श्री शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना


सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार 2008 मध्ये सुरु करण्यात आला.  आता या पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार असे करण्यात आले आहे. 

वनेत्तर जमिनीवर वृक्ष संवर्धनास अधिक व्यापक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराच्या रकमेत प्रशासनाने भरीव वाढ केली आहे. पुरस्काराच्या रकमेत वाढ केल्याने वृक्षरोपण व संवर्धन करणा-या व्यक्ती-संस्था यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
महसूल स्तरावर व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये, व्दितीय पुरस्कार 30 हजार रुपये.  राज्यस्तरावर संवर्गनिहाय व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये, व्दितीय पुरस्कार 75 हजार व तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. यापूर्वी 50 हजार, 40 हजार, 30 हजार, 25 हजार व 15 हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात येत होते. 
सर्व महसूल विभाग स्तरावरुन प्राप्त झालेल्या प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यांमधून (महसूल विभाग स्तरावरील 60 पुरस्कार प्राप्तकर्त्यांमधून) सदर 15  राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येईल.  सदर राज्यस्तरावर निवड झालेली व्यक्ती-संस्था यांना महसूल विभाग स्तरावरील देय ठरणारी पुरस्काराची रक्कम व राज्यस्तरावरील प्रदान करण्यात येणा-या पुरस्काराची रक्कम यापैकी अधिकची रक्कम प्रदान करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार प्राप्त व्यक्ती-संस्था यांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम ही राज्यस्तरावरील पुरस्काराच्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही.
सदर पुरस्काराची रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरुपात देण्यात येईल.   याबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात खाजगी संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराच्या धर्तीवर रु.10 हजाराच्या मर्यादेत तीन खाजगी संस्थांना मानचिन्ह देण्याबाबत निर्णय होता.  या निर्णयात सुधारणा करण्यात आली असून मानचिन्हासोबत पुरस्काराची रक्कम प्रत्येकी रुपये 25 हजार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राष्ट्रीय वननिधी नुसार राज्यातील 33 टक्के क्षेत्र वनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच 20 कलमी कार्यक्रमातंर्गत व अन्य वृक्ष लागवडीच्या पुरक योजना मार्फत जास्तीत जास्त पडिक जमीनीवर वृक्षरोपण वाढविण्यासाठी व पर्यावरण संतुलनासाठी काम करणा-या व्यक्ती-संस्था यांना प्रोत्साहन देणे व जनजागृती निर्माण करणे यासाठी पुरस्काराच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. या वाढीची वृक्षमित्रांनी स्वागत केले आहे.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India