सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाकडून या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच त्यांच्या पशूधनाचीही काळजी घेण्याची जबाबदारी शासनाने खंबीरपणे उचलली. या पशूधनासाठी चाऱ्याचा पुरवठा करताना तो सकस असावा ही बाब कटाक्षाने पाळली गेली. निकृष्ट चाऱ्यास सकस बनविण्याच्या प्रक्रियेचा यासाठी फार मोठा उपयोग झाला. अशा या निकृष्ट चाऱ्यास सकस बनविण्याच्या प्रक्रिया जाणून घेऊ या…. खालील लेखात….
गव्हाचा भुसा, काड, भाताचा पेंढा, मक्याची ताटे, बाजरीचे सरमाड, ऊसाचे पाचट, वाडे, तुरीचे, हरभऱ्याचे भुसकट इत्यादी निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करुन त्यांचे सकस चाऱ्यात रुपांतर करता येते. निकृष्ट चाऱ्यातील प्रथिनांचे व मूळ पचनीयतेचे प्रमाण युरिया प्रक्रिया करुन वाढवता येते.
युरिया प्रक्रिया करण्याची पध्दत –
प्रक्रियेकरीता सिमेंट क्राँक्रीटचा ओटा किंवा सारवलेली स्वच्छ जागा निवडावी. वाळलेला 10 किलो भाताचा पेंढा किंवा गव्हाचे काड व्यवस्थित 4 ते 6 इंच उंचीचा समान थर करुन ठेवावा. 3.60 लीटर पाण्यात 4 किलो युरिया पूर्णपणे विरघळून घ्यावा. प्रत्येक प्रक्रियेच्या वेळी ताजे मिश्रण तयार करुनच प्रक्रिया करावी. युरिया व पाण्याचे तयार केलेले निम्मे मिश्रण गव्हाचे काड/भाताच्या पेंढ्यावर समप्रमाणात झारीने फवारावे. लाकडी दाताळ याच्या सहाय्याने किंवा हाताने वैरणीचा थर उलटा करावा. उर्वरीत पाणी युरिया मिश्रण वैरणीवर फवारुन घ्यावे.
प्रक्रिया केलेल्या वैरणीचा कोपऱ्यात व्यवस्थित ढीग करावा. ढीग करताना वैरणीचे थरावर थर देऊन भरपूर दाब द्यावा. जेणेकरुन वैरण घट्ट दाबून बसेल आणि त्यातील जास्तीत जास्त हवा बाहेर पडेल. घट्ट नसलेल्या ढिगातील वैरणीवर युरिया प्रक्रिया परिणामकारक होत नाही असे दिसून आलेले आहे. ढिगाचे पावसापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. वैरणीचा ढीग गोणपाट किंवा प्लॅस्टीकच्या कागदाने पूर्णपणे झाकावा. पूर्ण 4 आठवडे ढिग उघडू नये आणि हलवू नये. चार आठवड्याच्या कालावधीत युरीयापासून तयार होणारा अमोनिया वैरणीवर प्रक्रिया करतो त्यामुळे वैरण मऊ होऊन त्यातील नत्राचे प्रमाण वाढते आणि वाळलेल्या वैरणीचा रंग पिवळा सोनेरी होऊन वैरण खाण्यास योग्य अशी तयार होते. युरिया प्रक्रिया करावयाची जागा स्वच्छ, टणक, पाऊस आणि दलदल यापासून संरक्षित असावी. प्रथम पशुवैद्यकीय तज्ञाकडून युरिया प्रक्रिया करणे शिकून नंतर स्वत:च करावी.
युरीया प्रक्रिया केलेली वैरण कशी खाऊ घालावी –
ढिगातील वैरण काढताना प्रत्येक वेळी समोरच्या बाजूचा आवश्यक तेवढा भाग काढून घेऊन पुन्हा ढिग पूर्ववत सरळ करुन पुरेसा दाब देवून ठेवावा. प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालण्यापूर्वी सुमारे एक तास पसरवून ठेवावी, जेणेकरुन वैरणीतील अमोनिया वायूचा वास निघून जाईल. प्रक्रिया केलेल्या वैरणीची चव जनावरांना एकदम न आवडल्याने जनावरे वैरण खात नसतील तर अशी वैरण इतर प्रक्रिया न केलेल्या वैरणीत थोडी थोडी मिसळून जनावरांना खायला घालावी आणि हळूहळू प्रक्रिया केलेल्या वैरणीचे प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना खायला देण्यास सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी जनावरांचे दुग्धोत्पादन, शरीरस्वास्थ आणि शरीराची वाढ याबाबत निरीक्षण करावे. प्रक्रिया केलेली वैरण सलग पध्दतीने जनावरांना खाण्यास दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतील.
प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना हिरव्या वैरणीबरोबर किंवा स्वतंत्रपणे खाऊ घालता येईल. प्रक्रिया केलेली वैरण दुभत्या, भाकड, गाभण गाई, म्हशींना तसेच 6 महिन्यावरील वासरांना कोणत्याही प्रमाणात खाऊ घालता येईल. सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांना आणि तीन महिन्यापेक्षा कमी वयाच्या करडांना प्रक्रियायुक्त वैरण खाण्यास देऊ नये. रवंथ करणाऱ्या सर्व मोठ्या जनावरांना देण्यास हरकत नाही.
युरीया मिश्रणाचा वापर करताना घ्यावयाची काळजी –
पहिले 10 ते 15 दिवस प्रक्रिया केलेली वैरण कमी प्रमाणात जनावरांना खाण्यास द्यावी आणि हळू हळू त्याचे प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेली वैरण जनावरांना दिवसाचे कमी तापमानाचे वेळी म्हणजेच सकाळी व संध्याकाळी खाऊ घालावी. प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालताना रोज कमीत कमी 4 ते 5 कि.ग्रॅम हिरवी वैरण देण्याची व्यवस्था करावी. जीवनसत्वाचा पुरवठा होण्याकरीता प्रत्येक जनावरास तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्लाने रोज जीवनसत्व पावडर द्यावी. प्रक्रिया केलेली वैरण, जनावरांना खाऊ घालत असताना सोयाबिनचे आंबवण, सोयाबिनचे पदार्थ खाण्यास देऊ नये. पशुखाद्यामध्ये प्रति किग्रॅ 10 ते 15 ग्रॅम युरीया असतो व युरीया प्रक्रिया केलेल्या 5 ते 6 कि.ग्रॅ. वैरणीत सुमारे 100 ग्रॅम युरिया असतो. युरीया मळीची प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालताना अशा वैरणीव्दारे आणि पशुखाद्याव्दारे मिळून प्रत्येक जनावरास रोज 190-200 ग्रॅमपेक्षा जास्त युरीया दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
युरीया प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालण्याचे फायदे –
रोज 5 लीटर दूध देणाऱ्या गायीस आणि 3 लीटर दूध देणाऱ्या म्हशींना वरील प्रक्रिया केलेली वैरण खाण्यास दिल्यास त्यांना आंबवण देण्याची आवश्यकता नाही. भरपूर दूध देणाऱ्या जनावरांच्या रोजच्या देय आंबोणातून 1/3 आंबोण जरी कमी केले तरी त्यांच्या दूध उत्पादनावर ही प्रक्रिया केलेली वैरण खाण्यास दिल्याने कसलाच विपरीत परिणाम किंवा दुधामध्ये घट झाल्याचे दिसून येत नाही. कमी खर्चात दुभत्या जनावरापासून जास्त दूध उत्पादन मिळवता येते. प्रक्रियेमुळे गव्हाच्या काडातील प्रथिनांचे प्रमाण 4 टक्के पर्यंत आणि एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण 56 टक्क्यांपर्यत वाढल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच यामध्ये कडब्यापेक्षा 3 टक्के जास्त पचनीय प्रथीने व 5 टक्के जास्त एकूण पचनीय पदार्थ असतात. 5 ते 6 लीटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई / म्हैशींना प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घातल्यास त्यांच्या दुधात दररोज पाव ते एक लीटर पर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. प्रक्रिया केलेली ही कमी खर्चाची वैरण संपूर्ण वर्षभर खाऊ घालता येते. गव्हाचा भूसा, काड तसेच भाताचा पेंढा इत्यादीसारख्या टाकाऊ वैरणीचा चांगला वापर करता येतो. स्वत:कडे असलेला कडबा विकून त्या बदल्यात जनावरांसाठी गव्हाचे काड/भाताचा पेंढा वापरल्यासही उत्पन्नात भर पडेल
100 किग्रॅ कुटी केलेल्या निकस वैरणीवर 2 किग्रॅ युरीया, 2 किग्रॅ गुळ, 1 किग्रॅ खनिज मिश्रण आणि 2 किग्रॅ मीठ 40 लिटर पाण्यात पूर्णपणे विरघळून घेऊन निकस चाऱ्यावर फवारावे. गुळ /साखरेची मळी उपलब्ध नसल्यास गुळाचा वापर करावा. प्रत्येक वेळी मिश्रण करुन ते ताबडतोब वापरावे. या पध्दतीने प्रक्रिया केलेली कुट्टी पहिले 15 दिवस रोज 3 किलोप्रमाणे खाऊ घालावी. आणि नंतर हळूहळू हे प्रमाण वाढवत 5 ते 6 किग्रॅ पर्यंत न्यावे. या कुट्टीबरोबर हिरवी वैरण किंवा पशुखाद्य मिसळून घातले तरी चालेल. महाराष्ट्रात विशेषत: कोकण विभागामध्ये भाताचा पेंढा किंवा इतर भागात गव्हाचे काड भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तेव्हा त्यावर युरिया प्रक्रिया करुन जनावरांना खाऊ घातल्यास निश्चितच अल्प किंमतीत प्रथिनयुक्त चारा मिळण्यास मदत होईल.
-- डॉ. एन.एन.सावकारे,
प्रादेशिक सह आयुक्त, पुणे
0 comments:
Post a Comment