राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप स्वरूपातील प्रभागनिहाय मतदार याद्या मतदारांच्या हरकती व सूचनांसाठी 8 मे 2013 रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याबाबत हरकती असल्यास त्या 17 मे 2013 पर्यंत संबंधित ठिकाणी लेखी स्वरुपात दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

आगामी काळात मुदती संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या विविध जिल्ह्यांमधील एकूण 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह इतर काही ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची 15 एप्रिल 2013 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. प्रारुप स्वरुपातील ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या मतदारांच्या परीक्षणासाठी तसेच हरकती व सूचना मागविण्याकरिता 8 मे 2013 रोजी ग्रामपंचायतींच्या चावडीवर व इतर संबंधित ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील. स्थानिक मतदारांना या यादीसंदर्भात आक्षेप असल्यास त्यांनी ते लेखी स्वरुपात 17 मे 2013 पर्यंत दाखल करावेत. आक्षेपांची तपासणी झाल्यानंतर 24 मे 2013 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे : ठाणे- 9, रायगड- 156, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 15, धुळे- 6, जळगाव- 7, अहमदनगर- 72, पुणे- 53, सोलापूर- 2, सातारा- 12, सांगली- 30, कोल्हापूर- 52, औरंगाबाद- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 3, यवतमाळ- 5, वर्धा- 5, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 3. एकूण- 451.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India