दुर्गाडीचा
किल्ला, ठाणे जिल्ह्यात असून कल्याण रेल्वे स्थानकाकडून भिवंडीच्या
रस्त्यावर कल्याण शहराच्या सीमेवरील खाडीच्या तीरावर हा किल्ला आहे. हा लेख
दुर्गाडीच्या किल्ल्याबाबत असला तरी कल्याण व दुर्गाडी तसे फारसे दूर
नाहीत. आजही दुर्गाडी ही कल्याणची शीव आहे. म्हणूनच कल्याणचा इतिहास वगळून
केवळ दुर्गाडीची माहिती देणे अनुचित ठरेल. बहुतांशी प्रमाणात कल्याणचा जो
इतिहास तोच दुर्गाडीचाही इतिहास आहे.
कल्याण हे खाडीीकिनारी असलेले गाव अगदी प्राचीन काळापासून व्यापारी पेठ
म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहनांच्या काळापासून या बंदरातून व्यापार चालू
होता. यादवांच्या पाडावानंतर हा मुलुख मुसलमानांच्या ताब्यात गेला. बहामनी
राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण शहर प्रथम बहामनी राज्यात होते. पहिल्या
अहमदशहाने उत्तर कोकणावर स्वारी करुन इतर मुलुखाबरोबर कल्याणही जिंकले व
पुढे आपल्या स्वतंत्र शाहीची (निजामशाहीची) घोषणा केली. याप्रमाणे कल्याण
निजामशाहीत आले.पुढे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचे मोगल यांनी संयुक्त चढाई
करुन निजामशाही संपवली व परिणामत: कल्याण आदिलशाही साम्राज्याचा भाग बनला.
इ.स.1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणावर मोहिम काढली. त्यावेळी
महाराजांनी दादाजी बापूजी रांझेकरांना कल्याण काबीज करण्यास फर्मावले व
त्यानुसार रांझेकरांनी दिनांक 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण काबीज केले.
कल्याण काबीज होताच शिवाजी महाराज स्वत: कोकणाच्या स्वारीवर निघाले.
फौजेसह ते नुकत्याच जिंकलेल्या कल्याणमध्ये आले. यावेळी कल्याणमध्ये
स्वराज्याच्या आरमाराची स्थापना झाली. यावेळी त्यांनी ताब्यात घेतलेली
गलबते व होड्या हे स्वराज्याचे पहिले आरमार होय. हे स्वराज्याचे पहिले
आरमार प्रथम कल्याणच्या खाडीत तरंगले हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
त्याचवेळी कल्याण येथेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल किंवा
नौदलप्रमुख म्हणून दर्यासारंगाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे इब्राहिमखान,
दौलतखान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात
सामील केले.
खाडीच्या किनाऱ्यावर एका टेकाडावर दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या
चारही बाजू उपदिशांना म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या दिशांना
अभिमुख आहेत. चार कोपऱ्यात चार बुरुज व पूर्व कोपऱ्यातील बुरुजालगत
असलेला आणखी एक बुरुज, या दोन बुरुजांमध्ये असलेले महाद्वार व काहीसा
आयताकार तलविन्यास असलेला बाह्यकोट असे या किल्ल्याचे स्वरुप आहे.
आतील भागात चौकोनी तलविन्यासाचे एक पीठ असून त्यावर देवीचे मंदिर आहे. हे
देवीचे मंदिर आग्नेयाभिमुख आहे. (आजच्या अत्याधुनिक चुंबकीय सुईने जरी
आग्नेय दिशा सूचित केली असली तरी किल्ला व मंदिर बांधले गेले त्यावेळी
दिशासाधन सूर्याच्या दिशेवरुन केले जात असे. त्यामुळेच उत्तरायण व
दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाची दिशा सतत बदलती असल्यामुळे चुंबकीय सुईने
दाखवलेली आग्नेय दिशा किल्ला व मंदिर बांधले गेले त्या काळात पूर्व मानली
गेली असण्याची दाट शक्यता आहे.) या मंदिराच्यामागे मंदिराच्या पीठाच्या
साधारणपणे निम्म्या उंचीचे आणखी एक लंबआयताकार पीठ असून त्यावर इदगाह आहे.
किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी जाड असून बांधकाम मजबूत होते असे दिसते.
तथापि बुरुजावरील व तटांवरील मूळ कठडे आज शिल्लक नाहीत. त्यामुळे
तोफांच्या खाचा व गोळीबार गवाक्षे होती की नव्हती, अथवा असल्यास कोणत्या
ठिकाणी होती ते कळण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची
पातळी तटाइतकीच उंच आहे. किल्ल्याच्या अंतर्भागाच्या जमिनीची पातळी
वायव्येकडून आग्नेयेकडे कललेली, म्हणजेच उताराची आहे.
किल्ल्याचे बुरुज सर्वसाधारणपणे वर्तुळाकृती तलविन्यासाचे आहेत. यातील एका
बुरुजाचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असून त्यावर रंगरंगोटी व कमळाच्या
पाकळ्यांच्या आकाराचे कठडे उभारण्यात आले आहेत. एका बाजूचा बुरुज मधूनच
ढासळला आहे. बाकीचे दोन बुरुज कठडे नसलेल्या स्थितीत पण बऱ्यापैकी टिकून
आहेत.
किल्ल्याच्या आग्नेय तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या
प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ
किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते
कळण्यास मार्ग नाही. याच तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे.
या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ
किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते
कळण्यास मार्ग नाही.
किल्ल्याच्या अंतर्भागात मंदिराचे एक व इदगाहाचे एक अशी दोन पीठे असली तरी
या पीठांनी बालेकिल्ला बनला नव्हता; म्हणजेच निराळ्या शब्दात या किल्ल्याला
आत बालेकिल्ला नव्हता हे निश्चित. किल्ल्यामध्ये एक इदगाह व एक देवीचे
मंदिर एवढ्या दोनच जुन्या वास्तू आहेत. मंदिराचे अलिकडेच नुतनीकरण झाले
आहे. हे नुतनीकरण मूळ मंदिरानुसारच करण्यात आले (म्हणजे निदान त्याचा
तलविन्यास तरी मूळ मंदिरानुसारच ठेवण्यात आला) असे सांगण्यात येते. या
मंदिरात आजही पूजाअर्चा होते. दर नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो व
देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.
दुर्गाडी किल्ला जलदुर्ग असला तरी वसईच्या किल्ल्याप्रमाणे खाडीतून थेट
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग नाही. निराळ्या शब्दात नौदलाच्या
सहाय्याने या किल्ल्याची कुमक करता येईल अशी परिस्थिती नव्हती. हा किल्ला
मराठ्यांनी बांधला असल्यामुळे आणि किल्ल्याच्या निर्मितीच्यावेळी लगतचा
प्रांत मराठ्यांच्याच ताब्यात असल्यामुळे तशी सोय असण्याची फारशी गरजही
नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे नौदल स्थापन करायचे होते. आपले नौदल
कसे असावे याबाबतचे शिवछत्रपतीचे विचार अगदी स्पष्ट होते. स्वराज्याचे
शेजारी म्हणून पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासारखे दर्यावर्दी लोक होते.
त्यांचा दर्यावर्दी अनुभव व तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे याची महाराजांना
कल्पना होती. म्हणून आपले आरमार त्यांच्या बरोबरीचे किंवा तोडीचे नसले तरी
अधिक वेगवान असावे, शत्रूचे मोठे आरमार चालून आले तर त्यांची जहाजे आत
शिरु शकणार नाहीत अशा खाड्यांमध्ये आपल्या जहाजांना लपता आले पाहिजे अशी
त्यांची धारणा होती. त्या दृष्टीकोनातून दुर्गाडीचा किल्ला लष्करीदृष्ट्या
मोक्याच्या ठिकाणी होता असेच म्हणावे लागेल.
किल्ल्याची नैऋत्यकडील तटबंदी पडून गेली असून तिचा पायाच फक्त शिल्लक आहे.
तटबंदीचे व बुरुजांचे कठडे आणि महाद्वार पडून गेले आहे. तथापि
सर्वसाधारणपणे किल्ल्याची कल्पना येईल इतपत अवशेष आजही टिकून आहेत. हा
किल्ला तसा छोटेखानी असला तरी स्वराज्याचा पहिला आरमारी तळ म्हणून या
किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.
संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक
फिरंगाणातील अर्थात मुंबई परिसरातील किल्ले : दुर्गाडीचा किल्ला
Posted by
rajeshkhadke
on Sunday, 21 August 2016
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment