तारापोरवाला मत्स्यालय

मुंबईमध्ये पर्यटन स्थळांची कमतरता नाही. परंतु काही ठिकाणं लहान मुलांच्या आवडीची तर काही मोठ्यांच्या. त्यामुळे मुंबईच्या रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही काय काय पहावे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु या यादीत सर्वांना आवडणारं एक ठिकाण कायम स्थान मिळवून आहे ते म्हणजे मरीन ड्राईव्हवरचं तारापोरवाला मत्स्यालय.

अरबी समुद्राची गाज आणि खारे वारे अंगावर घेत गेली अनेक दशके पर्यटकांच्या सेवेत असलेल्या या मत्स्यालयाचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते २७ मे १९५१ रोजी झाले. तेव्हा या मत्स्यालयाच्या बांधकामासाठी एकूण ८ लाख ९० हजार रूपये खर्च आला होता, ज्यापैकी श्री. व श्रीमती विकाजी डी.बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी जोडप्याने दोन लाख रूपये देणगी दिली होती. या मत्स्यालयाची देखभाल दुरूस्ती महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येते.

१९५१ मध्ये जेव्हा हे मत्स्यालय पर्यटकांना खुले करण्यात आले तेव्हा भारतातील हे एकमेव सार्वजनिक मत्स्यालय होते. या ठिकाणी प्रेक्षकांना एकाचवेळी समुद्रातील, गोड्या पाण्यातील तसेच उष्णकटीबंधातील लहान शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्याने हे देशातील एक प्रेक्षणीय स्थळ ठरले आहे. दरवर्षी चार ते पाच लाख पर्यटक भेट देणाऱ्या या मत्स्यालयाला आजपर्यंत देशविदेशातील महनीय व प्रसिद्ध व्यक्तींनीही भेट दिली आहे.

सदर मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४,०९६ चौ.मी. असून मत्स्यालयाच्या इमारतीचे क्षेत्रफळ १,०९८ आणि खुले क्षेत्र २,९९८ चौ.मी. आहे. मत्स्यालयामध्ये नुतनीकरणाआधी प्रदर्शनार्थ १६ सागरी, ९ गोड्या पाण्याच्या मोठ्या टाक्या आणि ३२ उष्णकटीबंधीय लहान टाक्या होत्या. या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे सागरी आणि गोड्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले होते.

सहा दशके जुने असलेल्या मुंबईतील या महत्त्वाच्या पर्यटनस्थळामध्ये सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज होती. त्यानुसार ते अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहेत. नुतनीकरणासाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर मागील वर्षी ३ मार्च २०१५ रोजी हे मत्स्यालय पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. आता पर्यटकांना स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ, विलोभनीय, शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये पूर्वी स्थानिकरित्या मिळणारे ३० ते ५० प्रकारचे विविध मासे व जलजीव पहावयास मिळत. त्यासाठी मुंबईतील कुलाबा लाईट हाऊस, गिरगाव चौपाटी, वरळी चौपाटी, कफ परेड या क्षेत्रातील समुद्र किनारी वाणा, फेरा पद्धतीची जाळी लावून स्थानिक कोळी बांधवांच्या सहकार्याने नियमितपणे मासे व जलजीव उपलब्ध करून घेऊन ते मत्स्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येत असत. सदर परंपरा आजही चालू आहे.

पूर्वीच्या टाक्या आता आकाराने मोठ्या करण्यात आल्या असून त्यांना फ्लेक्सी ग्लास प्रकारच्या ११० मि.मी. जाड काचा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिमेंटच्या भव्य टाक्यांमधील रंगीत आणि आकर्षक मासे व इतर जलजीव अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. प्रत्येक टाकीमध्ये खाऱ्या व गोड्या पाण्यातील आकर्षक शोभिवंत मासे व जलजीवांच्या विविध प्रजाती, नैसर्गिक वातावरणानुरूप खडक, पान वनस्पती इत्यादींसह आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केलेल्या पाहायला मिळतात. त्यांची माहिती एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केली जात असल्याने पर्यटकांना त्याबाबत सविस्तर माहितीही मिळते. नुतनीकरणानंतर संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलीत करण्यात आले असल्याने पर्यटकांना थंड आणि सुखद वातावरणात ही जलसृष्टी अनुभवता येत आहे.

नुतनीकरण करण्यात आलेल्या मत्‍स्यालयाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे ते म्हणजे प्रवेशद्वारापाशी निर्माण करण्यात आलेले भुयारी मत्स्यालय. याखालून जाताना १८० अंशामध्ये खाऱ्या पाण्यातील मासे पाहण्याचा अनुभव घेता येतो. भुयारी मत्स्यालयातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ५० आसनव्यवस्थेच्या वातानुकूलीत प्रेक्षागृहामध्ये मत्स्यालयातील मासे, मत्स्यव्यवसाय, सागरी मासेमारी आदींबाबत वैज्ञानिक तसेच उद्बोधक माहितीपट पाहता येतात. समोरच कारंजा उभारण्यात आला असून वातावरण आल्हाददायक बनविण्यात तो मदत करतो. त्यापुढे मुख्य प्रदर्शनी हॉल आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये स्थानिकरित्या मिळणाऱ्या लेपटी, किळीस, पाकट, हेकरू, तांब, खडकपालू, शेवंड, समुद्रसाप, जेलीफिश यांच्याबरोबरच आता भारतातील तसेच परदेशातून आयात केलेले अतिशय दुर्मिळ डॅम्सेल, बटर फ्लाय, एंजल, ट्रिगर, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मूरीश, सी ॲनीमोन इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हॉलच्या मधील भागात ठेवण्यात आलेल्या गोड्या पाण्याच्या विभागामध्ये देखील देश विदेशातील अरोवाना, बेडूक, सिक्विड, पिरान्हा, कॅट फिश, रोहू, कटला, मृगळ इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे व जलजीव पाहायला मिळतात. तर, छोट्या प्रदर्शनी विभागात लहान टाक्यांमध्ये गोल्ड फिश, एंजल, गोरामी, बार्ब, शार्क, फ्लॉवर हॉर्न, सिक्लिड, पॅरट, ट्रेटा, गप्पी, कोळंबी, डिस्कस इत्यादी प्रजातींचे आकर्षक मासे पाहता येतात.

सदर मत्स्यालयासाठी मोठ्या व्यक्तींना ६० रूपये तर १२ वर्षाखालील मुलांना ३० रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तर, शैक्षणिक संस्था, दिव्यांग व्यक्ती, सैनिक व प्रशासकीय सेवेतील निवृत्त कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना सवलतीचे दर ठेवण्यात आले आहेत. मत्स्यालयाच्या आतले छायाचित्रण करण्याची इच्छा असलेल्यांसाठी त्यासाठीचे शुल्क भरून छायाचित्रण करू देण्याची सोयही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंगळवार ते रविवार सुरू असणाऱ्या या मत्स्यालयाच्या प्रदर्शनाची वेळ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ आणि इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशी आहे. सोमवारी ते देखभाल, दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येते. पश्चिम रेल्वेवरच्या मरीन लाईन्स किंवा चर्नी रोड स्टेशनवर उतरून येथे जाता येतं अथवा मरीन ड्राइव्ह वरून जाणाऱ्या रस्ते वाहतुकीचाही पर्याय आहेच.

सध्या विद्यार्थ्यांना सुट्टया आहेत. त्यामुळे मुंबई दर्शन करताना मरीन ड्राईव्ह वरील तारापोरवाला मत्स्यालयाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मग आपण कधी नियोजन करताय मत्स्यालयाला जायचं....

-ब्रिजकिशोर झंवर
सहायक संचालक (महान्यूज)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India