सध्या ग्रामीण भागातील इंधन व विजेच्या टंचाईच्या काळात बायोगॅसचे इंधन फार गरजेचे बनले आहे. यासाठी बायोगॅस विकास योजनेची ग्रामीण भागातील लाभार्थींना माहीती असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम ही योजना सन 1982/83 पासून जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यास सुरुवात झाली असून 100 टक्के केंद्र पुरस्कृत असलेल्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये तिचा समावेश आहे.
कौटुंबिक बायोगॅस म्हणजे काय व त्याची गरज
जनावरांचे शेण, मानवी विष्ठा, व तत्सम सेंद्रीय पदार्थांचे बंदिस्त घुमटात (डोम) कुजविण्याची प्रक्रिया करुन त्यापासून तयार होणाऱ्या वायूला बायोगॅस असे म्हणतात. याला जैवीक वायू असेही म्हणतात. ग्रामीण भागात इंधन व विजेच्या टंचाईच्या काळात बायोगॅसचे इंधन फार गरजेचे बनले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीना कुटुंबाच्या प्रमाणात बायोगॅस बांधकाम करावी लागणार आहेत. त्यामुळे ही योजना ग्रामीण भागात अत्यंत गरजेची बनलेली आहे.
बायोगॅस योजनेचा उद्देश व फायदे
स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे, एल.पी.जी. व इतर पारंपारीक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, एकात्मिक उर्जा धोरणात नमुद केल्यानुसार स्वंयपाकासाठी आवश्यक ऊर्जा मिळविणे, रासायनिक खताचा वापर कमी करुन सेंद्रीय खताचा वापर करण्यास लाभार्थीना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान सुधारणे व त्याना होणारा त्रास कमी करणे, बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे, कार्बनडाय ऑक्साईड आणि मिथेन यासारख्या वायूंचे वातावरणातील उत्सर्जनाचे प्रमाण घटवून वातावरण बदलांचे नियमन करणे, निसर्गातील वृक्ष तोडीस आळा घालून निसर्गाचा समतोल राखणे, बायोगॅस पासून वीज निर्मिती करुन कौटुंबिक गरजा भागविणे इ. बाबी बायोगॅस उभारणीतून साधता येतात.
बायोगॅस यंत्रामध्ये कुजवण्याची प्रक्रिया बंद जागेत होत असते त्यामुळे गॅस वातावरणात पसरत नाही तर त्यापासून बायोगॅस निर्माण होतो व त्या वायुचे स्वयंपाकासाठी ज्वलन होते, त्यातून विषारी वायुचा नायनाट होतो. त्यामुळे प्रदुषण होत नाही . बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणारी रबडी (स्लरी) म्हणजे शेतीसाठी लागणारे उकृष्ट दर्जाचे सेंद्रीय खत होय. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. घरगुती चुलीमुळे होणाऱ्या धुरातील कार्बन डायऑक्साइड या विषारी वायुचे प्रदूषण होते. तसेच महिलांच्या डोळयांसाठी सुध्दा अपायकारक आहे हे आपल्याला बायोगॅसमुळे टाळता येते. स्वयपाक कमी वेळेत करता येतो. रिकाम्या जागेत केलेल्या मानवी व पशु विष्ठेमुळे हवेतील प्रदुषणामुळे व डासांमुळे कॉलरा ,गॅस्ट्रो, मलेरिया , डेंगु इ . महाभयंकर रोगांचा फैलाव होतो. तो आपण सयंत्रास शैाचालय जोडल्यामुळे रोखू शकतो . ग्रामीण भागातील जनता आरोग्यदायी होवून गाव प्रदुषण मुक्त होते .म्हणजेच निर्मल गाव स्वच्छ व सुंदर बनते. गोबरगॅससाठी शेणाची गरज असल्यामुळे जनावरे पाळणे हे आवश्यक आहे. परंतु जनावरांमुळे आपल्याला शेतीची मशागत व त्यांच्यापासून मिळणारे दुधदुभते यामुळेही आर्थिक फायदा होतो. घरगुती चुलीसाठी लाकडांचे जळण आवश्यक असते. सर्वसाधारणपणे एका कुटुंबासाठी वर्षाकाठी एका वृक्षाचे लाकूड जळणासाठी लागते. त्यामुळे मोठया प्रमाणात वृक्षतोड होते. परंतु बायोगॅसमुळे जंगल तोडीस आपोआपाच आळा बसतो. बायोगॅस योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मदत होते. ग्रामीण भागातील ज्या लाभार्थिकडे स्वत:ची जनावरे व बायोगॅस बांधकामासाठी जागा आहे. तो सदर योजनेचा पात्र लाभार्थी आहे.
बायोगॅस बांधकामासाठी अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्रात सदरची योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागमार्फत म्हणजे जिल्हा परिषदेचा कृषी विभागामार्फत राबविली जाते याशिवाय खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत ही योजना राबविली जाते.
जिल्हा परिषदेमार्फत बायोगॅस बांधकाम करावयाचे झाल्यास प्रथम आपल्या ग्रामपंचायती मार्फत पंचायत समितीकडे बायोगॅस बांधकामासाठी अर्ज करावा. अर्जामध्ये लाभार्थीजवळ असलेली जनावरे व कुटूंबातील व्यक्तीची संख्या नमूद करावी .पंचायत समितीकडून बायोगॅस बांधकामास मंजूरी मिळाल्यानंतर बायोगॅस बांधकाम करावे.
बायोगॅस बांधकाम कसे करावे ?
बांधकाम करण्यासाठी घराजवळील उंच ,कोरडी ,मोकळी व बराच वेळ सुर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी , जागा शक्यतो घराजवळ अगर गोठयाजवळ असावी . जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मिटरपेक्षा खाली असावी , निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर ,पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजूरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुंटुंबातील संख्या विचारात घेऊन खालील प्रमाणे बायोगॅसचे प्रकार केंद्रशासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून बायोगॅसचे दोन प्रकारे पडतात. तरंगती गॅस टाकी सयंत्र प्रकार, स्थिर घुमट सयंत्र प्रकार स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन बायोगॅस प्रकाराची निवड केली जाते. महाराष्ट्र राज्यात ज्या भागात मुरमाची व तांबूळ मातीचा प्रकार आहे त्या ठिकाणी दिनबंधू स्थिर घुमट सयंत्र प्रकाराचे बांधकाम करता येते व ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिंमेट ,प्रि फॅब्रिकेटेडे फेरोसिमेंट (शिवसदन )या प्रकाराचे बायोगॅस बांधता येतील .
दिनबंधु स्थिर घुमट सयंत्र प्रकारचा बायोगॅस हा कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे. मात्र सदर सयंत्राचे बांधकाम केवळ प्रशिक्षित व कसबी गवंडयाकडून करून घेणे आवश्यक आहे. गवंडयास सयंत्र उभारणीचा अनुभव व विश्वास असला पाहिजे, अन्यथा घुमटाला तडा जाणे ,बांधकामाची मोजमापे चुकीची असणे ,वायू गळती होणे अशा बाबी होतात व अनुदान मिळण्यास किंवा सयंत्र चालु होण्यास अडचणी निर्माण होतात. तरंगती टाकीचा बायोगॅसही चांगला चालतो मात्र सदर प्रकारचे बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो व सयंत्रावर असलेली तरंगती लोखंडी टाकी काही दिवसांनी गंजल्यामुळे अगर अन्य कारणांनी बंद पडल्यास ती बदलण्याचा खर्च वाढतो. बायोगॅस बांधकामासाठी लागणारे साहीत्य हे चांगल्या प्रकारचे व दर्जाचे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त दिनबंधु प्रकारचे बायोगॅस बांधले जातात व त्यासाठी लागणारे प्रशिक्षित गवंडी जिल्हा परिषदेने प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत.
बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीचे कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका कडून कर्ज पुरवठा केला जातो व मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्ज खाती जमा केली जाते. या शिवाय बायोगॅस स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणासाठी वापर केलेस उदा. उर्जा साधनांचा वापर कमी करुन डिझेल बचत करणे ,जनरेटर ,रेफ्रिजटेर यांच्या वापरासाठी बायोगॅस वापर केल्यास प्रति सयंत्रास 5000 रु. अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत योग्य त्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन लाभार्थीना सहाय्य करण्यात येणार आहे.
बायोगॅस बांधकाम तांत्रिकदृष्टया योग्य प्रकारचे झाल्यानंतर बायोगॅस कार्यरत असेलच पाहून बांधकाम करणाऱ्या यंत्रणेमार्फत सदरचे बायोगॅस 5 वर्षे विना तक्रार चालू ठेवणे बाबत लाभार्थीला हमी पत्र दिले जाते व सदर कालावधीत बांधकामातील दोषामुळे सयंत्र बंद पडल्यास ते विना मोबदला लाभार्थ्याला दुरूस्त करून दिले जाते मात्र काही बाबतीत कौटुंबिक लवादामुळे ,लाभार्थिचे अयोग्य नियोजन , नैसर्गीक आपत्ती यामुळे सयंत्र बंद पडल्यास ते लाभार्थिस स्वत: दुरुस्त करून घ्यावे लागते.
स्वयंसेवी संस्थाचा सहभाग
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची अंमलबजावणी मध्ये काही स्वंयसेवी संस्थाचा सहभाग घेतला जातो. सदर संस्थेकडे प्रशिक्षित गवंडी असून त्यांचेमार्फत बायोगॅसचे बांधकाम केले जाते. बांधकाम पूर्ण होऊन सयंत्र कार्यरत झाल्यानंतर सदरच्या स्वयंसेवी संस्था लाभार्थिस पाच वर्षे सयंत्र विना तक्रार चालू ठेवणे बाबतचे हमी पत्र लिहून देतात.
बायोगॅसचा वापर व निगा
बायोगॅसचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर व निगा हा महत्वाचा भाग आहे व त्यावरच बायोगॅसचे आयुष्य व कार्यक्षमता अवलंबून आहे. ज्या संस्थेमार्फत बायोगॅस बांधकाम केले जाणार आहे ती संस्था आपणास 5 वर्षे आपले सयंत्र सुस्थितीत व कार्यरत ठेवणेबाबतचे हमी पत्र लिहून देणारी आहे. सदरची संस्था कोणती आहे हे शेतकऱ्यांना माहिती असावे . त्याचा पुर्ण पत्ता व दुरध्वनी क्रमांक शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे. बायोगॅस सयंत्रास आय.एस.आय. मार्क असलेली शेकडी जोडणे आवश्यक आहे. शेगडीची छिद्रे अधून मधून स्वच्छ करावीत. गॅसचा वापर करताना घरामध्ये न जळालेल्या गॅसचा वास आला तर गॅस गळती आहे. असे समजून सर्व खिडक्या उघडया करून न जळालेल्या गॅस घराबाहेर घालवावा तो पर्यत काडी पेटवू नये अगर दिवा वगैरे लावू नये. यामुळे आगीचा धेाका टळतो. शेगडी पेटवतेवेळी आगपेटीची काडी पेटवून बर्नरवर धरावी व नंतर शेगडीचे बटन चालू करून शेगडी पेटवावी . खताचा खडा मधून मधून साफ करावा . खताचे किमान दोन खड्डे करावेत व त्याचा आळीपाळीने वापर करावा .खडयातील शेणाची पातळी नेहमी आऊटलेट मधून शेण बाहेर पडण्याचा सांडी पेक्षा कमी असावी म्हणजे शेणाची रबडी सहजरीत्या बाहेर पडेल . सयंत्राचे आउटलेटवर फरशीचे झाकण घालणे बंधनकारक आहे. कारण सयंत्राचे आऊटलेट उघडे राहिल्यास त्यामध्ये पशुपक्षी ,मुले वगैरे पडून धेाका होण्याची शक्यता असते. आपणाकडे उपलब्ध असलेली जनावरे , व्यक्ती यांचा विचार करूनच सयंत्रची क्षमता ठरविणेत यावी. दररोज आपणाकडे उपलब्ध असलेली शेण व तेवढेच पाणी घालून त्याचा शेणकाला करून सयंत्रामध्ये सोडावा.थंडीच्या दिवसात शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा. शेणाशिवाय स्वयंपाक घरातील खरकटे ,भाजीपाल्याचे अवशेष यांचे लहान भाग करून घातले तरी चालू शकतात. गॅस वाहक पाईप मध्ये हवेचा गारवा लागल्यास पाणी होते त्यासाठी गॅस वाहक पाईप शक्यतो एका बाजूस उतरती जोडावी ज्या ठिकाणी गॅस वाहकपाईप वाकलेली ( बेंड झालेली) असेल त्या ठिकाणी पाणी काढण्याची नळी जोडावी व नळीतून मधून -मधून नियमीत पाणी काढावे. गॅस वापरवेळी शेगडी भडकू लागली अगर निळया ज्योती ऐवजी ज्योत तांबडी पेटू लागली किंवा भांडी काळी पडू लागली तर पाईपमध्ये पाणी साठवले आहे असे समजावे . व त्वरीत पाणी बाहेर काढून घ्यावे. बायोगॅसला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करताना फिनेल, जंतूनाशके, साबण, सोडा, डिर्टजंट पावडर इत्यादी रासायनिक द्रव्याचा वापर करु नये. राखेने शौचालय स्वच्छ करावे. शेगडी वापरात नसेल तेव्हा किंवा रात्री सयंत्रावरील मुख्य व्हॉल्व बंद करावा. स्वयंपाक करुन गॅस शिल्लक राहत असेल तर बायोगॅसवर चालणाऱ्या दिव्याचा वापर करावा. बायोगॅस बांधकाम पूर्ण होताच त्याची नोंद लाभार्थीने आपल्या घराच्या उताऱ्यावर करुन घ्यावी. ही नोंद पुढील काळासाठी उपयोगी पडते.
वीज निर्मिती करीताही बायोगॅसचा वापर करता येतो. सयंत्राचे बांधकाम, वापर व निगा याबाबत अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील कृषि विभाग, पंचायत समिती (सर्व) व जिल्हा स्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्याशी संपर्क साधावा.
0 comments:
Post a Comment