मुंबईतील पुतळे : हलवलेले आणि हरवलेले.. (भाग २)

  • पुतळा 'हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया'चा

काळा घोड्यानंतर मूळ जागेवरून हलवलेल्या 'क्विन व्हिक्टोरीया'च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही..

'काळा घोडा' चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो.. हुतात्मा चौकात चर्चगेट स्टेशनच्या दिशेने समोरच 'सीटीओ'ची म्हणजे आपल्या 'तार ऑफीस'ची इमारत आहे. (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या इमारतीत सुरू झालं. कालांतराने १९१०-११ सालात ते सीएसटी शेजारच्या सध्याच्या भव्य इमारतीत नेण्यात आलं). 'तारायंत्र' बंद झालं असलं तरी इमारतीचं ‘सीटीओ’ नांव अद्याप कायम आहे. या इमारतीच्या मागे स्वराज्यात बांधलेली ‘एमटीएनएल’ची इमारत व या इमारतीच्या मागे असलेली 'टाटा टेलीकम्युनिकेशन्स'ची भव्य इमारत व त्यावरचा उंचं टॉवर आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे.. ‘टाटा टेली.’ म्हणजेच पूर्वाश्रमीचं 'व्हिएसएनएल'चं ऑफीस..

तर, हे टाटा टेलिकम्युनिकेशन्सचं ऑफीस ज्या जागी आहे, बरोबर त्याच जागी इंग्लंडची तत्त्कालीन महाराणी 'हर हायनेस व्हिक्टोरीया' हिचा शुभ्र संगमरवरात घडवलेला सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा होता.. मखराची उंची ४०-४२ फूट होती तर सिंहांसनासहीत पुतळ्याची उंची १५-१६ फूट एवढी होती. सबंध मुंबईत त्याकाळी येवढा सुंदर पुतळा दुसरा नव्हता असा उल्लेख श्री.शिंगणे यांच्या पुस्तकात सापडतो (पुतळ्याचा त्याच जागचा जुना फोटो वर दिला आहे)..

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे पुतळे दृष्टीआड करण्याची जी टूम निघाली, त्यात इतर पुतळ्यांप्रमाणे हा पुतळादेखील मूळ जागेवरून हलवून त्याची रवानगी भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये करण्यात आली..

मी नुकताच हा पुतळा पाहून आलो.. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या 'इस्ट लॉन'वर झाडांच्याखाली अगदी उघड्यावर ब्रिटीशांचे सात-आठ पुतळे हारीने मांडून ठेवलेयत, त्यात मध्यभागी हा पुतळा आहे.. गेली अनेक वर्ष ऊन-वारा-पाऊस व पक्ष्यांच्या शिटा झेलून महाराणीच्या चेहेऱ्याची साफ विटंबना झालेली आहे.. तिचं नाक साफ झडलं असून हातातला राजदंड तुटलाआहे.. पुरेश्या काळजी अभावी मुळच्या पांढऱ्याशुभ्र असलेल्या या देखण्या शिल्पावर काळपट पुटं चढलीत. असं असुनही पुतळ्याचं मूळ सौंदर्य जराही उणं झालेलं नाही.. सिंहासनावरील कलाकुसर आणि राजचिन्हं, आता उठून उभी राहील असा भास निर्माण करणारी तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ कराव्या असं वाटायला लावणाऱ्या, तीनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या, केवळ लाजबाब..! सोबत पुतळ्याचे काल-परवाच काढलेले फोटो आहेत. पण नुसते फोटो बघण्यापेक्षा थोडीशी सवड काढून राणीच्या बागेत जावून ही अप्रतीम कलाकृती रूबरू बघून याच असं मी सांगेन..

या पुतळ्याचा इतिहास पाहता महाराणी व्हिक्टोरीयाच्या हा पुतळा कदाचित 'जन्मल्या'पासूनच एका जागेवर न राहाण्याचं नशीब घेऊन आला होता की काय कुणास ठाऊक..!

सन १८५८ मध्ये राणीने हिन्दुस्थानचा कारभार ईस्ट इंडीया कंपनीकडून आपल्या हातात घेतला, या घटनेच्या स्मरणार्थ राणी व तिचा नवरा प्रिन्स अल्बर्ट यांच्या नांवाने भायखळा येथे एक बाग व म्युझियम 'व्हिक्टोरीया गार्डन अॅण्ड अल्बर्ट म्युझियम' स्थापन करण्याचे तत्कालीन मुंबईकरांनी ठरवलं. (याचंच पुढे राणीचा बाग व स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात ‘जिजामाता उद्यान’ असं नामकरण झालं) या कार्याचे पुढारी होते आपले जगन्नाथ नाना शंकरशेट, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि काही बडे ब्रिटीश अधिकारी..

मुळात या बागेत राणीचाच पुतळा बसवायचा होता, परंतु तसे केल्यास तिच्या नवऱ्याला काय वाटेल या ‘हिंदुस्थानी’ विचाराने ‘प्रिन्स अल्बर्ट’चा पुतळाही तिथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. राणीच्या सन्मानार्थ हा पुतळा बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडेराव गायकवाड यांनी रोख ८० हजार रूपये खर्चून प्रख्यात इंग्लिश शिल्पकार एन. नोबेल यांच्याकडून घडवून घेतला होता.. परंतू पुतळ्याचं रुपडं पाहताच गायकवाड सरकार राणीच्या बागेत पुतळा स्थापन करायला तयार होईनात व त्या ऐवजी मुंबई शहरातील कोटाच्या (फोर्ट) बाहेर प्राईम जागी हा पुतळा बसवावा असा हट्ट ते धरून बसले.. अखेर खंडेराव गायकवाडांच्या हट्टापाई शेवटी 'राणी'ची प्रतिष्ठापना वर उल्लेख केलेल्या जागी करण्यात आली व सन १९४७ नंतर पुन्हा 'राणी'ला भायखळ्याच्या तिच्या सुरूवातीस मुक्रर केलेल्या जागी आणून 'टाकलं' गेलं. राणीचा हा सुंदर पुतळा अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बेवारश्यासारखा अजून तिथेच बसून आहे.. तर अल्बर्ट महाराजांचा काहीच पत्ता लागत नाहीय..

जाता जाता -

पुतळ्याची सुरुवातीची जागा राणीची बाग काय किंवा नंतरची 'टाटा टेलिकम्युनिकेशन्स'ची जागा काय, राणीच्या सिंहांसनाधिष्ठीत मूळ पुतळ्यात मखराची कल्पना नव्हती.. संगमरवरी मखर नंतर मुद्दाम बनवलं गेलं होतं.. स्वतंत्र भारतात या पुतळ्याची रवानगी भायखळ्याच्या राणी बागेत केली गेली तरी त्या पुतळ्याइतकंच, किंबहूना कांकणभर सरसच असलेल्या त्या मखराचं काय झालं असावं हा प्रश्न मला पडला होता.. माझ्या परीनं मी शोध घेत होतो.. माझ्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांत या पुतळ्याचा व त्याच्या सध्याच्या पत्त्याचा उल्लेख सापडायचा, परंतू मखराचा उल्लेखही नसायचा..

परंतू शोधला की देवही सापडतो या उक्तीप्रमाणे अगदी परवाच, नेटवर सर्च करताना, मला मखराचा ठावठिकाणा अचानक सापडला.. विख्यात रेमंड कंपनीचे मालक श्री.सिंघानीया यांच्या मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बंगल्याच्या आवारात उघड्यावर परंतू सुरक्षित असल्याचा उल्लेख http://thefourthseat.blogspot.in/2014/01/the-mystery-of-missing-marble-canopy-of.html?m=1 या वेबसाईटवर मिळाला..आपण या वेबसाईटला जरूर भेट देऊन माहिती घ्या.. अर्थात हा पत्तोल्लेख २०१४ सालचा आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे मला अद्याप प्रत्यक्ष बघाचीय.. या आठवड्यात जमवेन बहुतेक.. कोण येतंय सोबत?

- गणेश साळुंखे
9321811091
(12.04.2016)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India