शिवडीचा किल्ला

मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपत आजही चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे. 

द कुन्हा नाम इतिहासकाराच्या मते शीवजवळील छोटी जागा अशा अर्थी त्याला शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवडी हे बेट तसे मोक्याचे ठिकाण. पूर्व बाजूला अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला शीवचे बेट. दोघांच्या मध्ये अर्थातच खाडी. उत्तरेस खाडीच्या पलीकडे साष्टी बेट असे बेटाचे भौगोलिक स्थान होते.

अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत शीव व शिवडीच्या दरम्यान अनेक मिठागरे होती व ती अगदी माहुलीच्या खाडीपर्यंत होती. शिवडीला स्थानिक मच्छिमार अर्थातच होतेच व त्यांच्याही नौका पनवेलच्या खाडीपर्यंत जाऊन अन्नधान्य, भाजीपाला व तत्सम जीवनावश्यक वस्तूंची ने आण करत होत्या.

शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले होते.

मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व व वस्तुसंग्रहालय खात्याने 2007-2008 केले. किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणाऱ्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात.

मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील ऐका खडकाळ टेकडीवर हा किल्ला आहे. बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आत आणखी एक तटबंदी किंवा भक्कम तटबंदीयुक्त वास्तुसमूह असे या किल्ल्याचे ढोबळ स्वरुप आहे. या किल्याचे सर्वात बाहेरचे अंग म्हणजे सर्वसाधारणपणे चौकोनी तलविन्यास म्हणता येईल अशाप्रकारची सीमाभिंत. ही सीमाभिंत जाड पण सरळसोड असून पूर्णपणे दगडात बांधलेली आहे. या भिंतीला तांत्रिक दृष्ट्या बाह्य तटबंदी किंवा बाह्यतम तटबंदी असेही म्हणावेसे वाटेल. या किल्‍ल्याच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्यत्तम सीमाभिंतीत असे एकूण दोन दरवाजे आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारात फक्त दरवाजांचे आकार शिल्लक आहेत. एकेकाळी त्यांना दारे असणार.

बाह्यतम तटबंदीच्या दक्षिणाभिमुख दरवाज्यातून आत गेल्यानंतर अगदी वीस-पंचवीस फुटावरच मुख्य भागाच्या अनियमित आकाराच्या तटबंदीतील दक्षिणकेडील पूर्वाभिमुख भागात एक प्रवेशद्वार आहे. या द्वाराच्या रुंदीच्या भागात काही अंतरावर दाराच्या चौकटीच्या खाचा गिलाव्यामध्ये स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे या भितीच्या रुंदीत एकेकाळी लाकडी किंवा लोखंडी चौकट व दारे असण्याची शक्यता आहे. या भिंतीची रुंदी बरीच आहे. त्यामुळे हा द्वारमार्ग छोट्या भुयारी मार्गासारखा वाटतो.

शिवडी किल्ल्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत येत असतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन मुंबईकरांसह जगभरातील पर्यटकांना येथे घेता येते.

पुरातत्त्व खात्याने नुतनीकरण केल्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला आणि लगतच्या समुद्रात दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी या दोन्ही बाबी पर्यटन स्थळ म्हणून महत्त्वाच्या ठरतात.

कसे जावे -
हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकापासून पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गाच्या खालून जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने सरळ चालत गेल्यास दहा मिनीटांच्या अंतरावर हजरत अली बाबांचा दर्गा लागतो. या दर्ग्याच्या लगतच या किल्ल्याचे द्वार आहे.

संकलन - विलास सागवेकर

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India