पर्यटकांना भावणारे पांचगणी

महाबळेश्वरच्या पूर्वेला २० कि.मी. अंतरावर पांचगणी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाबळेश्वरप्रमाणेच पांचगणी देखील सह्याद्री पर्वतरांगांच्या माथ्यावर असलेल्या सपाट मैदानावर वसले आहे. अल्हाददायक वातावरण व आरोग्यवर्धक हवामानामुळे पांचगणीला गिरीस्थानाचा दर्जा मिळाला आहे.

हिरवीगार वनसंपदा पांचगणीच्या सौंदर्यात भर घालते. येथील फळबागांमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लॅक बेरी, रासबेरी या विदेशी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. रानावनात डोलणारी रानगुलाबांची फुले आपले लक्ष वेधून घेतात. पांचगणी डोंगरावरुन उत्तर दिशेला कृष्णा नदीचे खोरे व धोम धरण, कृष्णासागर जलाशय, कौलारु घरांची खेडी त्याच्याभोवतालची हिरवीगार शेती, आजुबाजुचे डोंगर व गड यांचे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते. येथील आरोग्यदायी हवामानामुळे येथे इंग्रजी माध्यमाची २० ते २५ निवासी विद्यालये आहेत. पर्यटकांसाठी उपहारगृहे, भोजनालये व निवासालये हा इथला प्रमुख उद्योग. येथे लहान-मोठी अशी सर्व मिळून ४५ हॉटेल्स व लॉजेस आहेत. त्याचबरोबर चर्मोद्योग, फळांचे मुरंबे बनविणे, मध संकलन, दूध उत्पादन, दुधाची उत्पादने बनविणे हे उद्योगही चालतात. मनोरंजनासाठी येथे उद्याने, क्लब व वाचनालय आहे. काही बँका व पतसंस्था आहेत. येथील निसर्गसुंदर परिसरात सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असते.

पांचगणीचा इतिहास : महाबळेश्वर तालुक्यातील पांचगणी या गावाचा इतिहास अगदी अलिकडचा म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचा आहे. पांचगणी गावाचा काही प्रमाणात विकास झाला असून, त्याला खेडे म्हणता येणार नाही. परंतू ते मोठे शहरही नाही. पांचगणीच्या आजूबाजूला दांडेघर, गोडवळी, आमराळ, राजपूरी, भिलार अशी खेडेगावे आहेत ती पांचगणी पेक्षाही जुन्या काळापासून आहेत.

राजपुरीच्या गुहा, गोडवळीचे शिवमंदिर, दांडेघरचे केदारेश्वरचे मंदिर यावरुन या ठिकाणी मध्यकाळी किंवा त्यापूर्वीपासूनही वस्ती असावी असे वाटते. पांचगणी हे १८५० पासून वसण्यास सुरुवात झाली. येथे असलेल्या अल्हाददायक वातावरण व थंड हवेमुळे येथे वस्ती वाढत गेली. जॉन चेसन या निवृत्त ब्रिटीश अधिकाऱ्यास पांचगणीचे संस्थापक मानतात. १८५२ मध्ये त्यांनी आपले निवासस्थान बांधून शेतीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू प्रचार व प्रसारामुळे ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली.

पांचगणीतील प्रेक्षणीय स्थळे : टेबल लँड-पांचगणी गाव ज्या डोंगराच्या कुशीत लपले आहे. तो डोंगर म्हणजे टेबल लँड डोंगर होय. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या माथ्यावर चार कि.मी.चे सपाट मैदान आहे.

सिडनी पॉईंट : पांचगणीच्या पूर्वेकडच्या जकातनाक्यावरुन उत्तर दिशेला थोड्या अंतरावर एक टेकडी आहे. त्या टेकडीचा गोलगोल वर जाणारा रस्ता चढल्यावर माथ्यावर एक स्तंभ दिसतो. हाच तो सिडनी पॉईंट होय.

डोसी पॉईंट : येथील चेसनरोडवर फायर टेंपल आहे. त्याच्या समोरच्या बाजूला डोसी पॉईंट आहे.

मेहेर बाबाची गुहा : काच बावडीच्या पश्चिमेस जवळच मेहेर बाबाची गुहा आहे. येथे संत मेहेरबाबा राहत असत.

बेबी पॉईंट : पांचगणीहून महाबळेश्वरकडे जाताना गांवापासून फक्त १५० मी. अंतरावर बेबी पॉईंट आहे.

पारशी पाईंट : काच बावडीच्या पश्चिमेला ४०० कि.मी अंतरावर पारशी पॉईंट आहे. महाबळेश्वर रस्त्यालगत असलेला हा पॉईंट पाचगणीपासून २ कि.मी. अंतरावर आहे.

भिलारच्या फळबागा : पांचगणीपासून ६ कि.मी. अंतरावर भिलार हे खेडेगांव असून येथील गुलाबाच्या बागा, स्ट्रॉबेरी, रासबेरीचे मळे पाहण्यासारखे आहेत. याशिवाय केदारेश्वर मंदिर, कार्तिक स्वामींची गुहा, मालाज् फूड, प्रोडक्टस् आदि प्रेक्षणीय स्थळांमुळे पांचगणी पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

साबळे फार्म : पांचगणीच्या पायथ्याशी धोम धरणाच्या काठाशी कौटुंबिक सहलिचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून हॉटेल शिवहेम (साबळे फार्म) ला अवश्य भेट द्यावी. येथे राहण्याची उत्तम सोय असून घरगुती पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवन मिळते. साबळे फार्म सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांनी निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी बांधला आहे.

महेंद्र देशपांडे, नाशिक, मो.9422772020-21

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India