अलिबाग
पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या
रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय
प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल,
सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल,
खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे.
दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त, ग्रीस, आखातातील
काही देश, चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता.
एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना ? त्याचे उत्तर चौलच्या
बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड, त्यातच बंदरात असल्याने
संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या स्थळांचा
आपापल्या भाषा-संस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे
जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य
मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत, पुढे नदी मंडप, दिपमाळ आणि सुंदर
पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५
मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे.
गाभाऱ्याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या
घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात
तीन कुंड आहेत. पर्जन्य, वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ
पडला, पाऊस आटला की पर्जन्य कुंड, वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी
वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची
उणीव ही कुंड भागवत असतात.
या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन
ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला.
पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण
पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ
लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून
हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही
स्नानगृह ! कमानीची रचना, तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या
वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी, हौद तर येथील शाही श्रीमंतीच !
कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी, सज्जे,
घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या
चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला
आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा,
नागपंचमी, गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात
प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा
मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय
स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की
कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे.
चौलचा अगदी प्राचीन उल्लेख "पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी" या आणि टॉलेमीच्या
दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या
डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्या काळातील चौलशी असलेले नातेसंबध
दर्शविते, पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा
त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने
चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष,
"जेटी"ची भिंत, सातवाहन कालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन
संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही !
कसे जावे ?
मुंबई-अलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टम-टमच्या सहाय्याने
चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ
इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग
पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टम-टम, एस.टीने चौलला जाता येते.
परंतु, पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते.
- श्वेता दांडेकर
dandekarshweta12@gmail.com
9757282750
0 comments:
Post a Comment