हत्तीबेट : पर्यटनाचे नवे आकर्षण

लातूर जिल्हा म्हटले की, शिक्षण, व्यापार, साखर कारखानदारी, पाणी टंचाई याची चर्चा अधिक होते. परंतू लातूर जिल्ह्यातील पर्यटन विकासाची, पर्यटन स्थळाची, तीर्थक्षेत्राची चर्चा होत नाही. हे वास्तव स्वीकारले पाहिजे. लातूर जिल्ह्यात अवघे एक ते दिड टक्के वन आहे. ही चिंतेची बाब आहे असं सारेच म्हणतात परंतू आहे त्या वनाचा विकास करणे, संवर्धन करणे, पडीक जागेवर वन निर्मिती करणे हे होतच नाही असं नाही त्याची चर्चा मात्र होतच नाही हे खरं आहे. 

लातूर जिल्ह्यात किल्ले, लेण्या आहेत. पुरातन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली मंदिरे आहेत. वनराई आहे. गरज आहे त्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याची विकेन्ड कुठे साजरा करावा, कुठे भटकंती करावी अशी ठिकाण शोधावी लागतात, शोधली की ती सापडतात हे मात्र नक्की. 

उदगीर तालुक्यातील देवर्जन जवळील हत्तीबेट हे असं एक ठिकाण आहे, ज्याची तुलना माथेरानशी केली तर ती अतिशयोक्ती होणार नाही. म्हटलं तर ते मानव निर्मित आहे, म्हटलं तर ते पुरातन वारसा लाभलेलं तीर्थक्षेत्रही आहे. या बेटाचा विकास हा गेल्या दहा वर्षा पेक्षा अधिक काळापासून पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी या व्यक्तीच्या ध्यासामुळे होत आहे. ज्या बेटावर पूर्वी घनदाट जंगल होतं असं म्हटल जातं परंतू ते जंगल कालांतराने नष्ट झालं. त्या ठिकाणी उरला तो खडक, गुहा आणि धार्मिक इतिहासाच्या काही पाऊल खुणा ! धार्मिकता जोपासतच या परिसरात वन पर्यटनाच्या दर्जाला शोभेसं, काम आता तिथं झालेलं आहे. या डोंगरावर सगळा जांभा प्रकारात मोडणारा खडक आहे. शब्दशः खडक फोडून वनराई निर्माण करण्यात आली आहे. या बेटावर सध्या वीस हजार झाडांची लागवड झाली आहे. सुमारे 25 हेक्टर क्षेत्रावर पडणारे पाणी वन विभागाने सी.सी.टी. बंधारे बांधून 50 लाख लिटर पाणी अडवून झाडांची जोपासना केली आहे. या डोंगरावर लिंब, करंज, आंबा, चिंच, कांचन, आवळा, गुलमोहर, काशीद अशी काही उपयुक्त, काही शोभेची झाडे चांगली वाढली आहेत. ही आपोआप वाढली नाहीत. त्यासाठी मुलांसारखं या परिसरातील नागरिकांनी त्यांना जपलं आहे. त्यांचं संगोपन केलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देण्यासाठी उदगीरच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयातील वापरल्या गेलेल्या सलाईनच्या बाटल्यांचा वापर ठिबक सिंचनासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे परिसर बहरला.

या हत्तीबेटाला राज्य शासनाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेचा राज्यस्तरीय पहिला 10 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या रक्कमेतून स्थानिक वन संरक्षक समितीने त्या ठिकाणी छोटी नर्सरी केली आहे. मुलांसाठी खेळण्याचे साहित्य घेतले आहे. निसर्ग सौंदर्याच्या आनंद घेण्यासाठी आणि परिसराची टेहळणी करण्यासाठी दोन बाजूला टॉवरची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच पाणवठे निर्माण केल्यामुळे अनेक प्रकारचे पशुपक्षी त्या परिसरात आता अधिवास करीत आहेत. अनेक पक्षांचे आवाज ऐकण्याचा आनंद मिळतो. 

हत्तीबेटाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न होत आहेत. वनविभागाचे अधिकारी आणि विशेष म्हणजे हे बेट तीन गावाच्या सीमेवर आहे ती गावे धर्मापूरी, करवंदी आणि देवर्जन आहेत. या तीनही गावातील लोकांच्या तो अभिमानाचा विषय आहे. झाडाचा वाढदिवस साजरा करणे, झाडाला राखी बांधण्याचे पर्यावरण पूरक नाहीतर संवर्धक असे उपक्रम इथं होतात. 

गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हत्तीबेटाच्या ‘क’ दर्जात वाढ होऊन त्याला आता ‘ब’ दर्जा मिळाला आहे. सरकारने गेल्या वर्षभरात या बेटासाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. या निधीतून डोंगरकड्याला पर्यटकासाठी संरक्षक कठडे निर्माण केले गेले जेणेकरुन उंचावरुन शुद्ध हवेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुरक्षितपणे उभे राहू शकतात. त्याचप्रमाणे काही भागात वन संरक्षणासाठी तारेचं कुंपण आवश्यक होतं, ते कुंपण आता पूर्ण झालं आहे. 

हत्तीबेटावर सध्या दररोज मराठवाड्यातील अगदी जालन्यापासून ते हिंगोलीपर्यंतच्या शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वनसहली येत आहेत. रविवारी, सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी तरुणांच्या सहली वाढल्या आहेत. बेटावर येण्यासाठीचा पक्का रस्ता, स्वच्छतागृह, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था होण्यासाठी राज्य सरकारकडे 4 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर झालेला आहे. एक चांगलं निसर्ग वनपर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात अधिक लक्ष घातलं तर लातूर जिल्ह्याचं भूषण म्हणून ते विकसित होऊ शकतं.

हत्तीबेटाच्या विकासाला एका अर्थाने आणखी चालना देण्यासाठी गरज आहे असे प्रत्यक्ष तेथे भेट दिल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. असे घडले तर लातूर जिल्ह्याच्या वैभवात एक नवी, कायमस्वरुपी, प्रेरणादायी भर पडेल, हे नक्की ! 

अरुण समुद्रे,ज्येष्ठ पत्रकार, लातूर
मो. 9075671169

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India