पर्यटकांचे आकर्षण : हाजराफॉल

पर्यटकांचे आकर्षण : हाजराफॉल
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करुन गोंदिया जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमुळे अनेकांना रोजगार देखील मिळत आहे. जिल्ह्यातील सालेकसा हा मागास, दुर्गम, नक्षल प्रभावित, आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला हा जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे.

गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 52 किलोमीटर अंतरावर आणि छत्तीसगडच्या सीमेजवळील सालेकसा तालुक्यात असलेल्या ब्रिटीशकालीन हाजराफॉल धबधबा बघायला पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मांदियाळी असते. सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या या धबधब्याला बघायला छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यासह विदर्भातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

सालेकसा-दरेकसा मार्गावरुन हाजराफॉलकडे वळतांना हिरवीगार वनराई, विविध जातीची असंख्य झाडे, औषधी गुणधर्म असलेली वृक्ष दिसून येतात. हाजराफॉलकडे जाण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीने लावलेला दिशादर्शक हाजराफॉल सचित्र रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलक पर्यटकांना हाजराफॉलकडे जाण्यासाठी आकर्षिक करतो.

नवाटोला हे 667 लोकसंख्येचे गांव. गावातील 95 टक्के लोक आदिवासी असून ते गोंड जमातीचे आहेत. अल्पशिक्षीत असलेल्या काही आदिवासी युवक-युवतींना हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल परिसराचा विकास करण्यात येत आहे. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलच्या व्यवस्थापनाचे काम करीत असल्यामुळे नवाटोलाच्या जवळपास 25 ते 30 बेरोजगार युवक-युवतींना समितीने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या युवक-युवतींना पर्यटकांशी अतिथ्य, बुडत्या पर्यटकाला वाचविणे, हाजराफॉल परिसराची स्वच्छता राखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत ही युवा मंडळी पर्यटकांच्या सेवेत असते. हाजराफॉलकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटक व प्रत्येक वाहनाचे 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. नवाटोला येथे सन 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेली संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलसाठी 17 ऑक्टोबर 2014 पासून सक्रीय झाली आहे. महिन्याकाठी सरासरी 50 ते 55 हजार रुपये उत्पन्न समितीला हाजराफॉलमुळे मिळत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल येथे चहा कॅन्टीन, बुट्टा विक्री केंद्र, लाकडापासून तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना बसण्यासाठी पर्यटक संकुल मचान, पर्यावरणपूरक बांबूपासून कचरा पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. बायोटॉयलेटची सुविधा तेथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

साहसी खेळासाठी बर्मा ब्रीज, मल्टीवाईन ब्रीज, व्हीसेफ ब्रीज, कमांडो नेट, हॅंगींग ब्रीज, सीसा बॅलन्स, झिकझॅक बॅलन्स तयार करण्यात आले आहे. यासाठी पर्यटकांकडून प्रती ब्रीज 10 रुपये शुल्क आकारण्यात येते. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने जवळपास दिड लक्ष रुपये खर्च केले आहेत.

भविष्यात हाजराफॉल येथे चिल्ड्रेन पार्क, फुलपाखरु गार्डन, झीप लाईन, बोटींगची सुविधा, औषधीयुक्त वनस्पतीची लागवड, गौण वनोपजावर प्रक्रिया करुन विक्री, पर्यटकांना अल्पदरात भोजन, कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याचे व्यवस्थापन करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा तयार करण्यात येणार आहे.

नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीची सक्रियता आणि जिल्हा पर्यटन समितीकडून हाजराफॉलच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या कामामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवाटोला येथील आदिवासी युवक-युवतींना पर्यटनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. हाजराफॉल हे पर्यटनस्थळ ग्रीनव्हॅली म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

हाजराफॉल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात अल्पोपहार किंवा भोजन करता यावे यासाठी मोबाईल कॅन्टीन जेएफएमच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.

हाजराफॉल या पर्यटन स्थळाला 17 ऑक्टोबर 2014 ते 28 ऑक्टोबर 2015 या कालावधीत 64 हजार 761 पर्यटकांनी भेट दिली असून या पर्यटन स्थळापासून नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला 6 लाख 42 हजार 990 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्य दिनी 3400 पर्यटकांनी भेट दिली. हाजराफॉलमुळे नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध झाले आहे. नवाटोलातील काही बेरोजगार युवक-युवतींना काही महिन्यापुरता हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
- जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India