महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना राबवित आहे. महामंडळाचे पर्यटक निवास हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी हक्काचा निवारा ठरत आहे. तसेच या पर्यटक निवासातील मुक्काम हा एक निसर्गरम्य अनुभव ठरतो. या पर्यटक निवासात राज्यातील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू असून याअंतर्गतच राज्यातील माजी सैनिकांसह, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनादेखील पर्यटकांचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळाकडून पर्यटक निवासांच्या भाड्यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
माजी सैनिकांसाठी सवलत :
पर्यटन महामंडळाने आपल्या पर्यटक निवासांच्या दरपत्रकामध्ये भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांसाठी सर्व हंगामात 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत फक्त एका कक्षाच्या आरक्षणावर लागू राहील.
अपंग व्यक्तींसाठी सवलत :
सर्व पर्यटक निवासात राहण्यासाठी येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी एका कक्षासाठी 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत 40 % व त्यावरील अपंगत्वाचे ओळखपत्र सादर करणाऱ्यांसाठी लागू राहील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत :
महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ते राहत असलेल्या एका कक्षाच्या आरक्षणावर 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येईल.
याचबरोबरअनिवासी भारतीय आणि शासकीय कर्मचारी हा पर्यटन व्यवसायासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या घटकांसाठीदेखील सवलती देण्यात आल्या आहेत.
अनिवासी भारतीयांसाठी सवलत :
देशात येणाऱ्या अनिवासी भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या पर्यटक निवासामध्ये अनिवासी भारतीयांसाठी एका कक्षासाठी 10 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी उपभोक्त्यांना त्यांच्या पासपोर्टची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत :
महामंडळाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र दर्शन सवलत योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एका कक्षाच्या आरक्षणावर पर्यटक हंगामामध्ये 10 टक्के व बिगर हंगाम कालावधीमध्ये 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ शासकीय कर्मचारी घेऊ शकतात.
याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व न्याहारी योजनेत अधिकृत निवास व न्याहारी योजनाअंतर्गत पर्यटकांना घरगुती निवासव्यवस्था उपलब्ध होत आहे. तसेच महामंडळाकडून होम स्टे ही पर्यटकांसाठी घरगुती पर्यटन योजनादेखील राबविण्यात येत आहे.
योजनांच्या अधिक माहितीसाठी ‘प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी’ यांच्याशी संपर्क साधावा.
- जिल्हा माहिती कार्यालय,
रत्नागिरी
पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास पर्यटकांसाठी निसर्गरम्य अनुभव
Posted by
rajeshkhadke
on Saturday, 30 April 2016
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment