'पक्ष्यांचे लक्ष थवे…गगनाला पंख नवे… ही' ना.धो. महानोरांना आलेली अनुभूती पुणे जिल्ह्यातील मुढाळे (ता.बारामती) गावात प्रत्यक्ष अनुभवयास येत आहे. दररोज सायंकाळी दूरदूरहून एकत्र आलेल्या काही लाख भोरड्या अर्धा ते पाऊण तास नयनमनोहरी नृत्याचा नजराणा अकाशात पेश करतात आणि पावणेसातच्या दरम्यान काही क्षणात आजूबाजूच्या शेतांमध्ये गुडूप होतात. पक्षीप्रेमी हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी मुढाळे गावच्या माळरानाकडे धाव घेऊ लागले आहेत.
दख्खनच्या पठारावर सर्वत्र आढळणारी भोरडी (पळस मैना किंवा साळभोरडी) मुढाळे परिसराची शान बनली आहे. हा पक्षी दिसायला मैनेसारखा पण मैनेपेक्षा छोटा आहे. हे पक्षी अफगानिस्तान, पाकिस्तान या देशातून स्थलांतरित होऊन हिवाळी थंडीची मजा घेण्यासाठी मुढाळ्यात गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. रोज सकाळी यांचे थवे वेगवेगळ्या दिशांनी 30 किलोमीटर लांबपर्यंत अन्नाच्या व किटकांच्या शोधात जातात. दुपारी दाट सावलीत किंवा खुरट्या झुडपात राहतात. सायंकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान मुढाळे येथील अधिवासाकडे थव्याथव्यांनी परततात. सुरुवातीला पाच-पन्नास भोरड्यांचे थवे येतात आणि प्रचंड मोठ्या आकाराचे एकत्रित थवे तयार होतात. हे थवे मग एकत्र येतात, विभक्त होतात आणि पुन्हा एकत्र येतात. वेगवेगळे आकार घेत गिरक्या घेतात. त्यांचा चिवचिवाट आणि नृत्य पाहून साळुंक्या, कावळे यांना धडकी भरलेली दिसते आणि ते आपापल्या अधिवासावर गुपचूप बसलेले दिसतात. वेगवेगळे नृत्याविष्कार झाल्यानंतर पावणेसातच्या दरम्यान अचानक शेवटच्या काही मिनिटात सर्वच्या सर्व भोरड्या ऊस, ज्वारी यामध्ये किंवा या पिकाशेजारी गेल्यावर पुन्हा अर्धा-पाऊण तास त्यांची कुजबुज ऐकू येते. मग सकाळपर्यंत सर्व रान शांत होऊन जाते या गोष्टींचे आसपासच्या शेतकऱ्यांना कौतुक वाटत आहे.
येथील श्यामराव मुळीक हे ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, "यंदा मायंदाळं पक्षी आल्यात. मागच्या साली दुष्काळामुळे नव्हतं आलं." त्यांचा डाव बघण्यासारख असतो. तर विठ्ठल मुळीक म्हणाले, थंडीत येत्यात अन् उन्हाळ्याच्या आधी पक्षी निघून जात्यात.
मुढाळे गावातील सोमेश्वर हायस्कूलपासून पश्चिमेला कच्च्या रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी पक्षी व पर्यावरणप्रेमी लोक भेट देऊन पक्ष्यांचा नयनरम्य सोहळा अनुभवत आहेत. नुकतेच मराठी व तामीळ चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, नऱ्हेचे सरपंच राजाभाऊ वाडेकर, पुण्याचे नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी हा सोहळा पाहून अद्भूत, अप्रतिम म्हणत हे वैभव जपले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केली.
पक्षी तज्ज्ञ डॉ.महेश गायवाड म्हणाले, मुढाळे व लोणी-भापकर परिसरात जलसंधारणामुळे पाणीसाठा वाढल्याने आणि ज्वारची पेरणी चांगली झाल्याने भोरड्यांची संख्या वाढली आहे. ती धान्याच्या पिकांना थोडाफार त्रास देत असली तरी शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑक्टोबरमध्ये हे पक्षी येथे वास्तव्यास येतात. याच कालावधीत कीटकांचे मिलन होऊन मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. भोरड्याच यांच्या वाढीला आळा घालतात आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळतात. एक अळी चोवीस तासात तिच्या वजनाच्या दोनशे पट पीक खाते. शंभर अंड्यांचे अनेक कोष उत्प्न्न करते. त्यातून निर्माण होणारे लाखो कीटक खाण्यासाठी भोरड्यांची आवश्यकता आहे. त्या पानांतून, गवतातून, ज्वारी-बाजरीच्या पिकातून कीटक शोधून फस्त करतात. त्या बाहेरून येत असल्याने इतर पक्ष्यांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी कसरती करतात.
मुढाळ्याला कसे जावे -
पुणे येथून स्वारगेट वरुन बारामती साधारण 110 किलोमीटर आहे. बारामतीमधून वडगाव व तेथून उजव्या बाजूला अवघ्या 6 किलोमीटरवर मुढाळे आहे. अथवा पुण्याहून अष्टविनायकमधील मयुरेश्वराचे मोरगाव 80 किलोमीटर आहे. तेथून पळशी व मुढाळे असा प्रवास करता येतो.
कुठे रहावे -
भोरड्या हे पक्षी सायंकाळी एकत्रित नृत्याविष्कार सादर करत असल्यामुळे दुपारी पुण्याहून निघून पुन्हा पुण्याला मुक्कामाला जाता येते अथवा मोरगाव तसेच बारामती येथेही तुलनेने स्वस्त राहण्याची सोय होवू शकते.
- संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर, बारामती
संपर्क - 9011087479
भोरड्यांचा मुढाळ्यात नृत्याविष्कार !
Posted by
rajeshkhadke
on Wednesday 27 January 2016
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment