बारडाचा राजा : पर्यटनाद्वारे पर्यावरण प्रबोधन

27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख :
पयर्टन व्यवसायाला अलिकडे अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे. जगभरातील बहुतांशी राष्ट्रे तसेच आपल्या देशातील जवळजवळ सर्वच राज्ये या उद्योगाकडे मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहतात. अर्थकारण, रोजगार, मनोरंजन आणि सामाजिक सामंजस्य या गोष्टी प्रामुख्याने या पर्यटन व्यवसायामुळे साध होतात, हे नक्कीच.

हे झाले नेहमीचे. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून वर्चस्वांचे प्रबोधनही घडावे, यादृष्टीने पालघर जिल्ह्यातील बोर्डीगावाजवळील आदिवासी वसती असलेल्या अस्वाली या खेड्यात येथील सुविद्य व तरुण शेतकरी सुर्यहास लक्ष्मीकान्त चौधरी यांनी बारडाचा राजा ही स्पर्धा सुरु करता करता निसर्ग पर्यटन केंद्रही कार्यान्वित केले आहे.

पश्चिम घाट परिसरातील उत्तरेकडील पार्वत रागांतील बारडाचा हा डोंगर म्हणजे या भागातील पश्चिम परिसराला मिळालेले वरदान आहे. अतिशय विलोभनीय जैवविविधतेने हा डोंगर संपन्न आहे. डोंगराच्या पायथ्याशी 'अस्वाली' हे आदिवासी गाव वसलेले आहे. पिक पाण्याने परिपूर्ण मात्र दऱ्याखोऱ्यांनी संपन्न असा हा भाग आहे. या बारडाच्या डोंगराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. डोंगरमाथ्यावर भूचार, पाण्याच्या टाक्या, किल्ला बांधणीचे अवशेष अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात.

विशेष म्हणजे 14 व्या शतकात पारशी धर्मीय पर्शिया या आपल्या मायदेशातील छळाला कंटाळून जलमार्गाने आले ते थेट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर. महाराष्ट्र गुजराथ राज्यांच्या सीमेलगत गुजराथेतील संजाण बंदर आणि उधवा या ठिकाणी गुजराथच्या शान्तताप्रिय राजाने त्यांना माणुसकीच्या भावनेतून आश्रय दिला. पर्शियातून येताना त्यांनी आपले दैवत म्हणजे 'अग्नी' देखील आणला होता. त्याचे योग्य रितीने पावित्र्य राखले जावे यादृष्टीने तो महाराष्ट्रातील बारडाच्या डोंगरावर सुरक्षीत स्थळी ठेवण्याचे ठरले. त्याप्रमाणे तो ठेवण्यात आला आणि सतत 73 वर्षे त्याची जपवणूक करण्याचे भाग्य बारडाच्या डोंगराला मिळाले, असे म्हणतात. त्याचा परिणाम म्हणजे बारडाच्या डोंगरानजिकच्या म्हणजे घोलवड, बोर्डी, उडाणू, सार्द-बोरीगाव या विभागात पारसी धर्मियांनी आपले वस्तान बसविले. आजही मोठमोठाले पारशी फलोत्पादक या भागात स्थिरावले आहेत व फलोत्पादन क्षेत्रात मोलाचे योगदान ते देत आहेत.

या सर्व गोष्टी आणि या डोंगराळ असलेल्या प्राचिन अवशेष इत्यादी लक्षात घेता येथील गुंफेची पुरातत्व विभागाने देखील नोंद घेतली आहे, असे सुर्यदास चौधरी पर्यटकांना आत्मियतेने सांगतात.

सुगीच्या दिवसातील 'इव्हेन्ट'

बारडाचा राजा, ही एक गिरीभ्रमणाची स्पर्धा आहे मात्र आज या स्पर्धेला इव्हेन्टचे स्वरुप आले आहे. दिवाळी-दसऱ्याच्या निमित्ताने शाळा-कॉलेजेसना सुट्टी असते. शेतातील धान्य शेतकऱ्यांनी घरी आणलेले असते म्हणून हे दिवस त्यांच्या दृष्टीने सुगीचे दिवस असतात. त्याचवेळी हा भ्रमंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यासोबत अस्वाली ग्रामपंचायतीच्या विद्यमाने क्रीडा-स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. धनधान्य घरात आल्यावर या सुमारास तारप/नृत्य, सोंगे घेणे, पारंपारिक नाचगाणी या स्वरुपात या भागात आदिवासी संस्कृतीचे सुकृत दर्शन पर्यटकांना घडते.

या इव्हेन्टवर आदिवासी युवकांचे वर्चस्व असते. मात्र शेजारच शाळा-कॉलेजचे तरुण आणि तरुणी यामध्ये आवर्जून सहभागी होतात. या इव्हेन्टद्वारे सर्वांनाच भरभरुन आनंद उपभोगता यावा, यादृष्टीने येथील सुविद्य आदिवासी युवकांनी शालेय विद्यार्थी गट, महाविद्यालयीन विद्यार्थी गट, खुला गट, हौशी गट, वगैरे वगैरे विविध गट पाडले आहेत. ज्यायोगे आबालवृध्दांना या भटकंतीचा किंवा इव्हेन्टचा आस्वाद घेता येतो. गेली कित्येक वर्षे 'बारडाचा राजा' ही स्पर्धा सातत्याने सुरु आहे. या गिरीभ्रमण स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना 'बारडाचा राजा' हा किताब दिला जातो.

या स्पर्धेच्या निमित्ताने या डोंगरावरील पुरातन टाक्यांची सफाई, प्लास्टिकची सफाई, या गोष्टी हे स्पर्धक करतात. गिरीभ्रमण करताना पर्यावरणाला धोका पोहोचेल अशा गोष्टी करु नयेत अशा सूचना स्पर्धकांना दिल्या जातात. त्यांचे तंतोतंत पालन सर्वच जण करतात. त्यात वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही याची हे सर्व स्पर्धक काळजी घेतात. त्याचबरोबर डोंगरमाथ्यावर बीजारोपणही करतात. ज्यायोगे भविष्यात ती बीजे संकरुन त्यांचे वृक्ष होतील असा विश्वास त्यांच्यात निर्माण करुन देण्यात येतो.

बारडाचा राजा हा इव्हेन्ट विशिष्ट कालावधीत होतो. त्यामुळे दूरवरच्या शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, नागरिक यांना त्या विशिष्ट कालावधीत त्यात सहभागी होऊन आनंद घेता येत नाही म्हणून दूरुन येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण वर्षभर या गिरीभ्रमणाचा व निसर्गाच्या सहवासाचा लाभ व्हावा म्हणून शेजारीच म्हणजे डोंगराच्या पायथ्यालगत निसर्ग पर्यटन केंद्र सुर्यहास चौधरी यांनी सुरु केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरातील शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी कँप घेऊन येतात. सतर्क काही दिवस वास्तव करतात. तसेच इतर नागरिक येतात. शहरात येणारे हे पर्यटक येथल्या निसर्गात आणि लोकजीवनात एकरुप होतात. वारली (आदिवासी) संस्कृती, कला, विविध वृक्ष, औषधी वनस्पती, पशुपक्षी, फुलपाखरे, शेती याबद्दली माहिती त्यांना देण्यात येते. ही माहिती पर्यटकांना तेथील आदिवासी युवकच देतात. सुर्यदास चौधरी यांनी येथील स्थानिक युवकांना याबद्दलचे प्रशिक्षण्ण दिले आहे. त्यामुळे ते येथे 'टुरिस्ट गाईडचे' काम करतात. त्यांच्यामुळे झाडाफुलांची अचुक माहिती मिळविणे, सुलभ असे गिरीभ्रमण करणे, इत्यादी गोष्टी पर्यटकांना या युवकांकडून सहजगत्या प्राप्त होतात.

हे स्थानिक सुशिक्षित युवक याशिवाय आपली शेती तसेच शेळ्यामेंढ्या पाठणे, कोंबड्या पाळणे या गोष्टीही करतात. त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारते आहे. त्यांच्या वयोवृध मातापित्यांना आता काबाडकष्ट करावे लागत नाहीत आणि योग्य उत्पन्न मिळत असल्यामुळे ते स्थलान्तर करीत नाहीत.

अलिकडे या निसर्ग पर्यटन केंद्राला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. केवळ शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचारी येथे कँप घेऊन येतात आणि निसर्गाशी समरस होतात. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या लाऊडस्पीकर अथवा डी.जे. (DJ) वाजविण्यास तसेच फटाके उडविण्यास येथे सक्त मनाई आहे. येणाऱ्या पर्यटकांना डोंगरदऱ्यात फिरविण्यात येते. तेथील विविध वृक्ष, फळे, फुले, वेली, झुडपे, पशु-पक्षी, नाग, साप, विंचू घोरपड इत्यादी सरपटणारे प्राणी यांची माहिती देण्यात येते. पर्यावरणाच्या समतोल अविरत टिकण्याच्या दृष्टीने त्यांची गरज कशी आहे, हे देखील त्यांना समजविण्यात येते.

विश्वाच्या उत्पत्तीनंतर 5.6 हजार अब्ज वृक्ष भूतलावर होतेृ त्यातील 3.04 हजार वृक्ष शिल्लक आहेत. जवळजवळ 15 अब्ज वृक्ष दरवर्षी तोडले जातात मात्र फक्त 5 अब्ज वृक्षच दरवर्षी लावले जातात. सुमारे 10 अब्ज झाडे या ना त्या कारणाने नष्ट होतात. असेच जर घडत राहिले तर आगामी केवळ 300 वर्षाच्या कालावधीतच सर्वच वृक्षसंपदा नष्ट होईल, असे अमेरिकेतील 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे, अशी बातमी एका अग्रगण्य मराठी दैनिकाने दिली आहे. अर्थात अशाप्रकारे सर्व वृक्षसंपदा संपुष्टात आल्यावर भूतलावरी सर्व जीवसृष्टीही लोप पावेल, याची जाणीव संबधीत पर्यटकांना व्हावी. ज्यायोगे त्यांचे प्रबोधन होऊन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे त्यांचा वृक्ष संवंर्धनास हातभार लागावा, हा दृष्टीकोन सुर्यदास चौधरींचा आहे. शासकीय पातळीवर वनीकरणाचे अनेक कार्यक्रम सुरु आहेत. मात्र ज्या गतीने नागरीकरण होत आहे त्याच्या दुप्पट वेगाने हे वनीकरणाची गरज आहे, असे त्यांचे मत आहे. हे करीत असताना इच्छूक पर्यटकांना ते झाडांच्या बियांचे वाटप देखील करतात. जंगलात वाढणारे वृक्ष म्हणजे जांभूळ, चिंच, करवंद, फालसा, आंबा, बांबू, कडूनिंग, अशोक, शिसव, हिरडा, भेडा, भेंड अशा प्रकारचे स्थानिक पर्यावरणाला दाद देणारे आणि वाऱ्यापाण्याने सजगत्या न मोडणारे वृक्ष लावण्याचा ते आग्रह करतात. अधिक उपरोक्त वृक्ष व इतरही वृक्ष यांच्या बिया निसर्ग पर्यंत केंद्रावर आणून द्याव्यात असेही आवाहन करतात. काटेरी बाभूळ, शिंदी, पांगारा इत्यादी काटेरी वृक्षांवर सापांचा आणि ससाणे, गरुड, घार इत्यादी पक्षांचा वावर नसतो. त्यामुळे या वृक्षांवर पक्षी अंडी घालतात व पिल्लांचे संवर्धन करतात. म्हणून काटेरीवृक्षही लावावेत ज्यायोगे संपदेत भर पडेल असेही सुर्यहास चौधरी पटवून देतात. घाणेरी सारख्या झुडुपांवर असंख्य फुलपाखर, मधुमक्षिका बागडत असतात. अशाही झुडपांचे संवर्धन होण्याची गरज आहे. याशिवाय अलिकडे आयुर्वेदाला जगभरात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे आणि त्याला पोषक अशी वनौवधी पश्चिम घाटात विपुल प्रमाणात आहेत. त्यांचेही रक्षण व संवर्धन होण, ही काळाची गरज आहे, असेही भावनात्मक आवाहन ते पर्यटकांना करतात. याशिवाय या केंद्रात येणाऱ्या पर्यटकांनी येथे असलेल्या फार्महाऊसवर किंवा बंगल्यात न राहता त्यांनी मचाणावर रात्र घालवावी, असा चौधरींचा आग्रह असतो. अर्थात या आग्रहाला भरभरुन प्रतिसाद मिळतो आणि बहुतांशी पर्यटक रात्री मचाणावरच बसून निसर्गाशी समरस होतात. पहाटे-पहाटे विविध पक्षांच्या नादमधुर आवाजाने त्यांना जाग येते आणि प्रत्यक्ष निसर्ग आणि शहरातील जीवन यात किती पोकळी आहे. याचा विचार त्यांच्या मनात साहजिकच येत असावा.

या भागात भातशेतीचे पीक घेतले जाते. पावसाळ्यात भाताची लावणी चिखळणी करुन करण्यात येते. ही चिखळणी नांगराने होते. पावसाळ्यात जेव्हा पर्यटक येतात तेव्हा स्वत:हून नांगर धरणासाठी चिखललेल्या शेतात उतरतात. ज्यायोगे त्यांना विनासायास 'मड बाथ' घडते काही 'मड बाथ' हा प्रकार काही रिसॉटवर आहे. मात्र हे 'मड बाथ' खूप महागडे असते. परंतु निसर्ग पर्यटन केंद्रानजिक हे 'मड बाथ' विनामूल्य अनुभवता येते.

या सर्वकष भ्रमंतीच्या कार्यक्रमात पर्यटकांना विविध, साप-सर्प म्हणजे नाग, कोंब्रा,धामण, कणेर, घारेपड, विंचू, दिवड इत्यादी सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली जाते. काही ठिकाणी त्यांचे दर्शनही घडते. महत्वाचे म्हणजे या पंचक्रोशित कुठे सर्प घरात अथवा परिसरात आढळला तर त्याला मारु नका, तसा या पर्यटन केंद्राला 8007846966 या भ्रमणध्वनीवर निरोप द्या, आचमी टीम त्या सर्पाला इजा न देता पकडेल आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात सोडण्यात येईल, असा आग्रह सुर्यहास लोकांना असतो. याशिवाय कुठेही जखमी पक्षी अथवा वन्यप्राणी आढळला तर सुर्यहास त्यावर उपचार करुन वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतात. तूर्त ते पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी नेचर कँप को-ऑर्डिनेटर म्हणून बऱ्याच (Nature, Camp P-ordinator) परिसरातील शिक्षण संस्थात विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक ज्ञानदान करतात.

अशा प्रकारे पर्यटक, विद्यार्थी व इतर जनतेद्वारे पर्यावरण विषयक संदेश सगळीकडे जावा म्हणून हा अट्टाहास करण्यात मला आलिक आनंद मिळतो असे ते सौजन्याने म्हणतात. 


संपर्काचा पत्ता : श्री. सूर्यहास लक्ष्मीकांत चौधरी,
निसर्ग पर्यटन केंद्र, अस्वाली गाव,
काथा बोर्डी, ता. डहाणू, जिल्हा पालघर. (भ्रमणध्वनी- 8007846966)

शब्दांकन- निरंजन राऊत(9869914981 9594482030)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India