेतले होते.. घोड्यासहीत स्वाराचे संपूर्ण शिल्प सुमारे १२-१३ फूट उंचआहे.. श्री. मोरेश्वर शिंगणे आणि श्री.बाळकृष्ण आचार्य यांनी सन १८८९ साली लिहिलेल्या 'मुंबईचा वृत्तांत' या पुस्तकात वरील माहिती मिळते..
या पुतळ्याच्या खाली एक चबुतराही होता. या चबुतऱ्यावर किंग एडवर्डच्या भारतातील संस्थानिकांशी झालेल्या मुलाखतीचं दृश्य कोरलेलं होतं असं श्री. शिगणे यांनी लिहून ठेवलंय.. चबुतऱ्यावर कोरलेले भारतीय संस्थानिकांचे चेहेरे तर इतक्या सफाईने कोरले होते की कोणता चेहेरा कोणाचा हे सहज लक्षात यायचं असं शिंगणे म्हणतात.. या चबुतऱ्याचा शोध घ्यायचा मी खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही..!
'काळा घोडा' ही अप्रतीम कलाकृती आणखी काही काळाने काळाच्या उदरात गडप होण्याच्या आत आपण हे शिल्प जरूर बघून घ्यावं..
-गणेश साळुंखे
9321811091
(संदर्भ - मुंबईचा वृत्तांत -सन १८८९-लेखक मोरेश्वर शिंगणे व बाळकृष्ण आचार्य)
0 comments:
Post a Comment