औरंगाबाद : पर्यटन विकासाला चालना

औरंगाबाद जिल्हा जागतिक नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. नुकताच शासनाने देखील अधिकृतरित्या शासन निर्णय घेऊन औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. 

जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवून पर्यटनाला भरघोस चालना देण्यात येत आहे. महामंडळामार्फत महाभ्रमण आणि निवास व न्याहरी योजना सन 2014-15 मध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली. पर्यटकांना पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळी अनुभती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृती व सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देणारी महाभ्रमण योजना आहे. पर्यटकांना माफक दरात राहण्याची सोय या योजनेत आहे. स्थानिक सांस्कृतिक चालीरिती आणि खाद्य पदार्थ याची चांगल्या प्रकारे ओळख यातून होते. निवास व न्याहरी योजनेकरिता महामंडळाने संकेतस्थळावर पर्यटकांना माहिती व्हावी म्हणून योजनाधारकांच्या माहितीसोबतच छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत. या योजनेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाभ्रमण योजनेत शेती, निसर्ग, ऐतिहासिक वारसा, वन्य व पर्यावरण, साहसी क्रीडा, परंपरा व लोककला, उद्योग सहल, अभ्यास सहल, यांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रकल्पास नोंदणी करण्यात येते. निवास व न्याहरी योजनेमध्ये पर्यटकांना किफायतशीर पद्धतीवर स्वच्छ निवासाची घरगुती सोय उपलब्ध करून देण्यात येते. या निवासात घरमालक व अधिकृत व्यक्ती या स्वत: राहून पर्यटकांना सेवा देतात. यासाठी महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयात व संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय अंतर्गत निवास व न्याहरी योजनेसाठी एकूण 7 नोंदणी धारक घरमालक आहेत. 

महामंडळ स्वत: चालवित असलेल्या पर्यटक निवासाच्या आरक्षणावर व्यक्ती अथवा संस्थांना सवलत देण्यात येते. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 10 % व बिगर हंगामी 20 % सवलत देण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 10 % सवलत 6 ते 16 वर्ष वयापर्यंत देण्यात येते. जेष्ठ नागरिकांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 20 % सवलत देण्यात येते. ज्या अपंग व्यक्तीकडे 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, अशा व्यक्तींसाठी 20% सवलत देण्यात येते. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अथवा कार्यरत सैनिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या आधारे 20 % सवलत देण्यात येते. 

पर्यटन उद्योग वाढीस लागावा म्हणून खाजगी कंपन्याकरीता चर्चासत्र, कल्याण कार्यक्रम, स्नेह संमेलन याकरीता महामंडळाचे पर्यटक निवास आरक्षण 10 % सवलत उपलब्ध आहे. 

जागतिक वारसा स्थळ असलेले वेरुळ व अंजिठा लेणी येथे विदेशी पर्यटक गर्दी करतात. अंजिठा येथे दर्जेदार सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने अंजिठा पर्यटक निवास फर्दापूर हे तारांकित श्रेणी वाढवावी म्हणून विकासकामे करण्यात आलेली आहे. पर्यटक निवासात असलेले विहारा उपहार गृहात विदेशी पर्यटकांसाठी कॉन्टीनेन्टल फूडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पर्यटन निवासात 16 वातानुकूलित कक्ष, पर्यटक स्वागत कक्ष, वाय-फाय इंटरनेट सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दोन स्वतंत्र व्हॉल्वो बसेस वेरूळ व अंजिठासाठी नुकत्याच सुरू केल्या आहेत. पोलीस विभागाने पर्यटन सुरक्षा फिरती पोलीस वाहने कार्यरत केली आहेत. वेरुळ येथे महादेव वन उद्यान साकारणार आहे. पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. एकूणच पर्यटनाला भरघोस चालना दिली जात आहे.

-रामचंद्र देठे
जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India