सजीवपणाशी साधर्म्य साधणारे मेणाचे पुतळे : सुनिल्स वॅक्स म्युझियम, लोणावळा

लंडनला मादाम तुसाँचे मेणापासून बनविलेल्या पुतळ्यांचे म्युझियम आहे व जगभरातून त्याला भेट देण्यासाठी प्रेक्षकांचा ओघ असतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन व अन्य काही भाग्यवान प्रज्ञावंत भारतीयांना या म्युझियममध्ये आपले मेणाचे पुतळे बनविले जाण्याचा बहुमान लाभला आहे. पण प्रत्येकाला हे पुतळे पाहण्यासाठी लंडनला जाणे शक्य नसते. आता भारतातच नव्हे, महाराष्ट्रात अगदी आपल्या पुणे जिह्यातच आता असे म्युझियम उभे राहिले आहे.

मुंबईपासून अंदाजे 100 किलोमीटर व पुण्यापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर सुनिल्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम उभारण्यात आले आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाताना लोणावळा शहरापुढील एक्सप्रेस हायवे नजिक येणाऱ्‍या वरसोली गावाजवळील टोल नाक्यापूर्वी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर हे म्युझियम लागते. एप्रिल 2010 पासून हे म्युझियम प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. जेम्स बाँड, मायकेल जॅक्सन, मदर तेरेसा, बेनझीर भुत्तो, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू अशा अनेक विक्रमी नामवंतासह अण्णा हजारे, महम्मद रफी, कपिल देव, प्रभु देवा, अमरीश पुरी, ए. आर. रेहमान, शरद पवार, छगन भुजबळ, श्री श्री रविशंकर, राजीव गांधी यांच्या प्रमाणेच इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेणाचे पुतळे येथे बनवून प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले आहेत. मुळचे केरळ राज्यातील अलेप्पी गावचे असणाऱ्‍या सुनिल कन्डाल्लूर यांनी आपल्या हातांनी या मेणाच्या पुतळ्यांना साकारले आहे. 1992-93 च्या सुमारास त्यांनी केरळमधील खासगी संस्थेतून फाईन आर्ट मधील पदविका संपादन केली. 1998 साली सुनिल यांना सर्वप्रथम श्रीकृष्णाचा मेणाचा पुतळा बनवून आपल्यातील कलाकाराचा परिचय दिला. हा पुतळा अनेकांना आवडल्यानंतर त्यांना आपले ध्येय सापडले व मग झपाटून जात एका मागोमाग एक त्यांनी मेणाच्या पुतळ्यांना आकार दिला. यासाठी प्रामुख्याने पॅराफिन वॅक्स या प्रकाराचे मेण लागते अशी माहिती त्यांनी दिली. त्याच्या सोबतीला मग फायबर, प्लास्टर ऑफ पॅरिस, अन्य रसायनांचाही वापर करण्यात येतो. एक पुतळा साकारण्यासाठी साधारणपणे एक महिनाभराचा अवधी लागतो असे त्यांनी नमूद केले. या पुतळ्यांना कपडे, केस, टोपी, छडी, शाल, खुर्ची, फुले, पदके आदि साधनांची जोड देऊन इतके हुबेहुब बनविण्यात आले आहे की पाहणारे थक्क होतात. या पुतळ्यांसोबत स्वतःची छायाचित्रे घेण्यासाठी हौशी प्रेक्षकांत चढाओढ लागत असल्याचे पहायला मिळते.

सुनिल वॅक्स म्युझियममध्ये सद्यस्थितीत एकूण 7000 चौरस फूट असणाऱ्‍या जागेत मेणाचे असे 50 पुतळे ठेवण्यात आले आहेत. प्रारंभी या म्युझियमसाठी प्रति माणशी 100/- रुपये शुल्क आकारण्यात येत असे. आता ते प्रति माणशी 150/- रुपये करण्यात आले आहे. प्रेक्षकांमधील कुणी पुतळ्यांना हात लावून धोका पोहचवू नये यासाठी रक्षक ठेवून काळजी घेण्यात येते. हे म्युझियम संपुर्णतः वातानुकुलित आहे. म्युझियमजवळच अल्पोपहार, पार्किंग, प्रसाधन यांची व्यवस्था उपलब्ध आहे. लवकरच असे म्युझियम मुंबईकरांना जवळच पाहता यावे यासाठी सुनिल कण्डाल्लूर यांचे प्रयत्न सुरु असून दक्षिण मुंबईत तशा प्रकारच्या जागेसाठी त्यांची शोधाशोध सुरु आहे. या मेणाच्या पुतळ्यांच्या डोळ्यांमधील जीवंतपणा चेहऱ्‍यावरील भाव, हातांवरील सुरकुत्या व पेहरावातील नेमकेपणा त्या त्या व्यक्तिमत्वांच्या इतका जवळ जाणारा आहे की आपण प्रत्यक्षच जणू त्यांना भेटतो आहेत असे वाटावे असे अनोखे कसब सुनिल कण्डाल्लूर यांना साधले आहे.

- राजेंद्र घरत,
संपादक, दीपवार्ता,
भ्रमणध्वनी : 7208046564
ई-मेल : deepvarta@gmail.com

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India