'शीर'धारेने शेत फुलले

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेला लोकप्रतिनिधींच्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली की विकासाला गती प्राप्त होते हे शीर गावात गेल्यावर चटकन लक्षात येते. ग्रामविकासासंबंधी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील या गावाने शासकीय योजना + लोकसहभाग = विकास हे सूत्र यशस्वीपणे अंमलात आणले आहे. याच आधारे गावाने उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करीत रब्बीची शेतीदेखील फुलविली आहे.

शीर नदीचे पत्र तसे अरुंद आहे. गावाच्या मधोमध असणाऱ्या या नदीचे पात्र उन्हाळ्यात आटत असे. त्यामुळे गावातील विहीरींचे पाणीदेखील कमी होई. शिवाय रब्बीसाठी पाणी उपलब्ध होत नसे. ग्रामविकासाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या गावचे सरपंच शिवराम अंबेकर आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनंत पवार यांनी उन्हाळ्यातील पाणी नियोजनासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन विस्तार अधिकारी बी.बी. पाटील आणि कृषि सहाय्यक आर.के.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने 2011-12 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रस्ताव सादर केला.

या योजने अंतर्गत वर्षभराच्या कालावधीत नदीपात्रात 5 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्याच्या कामावर 35 लक्ष रुपये खर्च करण्यात आला. दोन ठिकाणी वळण बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधाऱ्याचा आकार नदीपात्रानुसार निश्चित करण्यात आला आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यातही नदीपात्रात पाणी उपलब्ध आहे. शिवाय परिसरातील 12 विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे.

बंधाऱ्यातील पाण्यामुळे 35 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन करण्यात येत आहे. 200 हेक्टर खरीप क्षेत्रात पाऊस लांबल्यास भातपिकास पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे कृषि विस्तार अधिकारी आर.बी.शिंदे यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी ग्रॅव्हीटीने पाण्याचा पुरवठा होत असल्याने विद्युत पंपावर होणाऱ्या खर्चातदेखील बचत झाली आहे. गावाला लागून असलेल्या कोतळूक आणि काजुर्ली गावासाठीदेखील या पाण्याचा उपयोग होत आहे.

गावात पाणी उपलब्ध झाल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून सामुहीक शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे. सायफन पद्धतीने पाण्याचा उपयोग करून मोरेवाडी येथील गोमटेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचत गट, सोमेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचत गट आणि वज्रेश्वरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट अशा तीन महिला बचत गटातील 42 महिलांनी 3 एकर जमीनीवर वांगी, मिरची, भेंडी, मुळा, कोबी, कोथंबिर आदीचे उत्पादन घेतले आहे. भाटले-आंबेकरवाडीच्या महिलांनीदेखील बचत गटाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवसाय सुरू केला आहे.

गावात उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाल्याने गावात ठिकठिकाणी नळाद्वारे पाणी पुरविण्याची सोय होत आहे. ग्रामस्थांनी लोकसहभागातूनही अशा योजना राबविल्या आहेत. शासकीय योजना योग्य पद्धतीने राबविल्यास ग्रामविकासाला कशी चालना मिळते याचे शीर उत्तम उदाहरण आहे.

डॉ. किरण मोघे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India