नागपूर जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात परंपरा व आधुनिकता यांचा उत्तम संगम असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. नागपूर येथील संत्र्यांमुळे नारंगी शहर ओळखले जाते. ताडोबा, नागझिरा, नवेगाव आणि पेंच या अभयारण्यामध्ये जाण्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

खिंडसी तलाव
हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात खिंडसी तलावाचा परिसर एखाद्या रत्नासारखा चमकून उठतो. स्थानिक लोकांसाठी तर हे एक अत्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

रामटेक

या शहराचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही येथे काळी काळ थांबले. त्यांच्या या वास्तव्यानेच या शहराचे नाव रामटेक असे पडले. येथील टेकडीवर श्रीराम व लक्ष्मणाची मंदिर आहेत. महाकवी कालिदासाचे स्मारकही येथे आहे. येथेच त्यांनी मेघदूत हे सुप्रसिद्ध संस्कृत महाकाव्य लिहिले असे मानले जाते.

तोतलाडोह धरण
नागपूर जिल्ह्यात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे.

नवेगाव बांध
नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नवेगाव बांध आहे. पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताली अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत असून या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत.

गोरेवाडा तलाव

नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा 2350 फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 1911 मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत.

सेमिनरी हिल

नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. सेंट चार्ल्स सेमिनरी आणि एस. एफ. एस. कॉलेज या टेकडीच्या वर आहे. येथील चालण्याचे मार्ग लाकडाने तयार करण्यात आल्याने सकाळी ताज्या हवेत चालणाऱ्यांना सुखद अनुभव मिळत असतो. सेमिनरी हिलच्या सर्वात वरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येऊ शकते.

फुटाळा तलाव

नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हेदेखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किना-यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.

अंबाझरी तलाव

नागपूरच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. 1958 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ 20 एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.

कस्तूरचंद पार्क 

कस्तूरचंद पार्क हे नागपुरातील सर्वात मोठे बैठकीचे ठिकाण आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हजारावर लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. शहरात जेव्हा मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात तेव्हा हे स्थळ अतिशय लोकप्रिय ठरत असते.

नगरधन किल्ला 

रामटेक तालुक्यात असलेल्या नगरधन या गावात हा किल्ला नागपूरच्या ईशान्येकडे 38 किलोमीटर आणि रामटेकच्या दक्षिणेकडे 9 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नगरधन या जुन्या शहराची स्थापना सूर्यवंशी राजांनी केली आहे. नगरधन किल्ला हा या गावाचे वैशिष्ट्य असून, भोसले राजघराण्याचे राजा रघुजी भोसले यांनी हा किल्ला बांधला असल्याचे समजले जाते . या किल्ल्याच्या आतील भागात चौकोनी आकाराचा राजमहाल आहे. काही इमारतीही आहेत. या किल्ल्याच्या वायव्येकडील मुख्य द्वार अजूनही सुस्थितीत आहे.

सीताबर्डी किल्ला 

नागपुरातील सीताबर्डी किल्ला हा सीताबर्डी येथील 1817 च्या युद्धाचे प्रतीक आहे. नागपूरच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब उर्फ मुधोजी द्वितीय यांनी तिसऱ्या अँग्लो—मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा सुरू करण्यापूर्वी हा किल्ला बांधला होता. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असून, तो आता सीताबर्डी या नावाने ओळखला जातो. हा परिसर नागपूरचे अतिशय महत्त्वाचे असे व्यावसायिक केंद्र आहे. या किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांचे थडगे आणि महात्मा गांधींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तो सेल आहे. सध्या प्रांतीय लष्कराचे कार्यालय या किल्ल्यात आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशीच हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो.

झिरो माईल 

झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचे केंद्रिंबदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे. अंतर मोजण्यासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती.

जपानीज रोझ गार्डन 
नागपूरच्या सिव्हील लाईन भागात हे जपानी रोझ गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्‍यांसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक आहे. पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही येथे घेता येतो. पावसाळ्यात या गार्डनचे सौंदर्य अधिकच फुलत असते. उंच झाडे, हिरवे गवत आणि मनमोहक निसर्गाने ओतप्रोत असलेले हे गार्डन सकाळी आणि सायंकाळी ‘वॉकींग’ करणार्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. या रोझ गार्डनमध्ये लाल आणि पिवळे गुलाब मुख्य आकर्षण आहे. या गार्डनच्या सभोवताल असलेले आणि अतिशय काळजीपूर्वक सुशोभित करण्यात आलेले काही लोखंडी शिल्प पाहिले की, हे खरोखरच जपानी गार्डन असल्याचे संकेत मिळतात.

व्हीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला व्हीसीए ग्राऊंड या नावानेही ओखले जाते. 2008 मध्ये ह गाऊंड उभारण्यात आले. त्याचवर्षी त्याचे उद्घाटन झाले. शहरातील जुन्या व्हीसीए मैदानाची जागा त्याने घेतली. हे मैदान रणजी ट्रॉफी आणि दुलिप करंडक स्पर्धेकरिता विदर्भ आणि सेंट्रल झानच्या संघांकरिता होम ग्राऊंड आहे. नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा येेथे आहे

महाराजबाग आणि झू
शहराच्या मध्यभागी असलेले महाराजबाग आणि झू हे नागपूरचे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय आहे. शहरातील भोसले आणि मराठा राज्यकर्त्यांनी ते बांधले आहे. येथे काही दुर्मिळ जातीचे पक्षी आणि प्राणी आहेत. शहरातील अतिशय मनमोहन स्थळ अशी त्याची ओळख आहे. महाराज बागेत अतिशय दुर्मिळ प्राणी असल्याने योग्य उद्देशासाठी त्याचे बॉटनिकल गार्डनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या महाराजबागेतच प्राणीसंग्रहालयही आहे. शहरातील असे हे एकमेव स्थान असल्याने नागपूरकरांना त्याचा अभिमान आहे.

रमण सायन्स सेंटर

नागपूर शहरात असलेल्या या रमण सायन्स सेंटरला नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिकतज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे. अतिशय उपयुक्त असे हे सायन्स सेंटर असून ते मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आहे. वैज्ञानिक कामकाजांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच उद्योग आणि मानव कल्याणाकरिता वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करण्यासाठी या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनीही येथे भरविण्यात येतात.

मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला)

नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयाला अजब बंगला या नावानेही ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेकडे दीड किलोमीटर अंतरावर सिव्हील लाईन्स भागात ते आहे. 1863 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय शहरातील सर्वात जुने आहे. प्राचिन काळात उपयोगात येणाऱ्या अनेक पुरातत्व वस्तू, शिल्पाकृती येथे संग्रहित आहेत. आर्ट, आर्चिओलॉजी, अॅन्थ्रोपोलॉजी, जिऑलॉजी, उद्योग आणि नैसर्गिक इतिहास अशा सहा गॅल-यामध्ये या सर्व वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत.

नॅरो गेज रेल संग्रहालय
नागपूरच्या कामठी रोडवरील कडबी चौकात असलेले हे नॅरो गेज रेल संग्रहालय भारतातील असे एकमेव संग्रहालय आहे. 4.5 एकर जागेत असलेल्या या संग्रहालयात भारतीय रेल्वेच्या अनेक जुन्या आणि वारसा वस्तूंचे एकप्रकारे प्रदर्शनच भरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोकोमोटीव्ह आणि कॅरिएजचे मॉडल्स, हॅण्ड लॅम्प, जुने टेलिफोन संच आदींचा समावेश आहे.

पेंच सिलारी

हा परिसर प्रामुख्याने पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सातपुडा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्यापर्यंत सुमारे २५७ चो.की.मी. पर्यंत याचे क्षेत्र पसरले आहे. १९७५ मध्ये याला केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तर १९९९ मध्ये या परिसरास व्याघ्र संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला.

बोर वन्यजीव अभयारण्य

बोर धरणामुळे निर्माण झालेल्या या घनदाट अरण्यासामध्ये विविध दुर्मिळ प्रजातींचे जीव आढळतात. बोर धरणसुद्धा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.

सेवाग्राम

शेगाव गावातील आपल्या वास्तव्यादरम्यान महात्मा गांधींनी या आश्रमाची स्थापणा केली. या आश्रमाच्या संकुलामध्ये महत्मा गांधींचे निवासस्थान असलेल्या ‘बा कुटी’ व ‘आदी निवास’ आहेत.

लेक गार्डन 
अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील लेक गार्डनला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. यासाठी सक्कर दऱ्यातील लेक गार्डन सारखे दुसरे स्थळ नाही. आठवड्याची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. या लेक गार्डन मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत.

गांधीसागर तलाव 

नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्‍या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.

1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणाऱ्यांसाठी नौकाविहाराचीही सोय आहे.

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे.

खेकरा नाला तलाव

नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्‍यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय.

संकलन – 
विलास सागवेकर,
उपसंपादक 

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India