औरंगाबाद जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 

अजिंठा व एलोराच्या जगप्रसिद्ध लेण्या तसेच आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांमुळे औरंगाबाद हे एक मध्यवर्ती पर्यटन स्थान झाले आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेली अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि प्रसिद्ध मुघल वास्तू बीबी का मकबरा अगदी जवळ असल्यामुळे नुकतेच ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ म्हणून जाहीर झालेले औरंगाबाद राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. हे महाराष्ट्रातील अतिशय झपाट्याने वाढणारे शहर असून आता ते महत्त्वाचे व्यापारी शहर बनले आहे. मुंबईशी विमान, रेल्वे व रस्त्याने तर राज्यातील इतर सर्वच शहरांशी रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबरोबरच पितळखोरे, दौलताबाद, पैठण आणि शिर्डी या ठिकाणांना देखील औरंगाबादहून जाता येते.

अजिंठा

जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झालेली ही बौद्धकालीन लेणी बुद्ध व बोधसत्त्वाचे विहंगम दर्शन घडवतात. सन १८७९ मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी पुन्हा शोधून काढली. हे ठिकाण औरंगाबादपासून १०७ कि.मी. आणि जळगांवपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. अजिंठा नामक मध्ययुगात वसलेल्या गावापासून अगदी जवळच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या ताब्यात संरक्षित असणारी ३२ लेणी आहेत. १९८३ मध्ये युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. याठिकाणी असणाऱ्या कोरीव गुंफा दोन भागात विभागता येतात. पहिल्या विभागात इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून इ.स. पहिल्या शतकापर्यंत कोरली गेलेली प्राचीन बौद्ध लेणी येतात तर दुसऱ्या विभागात इ.स. पाचव्या शतकातील महायान बौद्ध लेणी येतात. प्राचीन लेण्यांपैकी क्र. ९ आणि १० ही लेणी म्हणजे चैत्यगृहे आहेत, ज्यामध्ये भारतीय इतिहासातील सर्वात प्राचीन कलेचे उपलब्ध नमुने जतन झाले आहेत, तर ८, १२, १३ आणि १५ ही लेणी म्हणजे विहार आहेत. तसेच १९, २६, आणि २९ क्रमांकाच्या गुहा म्हणजे महायान काळातील चैत्यगृहे असून उर्वरित सर्व या काळातील विहार आहेत.

एलोरा (वेरुळ)

हिंदू, जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव असलेली ही लेणी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तेराव्या शतकातील या लेण्यांमधील कैलास मंदिर हे एक महत्त्वाचे व जगातील सर्वात मोठे अखंड शिल्प आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. अजिंठ्यापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ वसलेले आहे, ते म्हणजे वेरूळ. सुमारे १५०० वर्षांचा इतिहास असणारे हे स्थळ तेथील प्राचीन भारतीय कोरीव स्थापत्याच्या सर्वोत्कृष्ट नमुन्यासाठी जगप्रसिद्ध आहे. चरणाद्रीच्या उभ्या डोंगरावर कोरून काढलेल्या ३४ गुहा आपल्याला एकाच ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धार्मिक लेण्यांचे एकत्रित दर्शन घडवितात.

म्हैसमाळ

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुमारे ९१३ मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण गिरीजाभवानी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो.

पैठण

गोदावरी नदीच्या काठी वसलेले पैठण हे शहर जरीकाम केलेल्या पैठणी साड्यांकरिता प्रसिद्ध आहे. तसेच पैठण हे शहर संत एकनाथांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

पितळखोरा लेणी

ही भारतातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी असून ती अंदाजे २३०० वर्षांपूर्वी कोरण्यात आली आहेत. पितळखोऱ्याची लेणी अजिंठा लेण्यांपेक्षाही जवळपास १०० वर्षे आधी कोरली आहेत.

दौलताबादचा किल्ला

दगडामध्ये खोदलेल्या गुहा आणि दालने, एक सुंदर असे मंदिर, मोठा खंदक, संरक्षक तटबंदी, प्रशस्त राजवाडे, उत्तम अशी स्नानगृहे, निवासी संकुले, बाजार, पायऱ्या असलेली विहीर अशा सगळ्या स्थापत्यगुणांनी समृद्ध असलेला हा किल्हा आहे. याचे ऐतिहासिक महत्त्व एवढे आहे की तुघलकाच्या राजवटीमध्ये त्यांनी आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच आजच्या दौलताबादला हलवली.

संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India