पाणी आले रानीवनी.. माळ हिरवा झाला..!

 राज्यातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्यासाठी राज्य शासनाने सिमेंटचे पक्के दगडी नाला बांध बांधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम अवर्षणप्रवण व दुष्काळग्रस्त भागात हाती घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यात 474 गावात 1423 सिमेंट नाला बांध बांधण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्याची निवड त्यासाठी करण्यात आली होती. भूम तालुक्यात बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधचा एक जून 2013 रोजी लोकार्पण सोहळा पार पडला. नुकत्याच झालेल्या पावसाने यातील काही सिमेंट नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. त्याचीच ही यशकथा..

आपल्या राज्याच्या काही भागात सन 2011 आणि 2012 या वर्षात खूपच कमी पाऊस पडला. विशेषता उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा सारखे तालुके अक्षरश कोरडेच राहिले. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाकांक्षी असा सिमेंट नाला बंधारे बांधण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. सन 2011 मध्ये भूगर्भाची पाणी पातळी 2 मीटर पेक्षा खाली गेलेल्या 15 तालुक्यात साखळी सिमेंट नाला बांध बांधण्याच्या या कार्यक्रमासाठी शासनाने 150 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला. 

ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तेथे सिमेंट नाला बंधाऱ्यांमार्फत त्वरित पाणीसाठा करणे हा महत्वाचा हेतू त्यातून साध्य होत आहे. कधीकाळी ओसाड असणारा रानोमाळ आता या सिमेंट नाला बंधाऱ्यांतील पाणीसाठ्यामुळे हिरवागार होताना दिसतो आहे. या बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे आसपासच्या विहीरी, साठवण तलाव जणू रिचार्ज झाले आहेत. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत झाल्याचे चित्र दिसत आहे. बंधाऱ्यांच्या परिसरात हसू फुलविण्याचे काम या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामामुळे झाल्याचे दिसत आहे. 

हा सातत्यपूर्ण चालणारा कार्यक्रम नाही हे जरी खरे असले तरी ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात आहे, तेथे त्वरीत पाण्याचा साठा निर्माण होण्यास मदत होतो. विदर्भासारख्या भागात नाबार्डच्या सहकार्याने 9 हजार 144 सिमेंट नाला बांध बांधण्यात आले. त्याचे चांगले परिणाम त्या भागात दिसून येत आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने अवर्षणप्रवण क्षेत्रात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचे ठरविले.

सिमेंट नाला बंधाऱ्याचे फायदेही अनेक आहेत. एका बंधाऱ्यामुळे 4 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. एका वेळी 10 हजार घन मीटर पाणी साठा होतो. तसेच पावसाळ्यामध्ये 3 वेळा पाणी भरते. सर्वात महत्वाचे म्हणजे सिमेंट नाला बंधाऱ्याजवळील उद्भव आवर्धीत होऊन त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना आणि परिसराला होतो. यावर्षी राज्यात 1423 सिमेंट नाला बंधारे पूर्ण झाले आहेत. आपल्या भूम तालुक्यात 55 सिमेंट नाला बंधारे पूर्ण झाले आहे. यातील देवांग्रा, दरेवाडी, पखरुड येथील सिमेंट नाला बंधाऱ्यात आता पाणी साठले आहे. काही बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत तर काही 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहेत. या वर्षीच्याच पावसाळ्यात त्यामध्ये पाणी अडल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत.. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 21 गावांची निवड गाव निवड समितीमार्फत करण्यात आली. तेथे 59 सिमेंट नाला बांध प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी 55 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. राज्यात वेगवेगळ्या यंत्रणांनी ही कामे केली. पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर येथील काही कामे कृषी विभागामार्फत करण्यात आली तर उस्मानाबादसह सोलापूर तसेच सांगली व अहमदनगरमधील काही सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत करण्यात आली आहेत. या विभागाचे उस्मानाबादचे कार्यकारी अभियंता श्री. कारीमुंगी यांनी स्वता या कामांवर नियमित पाहणी करुन त्याचा दर्जा चांगला राहिल याची काळजी घेतली. त्यांच्या कार्यालयातील सर्वच अभियंते आणि कामाशी निगडीत कर्मचाऱ्यांनीही वेळेत काम होईल यासाठी प्रयत्न केले. त्याचे दृश्य परिणाम आज भूम तालुक्यातील काही गावात दिसत आहेत.

अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ही कामे व्हावीत याचा वरिष्ठ पातळीवरुनही आग्रह होता. त्यासाठी नाल्यावर पुरेशा अंतरावर साखळी पद्धतीने बांधकाम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. ही कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी व्हायब्रेटर व मिक्सर वापर करण्याच्या आणि 21 दिवस क्युरिंग करताना गोणपाटाचा वापर करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. त्याचप्रमाणे कामे होतील याची दक्षताही घेण्यात आली. त्यातूनच अतिशय महत्वाकांक्षी असा हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्याने यावर्षी प्रचंड पाणीटंचाईचा सामना केला. मात्र, अशा प्रकारच्या उपाययोजनांमधून व कार्यक्रमांमधून या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. आगामी काळात पाणीसंकटाचा सामना करावा लागू नये म्हणून अशा प्रकारच्या सिमेंट नाला बंधाऱ्यांची उपयुक्तता भूम तालुक्यात सिद्ध होत आहे. पावसाळ्यानंतरचे हे हिरवे सुखद वातावरण आणि या उघड्या बोडक्या रानीवनी होणारा पाण्याचा खळखळाट या भागातील शेतकऱ्यांना अधिक समाधानी करीत आहे.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India