‘नशीबावर सोडलेल्या सांजवीला नव्या आयुष्याचे दान’

राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया 

घरची परिस्थिती अगदीच बेताची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध- अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदाच हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरीराला अशुद्ध रक्ताचाच पुरवठा होत होता. त्यामुळे थोडं चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च तीन लाख रूपये सांगितला. पण एवढे पैसे नसल्यामुळे आई वडीलांनी तिला नशीबावर सोडून दिल होतं. अशावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना सांजवीसाठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले.

भंडारा तालुक्यातील 5 किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजू बडगे हे कुटुंब राहतं. त्यांना दोन मुली व एक मुलगा. तीन भावंडामध्ये सांजवी सगळ्यात मोठी. ती अडीच वर्षाची असताना तिला खूप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरला सुपर स्पेशालिटीला दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी तिला हृदयाला छिद्र असल्याचे निदान केले. ऑपरेशन शिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही त्यामुळे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण बागडे कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती अगदीच खराब होती. त्यामुळे तिचे ऑपरेशन पैशांअभावी होऊ शकले नाही.

सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. 10 पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हाता-पायाची नखं निळी पडायची. शाळेत नाव घातलं पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेमच होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी 9 वर्षाची झाली.

ऑगस्ट 2013 मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळ्या तपासण्या करण्यास सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ. मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे ऑपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आर्इवडिलांकडे पाठपुरावा केला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात ऑगस्ट 2015 मध्ये सांजवीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशांशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे.

आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेनं नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसत खेळत शाळेत जाताना पाहून तिच्या भविष्याची चिंता मिटली. अशी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली.

-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India