पुद्दूचेरीचे
भौगोलिक क्षेत्रफळ 492 चौरस आहे. राज्याच्या प्रमुख भाषा तमिळ, तेलगु,
मल्याळम, इंग्रजी व फ्रेंच या आहेत. 1956 पर्यंत फ्रेंच हीच स्थानिक
कायदेशीर भाषा होती. 2011 च्या जनगणनेनुसार पुद्दूचेरीची लोकसंख्या 654,392
इतकी आहे.
पुद्दूचेरीत पूर्वाश्रमीची फ्रेंच वसाहत होती. दक्षिण भारतातील केंद्र
शासित प्रदेश. पुद्दूचेरी, करईकल, माहे आणि यानम या फ्रेंच वसाहती
विखुरलेल्या आहेत. पुद्दूचेरी ही फ्रेंचांची भारतातील राजधानी व मुख्यालय
समजले जात होते. जवळपास 138 वर्षे येथे फेंचांचे राज्य होते. पुद्दूचेरी 1
नोव्हेंबर 1954 रोजी भारतात विलीन झाले. पूर्वेला बंगालची खाडी व उर्वरीत
तिन्ही बाजूंना तमिळनाडू राज्य. पूर्व किनाऱ्यावर करईकल तर माहे पश्चिम
घाटावर मलबार किनाऱ्यावर कालिकत विमानतळ आहे. माहे पासून 70 किमी यानम
आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्याला जोडून आहे. यानम विशाखापट्टनम
विमानतळापासून 200 किमी अंतरावर आहे.
केंद्र शासित प्रदेश पुद्दूचेरीच्या एकूण लोकसंख्येपैकी 45 टक्के लोकसंख्या
शेती व शेतीसंबंधी उद्योगांवर आधारीत आहे. 90 टक्के शेती सिंचनाखाली येते.
धान व डाळी ही पिके प्रमुख आहेत. माहे प्रांतात नारळ, मसाले, सुपारीची
पिके तर यानम मध्ये डाळी, शेंगदाणे व मिरचीची पिके घेतली जातात. तसेच अन्य
पावसाळी पिकेही येतात.
वस्त्र, संगणक, संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रानिक उत्पादने, औषधी,
चामड्याच्या वस्तू, साखर, धागे, स्पिरिट, बियर, पोटॅशियम क्लोरेट, वापरा व
फेका प्रकारच्या सिरिंज, छताचे पत्रे, वॉशिंग मशीन, पोलादी नळ्या,
स्वयपाकाचा गॅस आदी उद्योग पुद्दूचेरीत चालतात.
पुद्दूचेरीला फ्रेंच संस्कृती हा सांस्कृतिक वारसा आहे. येथील सुनियोजित
शहरांच्या रचनेमध्ये फ्रेंच लोकांचा वारसा झळकत राहतो. वॉर मेमोरियल,
फ्रेंच बौलेवर्ड टाऊन, श्री अरविंदो आश्रम, आयुरोव्हिले म्युझियम, चुननावर
रिसॉर्ट, बोटॅनिकल गार्डन, डान्सिंग म्युझिकल फाऊंटन, ओसूडू लेक ही पर्यटन
स्थळे महत्त्वाची आहेत. पुद्दूचेरीला लिखित साहित्याचाही इतिहास असून तमिळ
कवी भारतीदासन हे पुद्दूचेरीचे कवी म्हणून ओळखले जातात.
पुद्दूचेरीचे लोकप्रिय नृत्य म्हणजे रामायणातील मिथकावर आधारीत असे वानर
नृत्य आहे. हे नृत्य पाच ते आठ तास सलग पद्धतीने साजरे केले जाते. दोन मोठे
ड्रम या नृत्यासाठी वाजवले जातात. या ड्रम्सना रामढोल म्हणतात. या
नृत्याला वानर नृत्यही म्हणतात. नृत्याच्या वेळी पुरूष लोखंडी रींगा
वापरतात. या रींगांची संख्या दहा पर्यंत असते. या रींगा पायात घालून
विशिष्ट पदन्यासाने नाच केला जातो. नृत्य करताना या रींगांचा संगीतबद्ध नाद
ऐकू येत असतो. या लोखंडी रींगांना अंजली असे म्हणतात.
दक्षिण भारतातला पोंगल हा सणही पुद्दूचेरीत साजरा करत असले तरी मासीमागम
नावाचा उत्सव खास पुद्दूचेरीचा आहे, मासि नावाच्या तमिळ महिन्यात
(फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान) पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला
जातो. यावेळी अनेक भक्त आपले पापक्षालन करण्यासाठी खोल समुद्रात स्नान
करतात. यामागे मिथक असे आहे की, सोवरी राजाने कोळी महिलेशी विवाह केला
म्हणून कोळी वस्तीत राजाला प्रवेश मिळाला. या सणाकडे माणुसकीचा सण म्हणूनही
पाहिले जाते.
विल्लीयनूर मंदिर उत्सव, बेस्टील दिवस (फ्रांस डे) हे उत्सव पुद्दूचेरीत
उत्साहाने साजरे केले जातात. मंदिर उत्सव हा पारंपरिक भारतीय सण आहे तर
बेस्टील दिवस हा फ्रांसचा सण आहे. फ्रेंच पद्धतीने बनवलेले (पदार्थ) अन्न
उत्सवही फेब्रुवारी महिन्यात पाळला जातो. पारंपरिक ख्रिसमससह अरविंद घोष
यांची जयंतीही दिमाखात साजरी केली जाते.
दक्षिण भारतातील पुद्दूचेरी हे उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. पुद्दूचेरी
हे फ्रेंच रचनेचे शहर असून विशिष्ट पद्धतीच्या इमारती, चर्चेस, मंदिरे आणि
पुतळे हे अगदी योजनाबद्धरित्या उभारले आहेत. अरविंद घोष यांचा आश्रम आणि
चार समुद्र किनारे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतात. त्यातील रॉकी बीच
जास्त लोकप्रिय आहे. अॅरोव्हीले नावाचे प्रायोगिक शहर पुद्दूचेरी पासून आठ
किमी वर आहे, तेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.
गिनगी, गुदुवयार, मलतार, पमबाइयार, पेनियार, करिकल, अरसालर, नांदलर, नत्तर,
नुलर, प्रवादयनार, वंजीर, माहे, पोनियार, गौतमी या नद्या पुद्दूचेरीतून
वाहतात.
पुद्दूचेरीत इतर आदिवासी आढळत नाहीत म्हणून आदिवासी संस्कृती वा त्यांच्या घटक बोलीही नाहीत.
(या व्यतिरिक्त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)
- डॉ. सुधीर राजाराम देवरे
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com
सांस्कृतिक भारत : पुद्दूचेरी (पाँडेचेरी)
Posted by
rajeshkhadke
on Sunday, 21 August 2016
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment