कमी पावसामुळे तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यासह आष्टी तालुका दुष्काळाचा सामना करीत आहेत. असे असताना तालुक्यातील आष्टा हरीनारायण येथील कृषी पदवीधर विश्वास गटगटे यांनी नोकरीच्या पगारातून 22 एकर शेती खरेदी करत त्यात 45 लाख रुपये खर्च करुन सात कोटी लिटर क्षमतेचे शेततळे खोदले आहे. 18 एकर शेतीत डाळींबाचे पीक घेतले जात असून दुष्काळी परिस्थितीत हा शेतीचा आणि शेततळ्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
बीड जिल्ह्यात आष्टी तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे सतत कमी पाऊस पडतो. तालुक्यातील आष्टा येथे विश्वास गळगटे यांची एक एकर वडिलोपार्जित जमीन होती. शेतीची आवड असल्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून 2000 मध्ये सुरुवातीला बीएसएसी ॲग्री ही पदवी व त्यानंतर 2002 मध्ये गुजरातच्या कृषी विद्यापीठातून एमएसस्सी ॲग्री ही दुसरी पदवी मिळविली. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीला खाजगी कंपनीत नोकरी त्यांनी नोकरी सुरु केली. नोकरीच्या पगारातून 2013 मध्ये त्यांनी गावातच 22 एकर जमीन खरेदी केली. पुण्यात नोकरी सांभाळून शनिवारी-रविवारी नियोजन करुन मार्च 2014 मध्ये साडेनऊ एकर क्षेत्रामध्ये त्यांनी 5500 डाळींबाच्या झाडांची लागवड केली. त्यानंतर मे 2014 मध्ये मोठ्या आकाराच्या शेततळ्याचे काम सुरु केले. नोकरीच्या पैशांची गुंतवणूक इतरत्र न करता शेतीमध्येच करायची हा त्यांच्या उद्देश असल्यामुळे हे धाडस करु शकल्याचे ते सांगतात. या धाडसाला अमरराजे निंबाळकर, भरत गळगटे या दोन मित्रांनी प्रेरणा दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणि तालुका कृषी अधिकारी प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
मार्च 2014 मध्ये त्यांनी शेतात 5500 डाळींबाची लागवड केली असून त्याला फळे येत आहेत. आणखी साडेसात एकर क्षेत्रावर 4500 झाडांची लागवड होईल. सात कोटी लिटर पाण्यातून 18 एकरातील बाग फुलणार असून उत्पादन खर्च वजा जाऊन एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्याची पावसाची परिस्थिती पाहता कॅश क्रॉपसाठी तांत्रिक पद्धतीने कमीत कमी दोन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले आहे. मल्चिंगचा वापर करुन 10 हजार डाळींब झाडांसाठी दोन वर्ष पाणी पुरेल अशा शेततळ्याचे नियोजन केल्याने आम्हाला पाण्याची चिंता नाही, असे विश्वास गळगटे यांनी सांगितले. अशा पद्धतीने लहान-मोठे शाश्वत पाण्याचे साठे निर्माण केल्यास पाण्याची सोय होईल आणि शेतीचेही उत्पादन वाढेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विश्वास यानिमित्ताने शेतकऱ्यांना मिळू शकतो.
-अनिल आलुरकर,
जिल्हा माहिती अधिकारी, बीड.
0 comments:
Post a Comment