ठिबक सिंचनाने दिलं पाणी वृक्षांना दिली नवसंजीवनी

संपूर्ण जालना जिल्ह्यातच पाण्याची टंचाई. हे गाव ही त्याला अपवाद नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाणी आहे, पण कमी. अशा परिस्थितीत गावात दररोज 12 हजार लिटर पाण्याचा टँकर येतो. टँकरचे पाणी विहिरीत सोडण्यात येते. नंतर हे पाणी जलस्वराज्य योजनेअंतर्गत बांधलेल्या 30 हजार लिटर क्षमतेच्या टाकीत चढवण्यात येते आणि तेथून गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो. पाण्याची एवढी टंचाई असतांना पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून लावलेली आणि मोठ्या मायेने जपलेली झाडं जगवायची कशी असा प्रश्न होता. पण म्हणतात नं इच्छा तिथे मार्ग. त्याप्रमाणे गावकऱ्यांनी हा प्रश्नही मोठ्या युक्तीने सोडवला.

अख्खं गाव एकत्र आलं. सगळ्यांनी मिळून या प्रश्नावर तोडगा काढला. गावातील 100 टक्के घरं भूमिगत नाल्यांनी जोडण्यात आली. या नाल्यामधील सर्व पाणी एका सेफ्टी टँकमध्ये एकत्र करण्यात आलं. पहिल्या टाकीत पाणी सोडल्यानंतर पाण्याबरोबर आलेली माती आणि इतर कचरा त्याच टाकीच्या तळाशी बसला. त्यानंतर थोडं नितळ झालेलं पाणी दुसऱ्या कप्प्यात सोडण्यात आलं आणि अशाचपद्धतीने दुसऱ्या कप्प्यातील पाणी तिसऱ्या कप्प्यात. या तिसऱ्या कप्प्यावर 1 एच.पी ची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आणि या स्वच्छ झालेल्या साधारणत: सहा हजार लिटर सांडपाण्याचा ग्रामपंचायतीने पुनर्वापर सुरु केला. ठिबक सिंचनाद्वारे हे पाणी झाडांना दिल्याने झाडं हिरवीगार राहिली. जिल्ह्यात पाणी टंचाई असतांना सांडपाण्याचा पुनर्वापर करून गावाने वृक्षांना दिलेली नवसंजीवनी निश्चित कौतूकास्पद आहे.

ही गोष्ट आहे तालुका-जिल्हा जालनाच्या नसडगावची. जालना जिल्ह्यापासून 35 कि.मी अंतरावरचं आणि अवघ्या 96 उंबऱ्याचं हे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम 455. गावात सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्यानं नांदतात.

गावाला संत परंपरेचा आणि अध्यात्माचा वारसा आहे. गावात नसरिउद्दिन बाबांचा दर्गा आहे. त्यांच्या नावावरूनच गावाला नसडगाव असे नाव पडले. गावची पूर्वीची स्थिती एकदम वेगळी होती. गावात दळणवळणाचा मार्गही नव्हता.. गावात फारशी हिरवाई नव्हती की शौचालये. ग्रामपंचायतीची कर वसुलीही 70 ते 80 टक्के एवढीच. गावात बायोगॅस नव्हता की सांडपाणी व्यवस्थापनाची सोय. घरात साधे दिवे वापरले जात. स्वच्छतेच्या नावानेही ओरडच होती.

गावाचं हे चित्र बदलण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. विकासाची कास धरत श्रमदानाचा निर्धार केला. गावकऱ्यांनी मिळून श्रमदानातून 4 कि.मी चा रस्ता बांधला. निर्मलग्राम अभियानात सहभागी व्हायचे ठरवल्यानंतर गावात "घर तिथे शौचालया"ची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. 2004-05 मध्ये गाव "निर्मल" झालं. तेंव्हापासून आजपर्यंत गावाने स्वच्छतेचा हा वसा सोडला नाही. हळुहळु गावाचं चित्र बदलू लागलं. ग्रामविकासाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेत गावानं सुधारणा राबविल्या. अभियानात आणि स्पर्धेत भाग घेत गावाचा कायापालट केला.

त्यानंतर स्पर्धेतील सहभाग आणि पुरस्कार हे गाव विकासाचं एक समिकरणच झालं. गावात मागील 36 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा भांडण तंटा नाही. गावात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत कल्याणी नदीवर भूमीगत बंधारा बांधण्यात आला आहे. "घर तिथे शौचालय" या उपक्रमाप्रमाणे "घर तिथे नळ जोडणी" उपक्रम राबविण्यात आला असून प्रत्येक नळ जोडणीवर वॉटर मिटर आणि फेरुल वॉल बसविण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पाणी वापराची शिस्त आली.
गावानं विकासाची हीच शिस्त इतर कामांमध्येही कायम ठेवली. यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गावातील सगळे रस्ते सिमेंटचे केले.

गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत भाग घ्यायचं ठरवलं. गावातील लोकसंख्येएवढी झाडं लावण्यासाठी गावातच 5000 रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. नारळाच्या 500 झाडांसह विविध जातीच्या रोपांची गावशिवार, शेतीबांध, शाळा, अंगणवाडी,दर्गा परिसर, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लागवड करण्यात आली. गावची लोकसंख्या अवघी 455 पण गावानं झाडं लावली 5000. गावकऱ्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडाला क्रमांक दिले. एकत्र केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करीत लावलेल्या पाच हजार झाडांपैकी 3300 झाडं जगवण्यात आणि फुलवण्यात गावाला यश आले.

ग्रामपंचायतीचे संगणकीकरण झाले असून ग्रामपंचायतीची स्वत:ची वेबसाईटदेखील आहे. ग्रामपंचायतीची करवसुली 100 टक्के होत असल्याने ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम झाली आहे. विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करायची असेल तर लोकांचा सहभाग उत्तम असणे आवश्यक असते हे लक्षात घेऊन जनजागृती मेळावे, अभियान राबविण्यात आले. त्याचे चांगले फलित दिसून आले आणि गावविकासाच्या कामात लोक हिरीरिने सहभागी झाले.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत तीन वर्षात पुर्ण करावयाचे निकष ग्रामपंचायतीने पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याने ग्रामपंचायतीचा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते "पर्यावरण विकासरत्न" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गावात 27 सौरपथदिवे आहेत. मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून दारिद्र्य रेषेखालील 50 कुटुंबांच्या घरात सौरदिवे बसविण्यात आले आहेत. गावातील सर्व कचरा एकत्र करून 58 नॅडेप कंपोस्ट खताचे प्रकल्प तयार करण्यात आले. यात गावातील सर्व कचरा साठविण्यात आला. त्यावर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला असून यातूनही ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. महिला बचतगटातील सदस्यांनी एकत्र येऊन गावात दुग्धव्यवसाय तसेच मिनी दालमिल सुरु केली आहे. प्लॅस्टिकबंदी, कुऱ्हाडबंदीबरोबर गावानं चराईबंदी, गुटखा बंदी सारख्या सार्वजनिक हिताच्या उपक्रमात देखील यशस्वी सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून गावात 20 लाख रुपये खर्चाचं सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे गावात संत रामभाऊ बाबा सार्वजनिक वाचनालय आहे. सरपंच जयाजी किसनराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक रविंद्र अंबदासराव कोल्हे यांनी ग्रामविकासाची ही दिंडी यशस्वीरित्या पुढे नेत असून त्यात गावकऱ्यांचा खुप चांगला सहभाग आहे.

गावाला मिळालेले पुरस्कार
• संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिनात विभागस्तरीय प्रथम पुरस्कार
• राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार
• महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानात जिल्हास्तरीय दुसरा पुरस्कार
• फुले-शाहू- आंबेडकर स्वच्छ दलितवस्ती अभियानात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
• यशवंत पंचायतराज अभियानात दोन वेळेस विभागस्तरीय पुरस्कार
• निर्मल ग्राम पुरस्कार
• स्वच्छ शाळा- साने गुरुजी पुरस्कार
• स्वच्छ अंगणवाडी- सावित्रीबाई फुले पुरस्कार
• पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी विभागस्तरीय वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार
• भारत सरकारच्या पंचायतराज उत्तरदायित्व आणि प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुरस्कार
• आदर्श गौरव ग्रामसभा पुरस्कारामध्ये विभागस्तरीय दुसरा पुरस्कार
• पर्यावरण विकासरत्न पुरस्कार

डॉ. सुरेखा  म. मुळे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India