एक अब्ज पर्यटक, एक अब्ज संधी.... जागतिक पर्यटनदिनानिमित्त विशेष लेख...

पर्यटन... पर्यटन म्हटले की आजपर्यंत जनता धार्मिक स्थळे बघण्यास प्राधान्य देत असत. परंतु आज विविध माध्यमातून पर्यटनाची माहिती मिळत असल्याने पर्यटन कसे, का करावे ? याबाबत पर्यटनाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांमध्ये जागृती झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिन आहे… यानिमित्ताने विशेष लेख.

आपण सर्वजण विविध कारणाने प्रवास करीत असतो. प्रवास करण्याची ही वृत्तीच यातील रोजगाराची संधी निर्माण करते. या कामातून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक शाश्वत विकास साधू शकतो. मानवाची प्रवास करण्याच्या वृत्तीतून रोजगार प्राप्त होण्याची संधी, त्यातून पर्यटनासाठी संभाव्य क्षमता, आर्थिक वाढ, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी यावर्षी 27 सप्टेंबर रोजी ‘एक अब्ज पर्यटक, एक अब्ज संधी’ या संकल्पनेवर हा ‘जागतिक पर्यटन दिवस’ साजरा करण्यात येत आहे. 1980 सालापासून विविध संकल्पना घेऊन त्या राबविण्याच्या दृष्टीने जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो.

आज शिक्षणाचा प्रसार झाल्याने, स्त्रियांनीही भरपूर शिक्षण घेतल्याने घराघरांमधून स्त्रियांद्वारे पर्यटनासाठी प्रोत्साहन मिळत आहे. शिवाय संपूर्ण कुटुंबही त्यासाठी नियोजन करण्यात गुंतून जाते. ही बाबच पर्यटन वाढीसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. जागतिक, भारतीय पर्यटनात महाराष्ट्राचे स्थान सर्वात वरचे असल्याने राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांना राज्य, राज्याबाहेरील पर्यटन स्थळे तसेच देशविदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहे. तसेच इतर खाजगी कंपन्यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण आहे, जे पर्यटकांना मुलभूत सुविधा पुरवितात.

राज्यात अजिंठा, वेरुळसह जागतिक दर्जाचा वारसा असलेली 5 स्थळे (वास्तू), 900 हून अधिक गुंफा, 350 किल्ले, त्यांचा समृद्ध इतिहास, वन्यजीव, जंगल, नॅशनल पार्क, समुद्र किनारे ही पर्यटनस्थळे आहेत. त्यांचे संवर्धन, जतन हे अधिकाधिक पर्यटन वाढीतून शक्य आहे. याची जाणीव शासनासही असून शासन आपल्या स्तरावर सर्व पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. त्याशिवाय देशी-परदेशी पर्यटकांची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपाययोजना करुन सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यटनावर आधारित उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात उद्योगधंद्यात गुंतवणूक वाढल्यास त्याचा पर्यटन उद्योगासही फायदा मिळणार हे लक्षात घेऊन ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘स्वच्छता अभियान’, ‘स्मार्ट सिटी’, ‘जलयुक्त शिवार’ या शासनाच्या योजना जसजशा यशस्वीतेकडे वाटचाल करतील तसतसे पर्यटन उद्योग वाढीस नक्कीच चालना मिळेल. त्याचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येईल.

राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पर्यटन क्षेत्राचे जागतिक स्तरावर आकर्षण आहेच. शिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आरामदायी प्रवासासाठी ‘डेक्कन ओडीसी’सारखी पंचतारांकित सुविधा असलेली रेल्वेसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आल्याने परदेशी पर्यटक तिचा लाभही घेत आहेत. अजिंठा, वेरुळसारख्या इतर ठिकाणी असलेल्या बौद्ध लेण्यांचे बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठे आकर्षण आहे. तेव्हा या राष्ट्रांच्या सहयोगातून राज्य रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षित वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देऊन सुविधांचा दर्जा अधिक सुधारण्याकडे पर्यटन महामंडळ लक्ष देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केलेल्या जपान दौऱ्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत मिळणार आहे.

पर्यटन म्हणजे नुसतीच भटकंती नसून त्यातून सेवा उद्योग ही महत्वाचा घटक आहे. हॉटेल, आरोग्य, पर्यटन, वन पर्यटन कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, फिल्मसिटी, संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजत आहे. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरच महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी MTDC ने मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट’चे आयोजन केले आहे. 28 ते 30 सप्टेंबर या तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यास 30 देशांतील हॉटेल मालक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, साहसी टूर ऑपरेटर्स सहभागी होणार आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पर्यटन स्थळांची ओळख आणखी जास्त देशांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंगचे प्रयत्न करण्याबरोबरच राज्यातील सर्वोत्तम ऐतिहासिक, बहारदार वारसा, नैसर्गिक आकर्षणे, विविध खाद्य पदार्थ, सांस्कृतिक सण-उत्सव, तीर्थक्षेत्र, सामाजिक आणि अभ्यास पर्यटनास जागतिक पर्यटकांपर्यंत नेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमातून नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि राज्यात अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. जगभरात दशहतवादी हल्ल्यांचे सावट असतानाही पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देण्याची जबाबदारी प्रत्येक राष्ट्राची आहे. तेव्हा पर्यटन दिन जागतिक स्तरावर साजरा करण्यामुळे पर्यटनावर निश्चित सकारात्मक परिणाम होण्यास मदत मिळेल.

-रेखा पालवे
उपसंपादक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India